लेख – थायलंड नव्या राजकीय वळणावर

>> प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा पायउतार झाल्या आणि त्यांची जागा राजकीय परंपरा लाभलेल्या शिनावात्रा घराण्यातील पेतोंगतार्न शिनावात्रा या 37 वर्षीय सर्वात तरुण नेत्याने घेतली. थायलंडच्या इतिहासातील या दुसऱया महिला पंतप्रधान आहेत. आजवरच्या पंतप्रधानांमध्ये सर्वात तरुण म्हणून त्यांची नोंद केली जात आहे. सद्यस्थितीत थायलंड एका नव्या राजकीय वळणावर उभा आहे. विश्लेषकांच्या मते, नव्या पंतप्रधानांना राजकीय जुगार खेळावा लागणार आहे. यामध्ये त्या जिंकतील की हरतील, हे आज सांगता येणार नाही.

प्रभू रामचंद्रांनी त्यांचे राज्य लव व पुश यांना वाटून दिले होते. त्यामध्ये थायलंडपर्यंतचा प्रदेश राजपुत्र लव याच्याकडे होता. थायलंडचा राजा आजही स्वतःला रामाचा वंशज समजतो. ‘थायलंड’ या शब्दाचा अर्थ मुक्त प्रदेश असा होतो. ऐतिहासिक काळामध्ये थायलंड कधीही कुठल्याही परकीय सत्तेच्या प्रभावाखाली नव्हते. ते नेहमीच मुक्त राहिले. त्यामुळेच या देशाचे नाव थायलंड असे पडले आहे. थायलंडमध्ये नियंत्रित राजेशाही व्यवस्था आहे. राजा नामधारी असून संसदेमध्ये ज्या पक्षाला सर्वाधिक बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो. अलीकडेच तेथील न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पंतप्रधान श्रेया पायउतार झाल्या आणि त्यांची जागा राजकीय परंपरा लाभलेल्या शिनावात्रा घराण्यातील पेतोंगतार्न शिनावात्रा या 37 वर्षीय सर्वात तरुण नेत्याने घेतली. थायलंडच्या इतिहासातील या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. आजवरच्या पंतप्रधानांमध्ये सर्वात तरुण म्हणून त्यांची नोंद केली जात आहे. त्यांना ही एक अनमोल संधी लाभली आहे. थायलंडची अर्थव्यवस्था अत्यंत विचित्र संकटात सापडली आहे. अर्थव्यवस्थेचे तारू राजकीय वादळातून बाहेर काढावयाचे आणि लोकशाहीला मजबूत करावयाचे असे दुहेरी आव्हान या महिला नेत्यापुढे आहे.

शिनावात्रा या तशा राजकीय दृष्टीने नवोदितच म्हटल्या पाहिजेत, परंतु त्यांच्या घराण्याची राजकीय परंपरा पाहता तेथील लोक त्यांचे नेतृत्व स्वीकारतील असे आजचे चित्र आहे. थायलंडमधील लढाऊ आणि अभिजात सत्तासंघर्षातील महाभारतामध्ये त्या यशस्वी झाल्या आहेत. त्यांच्या हाती आता थायलंडच्या भवितव्याची सूत्रे आहेत. थायलंडच्या इतिहासामध्ये विभाजनवादी राजकीय नेते थाकसिन शिनावात्रा यांची कन्या म्हणून त्यांच्यावर ही मेहेरनजर झाली आहे. घरची परंपरा असली तरीदेखील त्यांचा राजकीय प्रवाससुद्धा स्पृहणीय म्हटला पाहिजे. आता तिला अनेक वादळांना आणि अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. थायलंडमधील दोन राजकीय पक्ष गेल्या दशकापासून परस्परांशी स्पर्धा करीत आहेत. मध्यंतरीच्या अशांततेच्या काळात न्यायव्यवस्थेने त्यांच्या सहयोगी श्रेया थाविसिन यांना पंतप्रधानपदावरून बडतर्फ केले आणि त्यानंतर दोनच दिवसांनी शिनावात्रा यांच्या गळ्यात नेतृत्वाची माळ पडली. थायलंड एका राजकीय वळणावर उभा असताना हा खांदेपालट घडून आला. शिनावात्रा या बिकट वाटेवरच्या थायलंडचा कारभार कसा करतील, बिघडलेली, विस्कटलेली आर्थिक घडी कशी पुन्हा बसवतील याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे.

राजकीय सत्ताबदल हे सामाजिक आणि सांस्पृतिक वातावरण बदलून टाकतात. त्यामुळे एखाद्या देशाची जी कोंडी झालेली असते, ती सोडवून देशाला स्थैर्याकडे नेण्याची ही एक संधी असते. आता या संधीचा नव्या महिला नेत्या कसा लाभ घेतात हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांच्या पाठीशी राजकीय अनुभव आहेच. शिवाय अब्जावधीची मालमत्ता असलेल्या शिनावात्रा पुटुंबाचा वारसाही आहे. आता त्यांना अस्थिरतेचे रूपांतर कधीही न थांबविता येणाऱया लोकाभिमुख प्रशासनात करावयाचे आहे. गेल्या दोन दशकांपासून तेथे काळजीवाहू सरकारे होती आणि ही सरकारे अनेक संकटांनी ग्रासली होती. ही परंपरा त्यांना खंडित करायची आहे. शिवाय त्यांना आता कडव्या लष्करातील नेत्यांशीही योजकतेने झुंज द्यावयाची आहे.

शिनावात्रा यांचे वडील देशामध्ये राजकीय ध्रुवीकरण करण्यात फार पटाईत होते. त्यामुळे ते राजकीय चित्रच बदलून टाकीत असत. आता त्यांची ही मुलगी काय चमत्कार घडविणार? असा प्रश्न पडला आहे. श्रेsयांच्या बडतर्फीमुळे त्या दुःखी झाल्या होत्या, गोंधळून गेल्या होत्या. आता त्यांना तारेवरची कसरत करून प्रशासन सांभाळावयाचे आहे. देश आणि पक्षासाठी काहीतरी चांगले करण्याची वेळ आली आहे. ही संधी नव्या महिला पंतप्रधानांना घ्यावयाची आहे. या संधीचे सोने त्या कशा प्रकारे करतील याकडे राजकीय निरीक्षक मोठय़ा उत्सुकतेने पाहत आहेत. ‘‘आज माझा सन्मान झाला त्याचा आनंद वाटतो, पण या सन्मानाला उतराई व्हावे लागेल’’ अशी सद्भावना त्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर व्यक्त केली.

त्यांनी सूत्रे हाती घेतली, सभागृहात विश्वास संपादन केला, पण आता जनतेचा विश्वास कसा संपादन करावयाचा? हा खरा प्रश्न आहे. खरे तर त्यांना कायदा व सुव्यवस्था राखावयाची आहे. अर्थकारणात नव्या सुधारणा आणावयाच्या आहेत आणि देशाला प्रगतिपथावर घेऊन जावयाचे आहे. अल्पावधीत शेजारी असलेल्या सिंगापूरने प्रगतीचा मोठा पल्ला गाठला, पण थायलंड मात्र मागे का पडला आहे? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. थायलंडला एक प्रगत, आधुनिक आणि स्वावलंबी राष्ट्र बनवायचे आहे.

या छोटय़ाशा द्वीप समूहाचे व्यूहरचनात्मक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकेकाळी प्रभू रामचंद्रांच्या प्रभावाखाली असलेला हा देश आज बौद्ध आणि हिंदू मतांच्या प्रभावाने कार्य करतो. तेथील लोकजीवनावर भारतीय संस्पृतीचा विलक्षण प्रभाव आहे. काळाप्रमाणे देश बदलला आहे, समाजही बदलला आहे. त्यांनी सांस्कृतिक मूल्यांबरोबर आधुनिकतेचे वारेही अनुभवले आहेत. त्याचबरोबर देशापुढे प्रगतीचे नवे प्रवाह उभे आहेत. काही प्रश्नही उभे आहेत. या सर्व प्रश्नांचा नव्या महिला पंतप्रधानांना सामना करावा लागणार आहे.

थायलंडची अर्थव्यवस्था ढासळली आहे. तिला प्राधान्याने सावरावे लागणार आहे. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाकडून कठोर आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. राजकीय स्पर्धा असो की मतमतांतरे असोत, सर्वांना सोबत घेऊन जाणे आणि लोकशाही सहमतीचे वातावरण तयार करणे ही गोष्ट सोपी नाही. असे म्हटले जाते की, 500 अब्ज थायी चलन म्हणजेच 1425 अब्ज डॉलर्स किमतीचा फ्लॅगशिप कॅश फ्लो पुढे न्यावयाचा आहे. अर्थव्यवस्थेला मोठी झेप घेण्याचे आणि सावरून धरण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. ते कसे पेलवणार? हा खरा प्रश्न आहे. अमेरिकेसारखे राष्ट्रसुद्धा मंदीच्या चक्रातून जात आहे. जगामध्ये अन्न पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. युक्रेन आणि हमास युद्धामुळे जगभर महागाई वाढत आहे. अशा वेळी थायलंडलाही अनेक आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा नव्या पंतप्रधानांना या सर्व परिस्थितीतून बिकट वाढ काढावी लागेल.

यामध्ये 14.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा पॅश हॅन्डआऊट प्रोग्रॅम कसा पूर्ण करावयाचा ही सर्वात मोठी डोकेदुखीची समस्या आहे. आता वेळ घालवून चालणार नाही. त्यांना प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. सत्ताधारी मूव्ह फॉरवर्ड पक्षाचे त्यांना समर्थन आहे. संसदेत त्यांच्या बाजूने 319 म्हणजे 2.3 पेक्षा जास्त एवढय़ा सदस्यांनी समर्थन दिले आहे. विश्लेषक असे म्हणतात की, नव्या पंतप्रधानांना राजकीय जुगार खेळावा लागणार आहे. या जुगारामध्ये त्या जिंकतील की हरतील हे आज सांगता येणार नाही, पण परिस्थिती अनुपूल असून ती त्यांना योग्य प्रकारे हाताळता आली पाहिजे. तसे झाले तर त्या सफल होतील, नाहीतर थायलंडपुढे असलेल्या प्रश्नांची मालिका आणखी वाढत राहील. देश अडखळत राहील. या देशाचे प्रारब्ध बदलण्याची ताकद एका तरुण महिला नेत्याकडे आहे व ती त्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाईल यात शंका नाही.