लेख – आरोग्याच्या वाढत्या समस्या – जबाबदार कोण?

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम, [email protected]

भेसळ, प्रदूषण, भ्रष्टाचार यांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू न शकणारे आणि प्रत्येकाला पुरेशा आरोग्य सुविधा, पौष्टिक आहार आणि शुद्ध पाणी-प्राणवायू उपलब्ध करून देऊ न शकणारे प्रशासन मानवी आरोग्याच्या वाढत्या समस्यांना जबाबदार आहे का? किंवा ते स्वार्थी लोक जबाबदार आहेत जे केवळ स्वतःच्या फायद्यासाठी पर्यावरण आणि सामान्य जनतेच्या आरोग्याची हानी करतात, की आपणच जबाबदार आहोत?

देशात घातक आजार, मानसिक ताणतणाव, घटते आयुर्मान आणि अकाली मृत्यू यामध्ये आपल्या आधुनिक जीवनशैलीचा विशेष वाटा आहे. आधुनिक जीवनशैली जगणाऱया तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. आजकाल खेळताना चक्कर आल्याने पडण्याच्या घटना लहान मुलांपासून ते किशोरवयीन मुलांपर्यंत पाहायला व ऐकायला मिळतात. लोक बसल्या बसल्या खाली कोसळतात आणि अनेक वेळा त्वरित आवश्यक आपत्कालीन वैद्यकीय मदतीअभावी जीव गमावतात. हृदयविकाराच्या समस्या फार वाढल्या आहेत. आज आपण ते खातो-पितो जे प्राण्यांनाही खाण्यास योग्य नाही. आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थांची जागा पाश्चात्य फास्ट फूड, जंक फूड आणि अस्वास्थ्यकर आहाराने घेतली आहे. आवश्यक पोषक तत्त्वांचा अभाव, अस्वच्छता, अशुद्ध हवा व पाणी, पुरेशी झोप न होणे, वाढते वजन, व्यायामाचा अभाव, अशुद्ध वातावरण, गोंगाट, कामाचा ताण, घरगुती कलह, मानसिक ताणतणाव, अंमली पदार्थांचे व्यसन यामुळे आजार झपाटय़ाने वाढत आहेत. मानवी शरीर मागील दशकाच्या तुलनेत कमकुवत असल्याचे दिसते. आता हवामानात बदल होताच विविध रोगांचा प्रादुर्भाव मानवी शरीरावर लवकर होतो, कारण रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे.

भारतातील बहुसंख्य मृत्यू आणि अपंगत्वासाठी हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग जबाबदार आहेत. 2022 मध्ये भारतीयांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये 12.5 टक्के वाढ झाली आहे. अस्वास्थ्यकर आहार, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि जास्त वजन यासह हे धोके आता देशातील एकूण आजारांच्या ओझ्यापैकी एक चतुर्थांश आहेत. देशातील एकूण मृत्यूंपैकी 60 टक्क्यांहून अधिक मृत्यूसाठी असंसर्गजन्य रोग जबाबदार आहेत. हृदय आणि फुप्फुसाचे आजार, पक्षाघात, कर्करोग आणि मधुमेहामुळे दरवर्षी सुमारे 5.8 दशलक्ष भारतीय आपला जीव गमावतात. कर्करोग आणि मधुमेहाच्या वाढत्या प्रवृत्तीसह हृदयविकार हे दोन दशकांहून अधिक काळ भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. 2021 मध्ये जागतिक स्तरावर सर्वात मोठा किलर हा इस्केमिक हृदयरोग होता, जो जगातील सर्व मृत्यूंपैकी 13 टक्के मृत्यूसाठी जबाबदार ठरला.

2022 मध्ये भारतातील सरासरी आयुर्मान 67.74 वर्षे होते. 2023 पर्यंत मोनॅकोमधील पुरुष आणि महिलांचे आयुर्मान अनुक्रमे 84 आणि 89 वर्षे होते, तर दक्षिण कोरिया, हाँगकाँग, मकाऊ आणि जपानमधील पुरुष आणि स्त्रिया 81 आणि 87 वर्षे होती. ग्रामीण भागातील 17 टक्के वृद्धांना आणि शहरी भागातील 29 टक्के वृद्धांना जुनाट आजार आहेत. सर्व जुनाट आजारांपैकी 68 टक्के उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा वाटा आहे. पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात 10-15 वर्षे आधी हृदयविकार आढळतो हे खूप आश्चर्यकारक आहे. भारतातील मृत्यूंपैकी 24.8 टक्के मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होतात. त्यानंतर श्वसनाच्या आजारांमुळे 10.2 टक्के मृत्यू होतात, तर घातक आणि इतर टय़ूमरमुळे 9.4 टक्के मृत्यू होतात. 2019 मध्ये प्रदूषणामुळे भारतात 2.3 दशलक्षाहून अधिक अकाली मृत्यू झाल्याचे लॅन्सेट अभ्यासात आढळून आले आहे. युनिसेफ आणि अन्न व कृषी संघटनेच्या अहवालानुसार भारतातील 45 टक्के मुले अविकसित आहेत आणि दरवर्षी पाच वर्षांखालील 6 लाख मुलांना अपुरा शुद्ध पाणीपुरवठा, पौष्टिक आहाराचा अभाव आणि अस्वच्छ परिस्थितीमुळे जीव गमवावा लागतो. शुद्ध पाण्याअभावी दरवर्षी सुमारे 2 लाख मृत्यू होतात.

अमेरिकेसह ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, चीन, ब्राझील आणि इंडोनेशियासारख्या देशांपेक्षा भारतात तणावाची पातळी जास्त आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या 2023 इंडिया वेलनेस इंडेक्स अभ्यासानुसार, भारतातील प्रत्येक तिसरा व्यक्ती तणावाचा सामना करत आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 77 टक्के भारतीयांना नियमितपणे तणावाचे किमान एक लक्षण जाणवते. भारतात मानसिक आरोग्य व्यावसायिकांची तीव्र कमतरता आहे, प्रति एक लाख लोकांमागे केवळ 0.07 मानसोपचारतज्ञ आणि 0.12 मनोचिकित्सक परिचारिका आहेत. बऱयाचदा या व्यावसायिकांना नैराश्येचा सामना करण्यासाठी थोडेफार किंवा कोणतेही प्रशिक्षण नसते. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन 2024 नुसार, भारतीय लोकांमध्ये जगात सर्वाधिक लोक आहेत जे दर आठवडय़ाला सरासरी 45 तासांपेक्षा जास्त काम करतात, विशेषतः खाजगी संस्था आणि व्यवसायांमध्ये. यामध्ये आपला देश भूतान, लेबनॉन, लेसोथो, संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तान या देशांच्या मागे आहे.

शहरांमधून वाहणाऱया बहुतांश नद्या या नाल्यांच्या रूपात दिसतात. बांधकामे आणि फॅक्टरी क्षेत्रातील बहुतेक कामगार धुळीच्या वातावरणात सुरक्षा साधन व मास्कशिवाय काम करतात. घटणारी जंगले, वाढती काँक्रीटची जंगले, कचऱयाचे ढीग, ग्लोबल वार्ंमग यामुळे सजीवांना धोका निर्माण झाला आहे. वर्षभर हवामानाची परिस्थिती क्षणोक्षणी बदलत राहते, त्यामुळे वर्षभर आजार सुरूच राहतात आणि देशात आरोग्याच्या अपुऱया सुविधा असूनही रुग्णालये सतत रुग्णांनी भरलेली असतात.

आता याला नियमांचे उल्लंघन म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा, पण याची शिक्षा आपल्या सर्वांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यास होते. आर्थिक तोटे होतात ते वेगळेच. भेसळ, प्रदूषण, भ्रष्टाचार यांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू न शकणारे आणि प्रत्येकाला पुरेशा आरोग्य सुविधा, पौष्टिक आहार आणि शुद्ध पाणी-प्राणवायू उपलब्ध करून देऊ न शकणारे प्रशासन मानवी आरोग्याच्या वाढत्या समस्यांना जबाबदार आहे का? किंवा ते स्वार्थी लोक जबाबदार आहेत जे केवळ स्वतःच्या फायद्यासाठी पर्यावरण आणि सामान्य जनतेच्या आरोग्याची हानी करतात, की आपणच जबाबदार आहोत? जे आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत, कारण अस्वच्छ आहार, अंमली पदार्थांचे व्यसन, अशुद्धता, आळस, आधुनिक जीवनशैली आपल्याला मारत आहे. त्याविषयीची जनजागृती प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपण सर्वांनी अमूल्य जीवनाचे मूल्य समजून घेतले पाहिजे. जर आपण आताच जागे झालो तर आनंदी आणि निरोगी भारताची निर्मिती करून आरोग्य समस्यांवर दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची बचत करू शकतो आणि वाढत्या गंभीर आजारांचा वेगही कमी करू शकतो.