लेख – सामान्यांचे वकील ते देशाचे सरन्यायाधीश!

>> ऍड. प्रतीक राजूरकर, [email protected]

न्या. भूषण गवईंचे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दिलेले अनेक निकाल विधी वर्तुळासाठी मैलाचा दगड ठरले आहेत. घटनात्मक अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबातील न्या. भूषण गवई सदस्य आहेत. समता, बंधुता आणि न्यायाचे बाळकडू त्यांना कौटुंबिक संस्कारांतून अगोदरच प्राप्त आहेत. सामान्यांचे वकील ते देशाचे 52 वे सरन्यायाधीश हा न्या. भूषण गवई यांचा चार दशकांहून अधिक विधी व न्यायिक क्षेत्रातील प्रदीर्घ प्रवास अनन्यसाधारण असाच आहे.

– ऑगस्ट 1992 ते जुलै 1993- नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत.
– 17 जानेवारी 2000- नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती.
– 14 नोव्हेंबर 2003- मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती.
– 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती.

न्यायिक प्रथेनुसार विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केली. न्या. भूषण गवई हे 14 मे 2025 रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेत आपला पदभार स्वीकारतील. सरन्यायाधीश म्हणून त्यांचा सवासहा महिन्यांचा कार्यकाळ म्हणूनच अनेकांगाने महत्त्वाचा ठरेल. घटनात्मक दृष्टीने महत्त्वाची अशी अनेक प्रकरणे त्यांच्या समक्ष सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. 1985 साली वकिली व्यवसायास सुरुवात केल्यावर न्या. भूषण गवई यांनी सामान्यांचे कायदेशीर प्रतिनिधित्व, सरकारी वकील, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशी पदे भूषविली आणि आता ते सरन्यायाधीश होत आहेत. वकिली व्यवसायात त्यांनी सुरुवातीला बॅरिस्टर राजाभाऊ भोसले यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले. दिवंगत राजाभाऊ भोसले हे महाधिवक्ता व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. 1990 साली भूषण गवई हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिलीसाठी स्थायिक झाले.

दिवंगत नेते रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे सुपुत्र असलेल्या न्या. भूषण गवई यांनी वडिलांच्या सामाजिक चळवळीचा फार जवळून अनुभव घेतला. न्या. भूषण गवई यांच्या एकंदरीत चार दशकांच्या विधी व न्यायवर्तुळाचे अवलोकन केल्यास त्यांच्यावर समता, बंधुता आणि न्याय या संवैधानिक मूल्यांचा असलेला प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. स्वतः न्या. भूषण गवई हे मूळचे विदर्भातील. त्यांचे मूळ गाव अमरावती जिह्यात दर्यापूर तालुक्यातील दारापूर. वडिलांना राजकीय पार्श्वभूमी असूनही न्या. भूषण गवईंनी वंचित, शोषितांच्या न्याय्य हक्कांसाठी विधी क्षेत्राची निवड केली. त्या काळात विदर्भाचे मागासलेपण, ग्रामीण भागातील समस्या, वंचित शोषितांचे न्याय्य हक्क, सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा अशा विविध विषयांशी न्या. भूषण गवई परिचित होतेच. नुकतेच ग्रामीण भागात सर्पदंशाने होणारे मृत्यू याविषयीच्या प्रकरणाची दखल घेत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना त्यांनी याविषयी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. हिंदुस्थान हा सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूची राजधानी म्हणून जगात ओळखला जातो. विधी क्षेत्रात पदार्पण केल्यावर त्यांनी या क्षेत्रात येणाऱ्या अनेक तरुणांना मदतीचा हात दिला. अनेक तळागाळातील तरुणांना त्यांनी विधी व न्यायिक क्षेत्रात येण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या विधी क्षेत्रातील कारकीर्दीत वकिलीची कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या अनेक नवोदित वकिलांना त्यांनी स्वावलंबी होण्यास हातभार दिल्याने लहान गावांतील अनेक तरुण उच्च न्यायालयात वकिली करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकले. उच्च न्यायालयात हक्काचे वकील म्हणून भूषण गवई यांच्याकडे विदर्भातील सामान्य नागरिक मोठय़ा आशेने बघायचे. त्या सामान्यांना वकील या नात्याने भूषण गवईंनी कधीच निराश केले नाही. हा तो काळ होता जेव्हा जिल्हा, तालुका न्यायालयानंतर सामान्य अशिलांसाठी उच्च न्यायालय हे आर्थिक दृष्टीने अखेरचे न्यायालय होते. न्यायालयीन प्रक्रिया महाग होत असताना भूषण गवई यांच्या कार्यालयाने वकील म्हणून मोठय़ा प्रमाणात सामान्यांना कायदेशीर प्रतिनिधित्व देत आधार दिला.

वडील रा. सू. गवई राष्ट्रीय पातळीवरचे लोकप्रिय नेते. रिपब्लिकन पक्षाची धुरा त्यांच्याकडे असूनही दादासाहेब गवईंना सर्वच समाजात अत्यंत आदराचे स्थान होते. वकिली व्यवसायात भूषण गवईंना तोच आदर आणि सन्मान सर्व स्तरांतून मिळाला. त्याला कारण त्यांची प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती. संघर्ष, सातत्य, व्यासंगातून वकिलीत प्रचंड जनसंपर्क, लोकप्रियता भूषण गवईंना प्राप्त झाली. उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्त झाल्यावर अनेकदा परिचित, संबंधित व्यक्तींची कायदेशीर प्रकरणे सुनावणीस आल्यावर न्या. गवईंनी ‘ती प्रकरणे माझ्या समक्ष लावू नयेत’ असे विनम्रपणे न्यायालयाच्या प्रशासनास निर्देश दिले. वडिलांची राजकीय पार्श्वभूमी, स्वतःची लोकप्रियता, दांडगा जनसंपर्क यांचा कुठलाही परिणाम न्यायाधीशांची भूमिका पार पाडत असताना दिसला नाही. न्या. गवईंच्या अनन्यसाधारण आणि कठोर निर्णयांनी त्यांचे वेगळेपण नेहमीच अधोरेखित केले. अगदी राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर त्या निर्णयाला आव्हान देण्यात आले. जुलै 2023 मध्ये त्यावर त्यांनी प्रकरणाच्या सुनावणीच्या अगोदरच दोन्ही बाजूच्या वकिलांना वडिलांच्या काँग्रेस पक्षासमवेत असलेल्या संबंधांच्या बाबतीत आठवण करून देत प्रकरण सुनावणीस घ्यावे अथवा नाही हे कळवावे असे विनम्रपणे विचारले होते. दोन्ही बाजूंनी कुठलाही आक्षेप नसल्याचे कळवल्यावरच त्यांनी ते प्रकरण सुनावणीस घेतले. नुकतेच तेलंगणा विधानसभेत बीआरएस पक्षाच्या आमदारांच्या पक्षांतराच्या बाबतीत तेलंगणा विधानसभा अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानाला त्यांनी चांगलेच फटकारले. पक्षांतर बंदीचा निर्णय न घेतल्यास संपूर्ण न्याय करण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक अधिकारांची जाणीव करून दिली. न्या. भूषण गवईंचे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दिलेले अनेक निकाल विधी वर्तुळासाठी मैलाचा दगड ठरले आहेत. घटनात्मक अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबातील न्या. भूषण गवई सदस्य आहेत. समता, बंधुता आणि न्यायाचे बाळकडू त्यांना कौटुंबिक संस्कारांतून अगोदरच प्राप्त आहेत. सामान्यांचे वकील ते देशाचे 52 वे सरन्यायाधीश हा न्या. भूषण गवई यांचा चार दशकांहून अधिक विधी व न्यायिक क्षेत्रातील प्रदीर्घ प्रवास अनन्यसाधारण असाच आहे.