साय-फाय – इंटरनॅशनल स्पेस सेंटरचा अंताकडे प्रवास

>> प्रसाद ताम्हनकर

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा हळूहळू त्याच्या अंताकडे प्रवास सुरू झाला आहे. गेली अनेक वर्षे विविध कारणांनी हे स्पेस स्टेशन चर्चेमध्ये होते. अंतराळात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स आणि तिच्या साथीदारामुळे हे स्पेस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आले. स्पेस स्टेशनविषयी सामान्य माणसाला असलेली प्रचंड उत्सुकता, स्पेस स्टेशनचे कार्य कसे चालते याबद्दल असलेले कुतूहल हे आजदेखील जगभरात कायम आहे. गेली 30 वर्षे अव्याहतपणे पृथ्वीच्या परिक्रमा करत असलेले हे स्पेस स्टेशन आता त्याची अंतर्गत रचना कमकुवत झाल्याने 6 वर्षांत नष्ट होणार आहे. ताशी 400 किलोमीटर वेगाने अवकाशातून पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत ते पॅसिफिक समुद्रात कोसळेल.

जागतिक मुत्सद्देगिरी आणि एकमेकांशी सहकार्याचे एक सुंदर उदाहरण म्हणून या स्पेस स्टेशनकडे पाहिले जाते. 1988 साली शीतयुद्धाच्या काळात सोडण्यात आलेल्या या स्पेस स्टेशनमुळे आजवर हवामानातील बदलांवर लक्ष ठेवण्यापासून ते विविध वैद्यकीय आजारांवर उपचार शोधण्यापर्यंत अनेक अवघड कार्य सुलभ बनली आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ताशी 17,500 मैल या वेगाने पृथ्वीभोवती सतत फिरत असते आणि सुमारे 93 मिनिटांत ते पृथ्वीभोवती आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करते. हे अंतराळ स्थानक तयार करण्यासाठी अमेरिकेच्या जोडीला रशिया, जपान, युरोप आणि कॅनडा यांचेदेखील बहुमोल सहकार्य लाभले आहे. परस्पर सहकार्याने यापूर्वी असा कोणताही प्रकल्प राबवला गेला नव्हता.

1984 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन अमेरिकेची अंतराळ संस्था ऱएA हिला एक असे अंतराळ स्थानक बांधण्याची कामगिरी दिली जिथे मानव वस्ती करू शकेल आणि अवकाश संशोधन करू शकेल. जगात शांतता आणि समृद्धी पसरवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक मोठे पाऊल होते असे मानले जाते. ऱएA ने या प्रकल्पावर तातडीने काम करायला सुरुवात केली. काही कालावधीत 1989 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि रशियाने या प्रकल्पात रुची दाखवली आणि सहकार्याचा हात पुकेला. अमेरिकेनेदेखील हा प्रस्ताव स्वीकारला आणि या प्रकल्पाच्या कामाला वेग आला.

90 च्या दशकात या योजनेची रूपरेषा पूर्ण झाली. अमेरिका आणि रशिया यांची ऑर्बिटल यंत्रणा असेल आणि या यंत्रणेला युरोप आणि जपानची मॉडय़ूल जोडली जातील असे ठरवण्यात आले. विजेसाठी सोलर पॅनेल्सचा पर्याय स्वीकारण्यात आला. 1998 साली रशियाने कझाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे त्यांनी बनवलेले पहिले मॉडय़ूल अवकाशात सोडले. त्यापाठोपाठ 4 डिसेंबर रोजी अमेरिकेने आपले मॉडय़ूल अवकाशात सोडले. पुकाही काळात त्याला इतर मॉडय़ूलदेखील जोडण्यात आली. 2011 सालापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. प्रक्रियेच्या अखेरीला अंतराळ स्थानकाचा आकार एका भव्य फुटबॉल ग्राऊंड एवझाला. जगभरातील अनेक देशांनी आणि संशोधकांनी यासाठी मदत केली.

अंतराळ स्थानकात वास्तव्यासाठी व्यक्ती शांत वृत्तीची असणे अत्यंत आवश्यक आहे. वातावरण आनंदी ठेवणे आणि इतरांना सहकार्य करणे इथे फार महत्त्वाचे असते. अंतराळ स्थानकात अंघोळीची व्यवस्था नाही. त्यामुळे पूर्ण कालावधी ओल्या कपड्याने अंग पुसून स्वच्छता राखावी लागते. झोपण्यासाठी भिंतीला बांधलेल्या स्लिपिंग बॅगचा वापर करावा लागतो. इथे दीर्घकाळ वास्तव्य केल्याने संशोधकांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होतो. स्नायू खराब होणे, हाडांची घनता कमी होणे असे दुष्परिणामदेखील दिसतात.

या अंतराळ स्थानकावर अमेरिका, युरोपीय देश, रशिया, जपान, कॅनडा येथील किमान सात शास्त्रज्ञ कायम तैनात असतात. अवकाशशास्त्र, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, समुद्रविज्ञान अशा विविध शाखांतील संशोधक इथे राहून संशोधन करत असतात. त्यांच्या या संशोधन मोहिमा साधारण सहा महिने चालतात. गेल्या वीस वर्षांपासून संबंधित देशातील अवकाश संशोधन संस्था इथे संशोधनासाठी वस्ती करणाऱ्या संशोधकांची निवड करत आहे. विशेष गोष्ट म्हणजे आता पर्यटकांनादेखील आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पेस एक्सच्या सोयूझ कॅप्सूल किंवा क्रू ड्रगनच्या मदतीने अंतराळ स्थानकापर्यंत प्रवास करता येतो.

[email protected]