![tiger](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/tiger-696x447.jpg)
>> प्रसाद ताम्हनकर
हिंदुस्थानात अवघ्या एका दशकात वाघांची संख्या दुपटीने वाढून 3600 पेक्षा जास्त झाली आहे. जगभरातील वाघांच्या संख्येच्या तीन चतुर्थांश अशी ही संख्या आहे हे विशेष. या संदर्भात करण्यात आलेल्या एका अभ्यासात काही रोचक गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जगभरात वाघांसाठी जेवढे क्षेत्र राखीव ठेवण्यात आलेला आहे, त्याच्या तुलनेत फक्त 18 टक्के क्षेत्र उपलब्ध आहे. आपल्या देशातील 1,38,200 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे वाघांचे अस्तित्व पसरलेले आहे आणि या क्षेत्राच्या आसपास 6 कोटी लोकांचा रहिवास आहे. वाघाच्या संख्येच्या संदर्भात केलेल्या या विशेष अभ्यासात विविध गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. वाघांच्या संख्येवर सामाजिक, राजकीय परिणाम कसे होतात. आर्थिक तसेच सामाजिक घटक यांचा काय सहभाग असतो. वाघांच्या रहिवासासाठी शांत क्षेत्र असणे कसे गरजेचे आहे हे देखील यात स्पष्ट झाले. या अभ्यासात असे दिसून आले की, आर्थिकदृष्टय़ा काहीशा सधन असलेल्या भागात वाघांची संख्या वाढताना दिसते. जसे की, ज्या भागातील लोकांना वाघांच्या सफारीमुळे किंवा अभयारण्यामुळे होणाऱया पर्यटनातून पैसे मिळवता येतात, वाघाने हल्ला केल्यास मोबदला मिळतो अशा भागात ही संख्या वाढत आहे, तर ओडिशा, झारखंड, छत्तिसगढ, ईशान्य भारत अशा क्षेत्रात ही संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे अथवा वाघ पूर्णपणे नामशेष झाले आहेत.
एखाद्या क्षेत्रातील अशांतता देखील वाघाच्या रहिवासासाठी धोकादायक असते. नक्षलवादी भागात, जिथे सतत सशस्त्र संघर्ष सुरू असतो तिथे वाघांचा वावर बंद झाला आहे. छत्तीसगढ आणि झारखंड सारख्या नक्षलग्रस्त भागात सतत होत असलेल्या सशस्त्र हिंसाचाराने त्या ठिकाणच्या व्याघ्र प्रकल्पातील वाघ नामशेष झाले आहेत. उलट, सिमलीपाल, नागार्जुन सागर श्रीशैलम, अमराबाद अशा सशस्त्र हिंसाचारावर नियंत्रण मिळवल्या गेलेल्या भागात वाघांची संख्या वाढली आहे. बरेचदा नक्षल आर्थिक फायद्यासाठी वाघांच्या अवयवांची तस्करी करतात किंवा त्या क्षेत्रात शिकाऱयांना मोकळे रान देतात. हे वाघ नामशेष होत जाण्याचे एक कारण आहे. संशोधक यासाठी सशस्त्र हिंसाचारामुळे मानस राष्ट्रीय उद्यानातून गेंडा नामशेष झाल्याचे उदाहरण देतात.
वाढते शहरीकरण आणि वाघाचा नष्ट होत चाललेला, आकसत चाललेला अधिवास हे वाघांची संख्या वाढवण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. मात्र या अभ्यासात दिसून आले की, वाघांसाठी राखीव असलेल्या एकूण क्षेत्राच्या भोवती सहा कोटीच्या आसपास लोकांचा रहिवास असूनही वाघांची संख्या वाढलेली आहे. वाघांनी या परिस्थितीशी स्वतला जुळवून घेतलेले आहे. या वस्त्या राखीव क्षेत्राला किंवा राष्ट्रीय उद्यानाला लागून आहेत. या लोकसंख्येपैकी एक मोठा समूह हा शेतीप्रधान असून, ते या भागात शेती करतात. झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ या भागात प्रचंड मोठे क्षेत्र हे वाघ मुक्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारत असताना, 10 हजार चौरस किलोमीटर इतके मोठे क्षेत्र वाघांचा अधिवास म्हणून उभारता येणे शक्य आहे असे संशोधकांना वाटते. या जमिनीचा वापर मानव आणि प्राणी अशा दोघांकडून केला जाणार आहे. त्यामुळे एकमेकांच्या सोबतीने जगत असताना, वाघाच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप कमी करणे आणि वन्यजीवांपासून मानवी वस्तीचा धोका कमी करणे असे दुहेरी आव्हान यामध्ये असणार आहे. वाघांच्या वाढत्या संख्येबरोबर मानवी वस्त्यांवरील वाघाचे हल्ले देखील वाढत चालल्याचे समोर येत आहे. अशावेळी परस्पर सहजीवन जगण्यासाठी जागृती वाढवणे, योग्य त्या उपायांचा आधार घेणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.