
>> प्रसाद ताम्हनकर
फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब, इन्स्टाग्राम सर्वत्र हिंसा, नग्नता, वर्णद्वेष आणि अश्लील शेरेबाजीचा पूर आलेला आहे. रणवीर अलाहबादियाच्या शेरेबाजीपेक्षादेखील खालच्या दर्जाचे शब्द वापरण्यात आलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्रास उपलब्ध आहेत आणि रोज नव्याने बनवले जात आहेत. स्वातंत्र्य हे आता स्वैराचारात बदलले आहे आणि त्यावर समाजासोबत कायद्याचेदेखील बंधन आणणे आवश्यक बनले आहे. या स्वैराचाराची निर्मिती करणारे जितके दोषी आहेत, तितकेच त्याचे दर्शकदेखील दोषी आहेत. सतत पडद्याला चिकटून असणारे आणि अशा निर्मितीचा आनंद घेणारे दर्शकदेखील शिक्षेला पात्र आहेत. ही वाळवी देशाच्या भविष्याला पोखरण्याच्या आधी तिच्यावर जालीम उपाय करण्याची गरज आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, याची पुन्हा एकदा नव्याने व्याख्या करण्याची गरज भासायला लागली आहे. आपले विचार, मत, धोरण हे निर्भीडपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य घटनेने देशाच्या प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. मात्र आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जपत असताना आपण दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली तर करत नाही ना, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घुसखोरी तर करत नाही ना, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. अनेक संस्कृती, धर्म, पंथ यांनी जोडला गेलेला आपला देश आहे याचा आपण अभिमान बाळगतो. या धर्म, पंथ आणि संस्कृतीची जपणूक करायला मात्र आपण विसरतो.
विनोद हा सुखावणारा असावा, पण आजकाल विनोद दुखावणारा बनत चालला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जो काही धिंगाणा सोशल मीडिया आणि इतर समाज माध्यमांतून सुरू आहे तो समाजासाठी अत्यंत घातक ठरणारा आहे. हजारो, लाखो फॉलोअर्स असलेले आणि स्वतःला यूथ आयकॉन, इन्फ्लुएन्सर म्हणवून घेणारे काही लोक विनोदाच्या नावाखाली शिव्यांचा, अश्लील शब्दांचा आणि शेरेबाजीचा जो काही बाजार मांडत आहेत, तो किळस आणणारा आहे. आपण युवा पिढीला कोणत्या मार्गावर नेत आहोत याचे भानदेखील या लोकांना राहिलेले नाही.
‘इंडियाज गॉट लेटंट’ या कार्यक्रमात रणवीर अलाहबादिया, अपूर्वा मखिजा या लोकांनी जी काही मुक्ताफळे उधळली ती नक्कीच देशाच्या संस्कृतीला शोभणारी नव्हती. एखाद्याच्या माता-पित्यांच्या खासगी क्षणावर जाहीर टिप्पणी करणे याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्की म्हणता येणार नाही. या कार्यक्रमाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर आल्यानंतर देशात संतापाची तीव्र लाट उसळली. देशाच्या विविध शहरांमध्ये रणवीर अलाहबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे माफीनामेदेखील सादर केले. मात्र माफी मागण्याने संस्कृतीला जे नख लागले आहे त्याची भरपाई होणार नाही.
आजकाल ग्रे कॉमेडी, डार्क ह्युमर या नावाखाली अनेक विनोदी कार्यक्रम सादर होत असतात. त्यातील बरेचसे कार्यक्रम हे एकपात्री सदरात मोडतात. यापूर्वीदेखील काही एकपात्री कार्यक्रम सादर करणाऱ्यांनी धर्म, संस्कृती यावर अनावश्यक टिप्पण्या करून लोकांचा रोष ओढवून घेतलेला आहे. काही कलाकारांना तर लोकांनी मारहाणदेखील केली आहे. अनेकांचे कार्यक्रम लोकांच्या विरोधामुळे आयोजकांना रद्द करावे लागले आहेत. ही फक्त महानगरांची कथा नाही, तर अनेकदा छोटय़ा शहरांमध्येदेखील कलाकारांना या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. मात्र चुकांमधून काही शिकण्याची आवश्यकता असते हे कमी लोकांना समजते हेच या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे.
मुळात डार्क किंवा ग्रे कॉमेडी हा प्रकार विदेशात अत्यंत लोकप्रिय आहे. वर्णद्वेष, धर्म, परंपरा, लैंगिकता अशा शक्यतो सार्वजनिक ठिकाणी सहसा चर्चेत न येणाऱ्या विषयांवर उघडपणे बोलणे, खिल्ली उडवणे असा प्रकार ग्रे कॉमेडीच्या माध्यमातून साकारला जातो. तो ज्यांच्या समोर सुरू असतो, तेदेखील तेवढय़ाच खिलाडूपणाने त्याचा आनंद घेत असतात. देशाच्या अध्यक्षापासून ते चर्चचे फादर, नन्स, येशू ख्रिस्त अशा अनेक विषयांवर तिथे उघडपणे खिल्ली उडवली जाते. तिथला समाज तेवढा प्रगल्भ आणि विनोदाला विनोद म्हणून बघणारा आहे. आपल्या देशात तेवढी मोकळीक आणि मुख्य म्हणजे समाजभान आहे का? हा खरा प्रश्न आहे.
आपल्या देशाला स्वतःची अशी एक वेगळी परंपरा आहे, संस्कृती आहे. आपल्या विविध धर्मांनी, परंपरांनी, वेगवेगळ्या चालीरीतींनी सर्व समाजाला एका आदर्श बंधनात ठेवलेले आहे. देव, धर्म, परंपरा, स्त्रियांचा आदर करायला आपली संस्कृती शिकवते. ‘परस्त्राr मातेसमान असते’ हे आपली संस्कृती सांगते. स्वतःच्या धर्माचा आदर असावा आणि तेवढाच आदर इतर धर्मांचा करावा हे आपली संस्कृती सांगते. येवढी चांगली शिकवण असणाऱ्या समाजात स्वातंत्र्याच्या नावाखाली जी कीड वाढीला लागली आहे, ती वेळीच नष्ट करण्याची गरज अनेक समाजवंतांनी व्यक्त केली आहे.
‘इंडियाज गॉट लेटंट’ हे खरे तर हिमनगाचे टोक आहे याकडे अनेक तज्ञांनी लक्ष वेधले आहे. आज फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब, इन्स्टाग्राम सर्वत्र हिंसा, नग्नता, वर्णद्वेष आणि अश्लील शेरेबाजीचा पूर आलेला आहे. रणवीर अलाहबादियाच्या शेरेबाजीपेक्षाही खालच्या दर्जाचे शब्द वापरण्यात आलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्रास उपलब्ध आहेत आणि रोज नव्याने बनवले जात आहेत. या सर्व प्रकारांत मुलीदेखील मागे नाहीत. अगदी 16-17 वर्षांची मुले आणि मुली शिव्या देत असलेली, धमक्या देत असलेली रील्स बनवून अभिमानाने प्रदर्शित करत आहेत. अनेक तरुणी, स्त्रिया अपुऱ्या कपडय़ात रील्स, व्हिडीओ बनवून लाखो फॉलोअर्स गोळा करत आहेत आणि त्यातून पैसे मिळवत आहेत. नग्नता आणि शिव्या या आता झटपट पैसा मिळवण्याचा मार्ग बनलेला आहे.
स्वातंत्र्य हे आता स्वैराचारात बदलले आहे आणि त्यावर समाजासोबत कायद्याचेदेखील बंधन आणणे आवश्यक बनले आहे. आज सोशल मीडिया अथवा इतर माध्यमांसाठी जो कायदा आहे तो हे रोखण्यासाठी पुरेसा नाही. पैसा आणि प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी फक्त आजची तरुणाई नाही तर या माध्यमातील अनेक मोठे लोकदेखील आसुसलेले आहेत. प्रसिद्ध निर्माते कायद्याचे कोणतेही बंधन नसलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर खुलेआम नग्नता आणि हिंसाचाराचे दर्शन घडवत आहेत. एकेकाळी लपून-छपून छापले जाणारे आणि तितक्याच लपून-छपून वाचले जाणारे साहित्य एका क्लिकवर पडद्यावर उपलब्ध होत आहे.
या स्वैराचाराची निर्मिती करणारे जितके दोषी आहेत, तितकेच त्याचे दर्शकदेखील दोषी आहेत. सतत पडद्याला चिकटून असणारे आणि अशा निर्मितीचा आनंद घेणारे दर्शकदेखील शिक्षेला पात्र आहेत. ही वाळवी देशाच्या भविष्याला पोखरण्याच्या आधी तिच्यावर जालीम उपाय करण्याची गरज आहे. देशाच्या संसदेतदेखील या स्वैराचारावर कठोर कारवाई करणाऱ्या कायद्याची निर्मिती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अनेकदा अशा व्हिडीओ अथवा पोस्टना हटवण्याची मागणी समाज माध्यमांकडे केली जाते. मात्र एकतर ते असे करणे टाळतात अथवा ‘आमचे डाटा सर्व्हर हिंदुस्थानात नाहीत. त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही’ असे सांगून कायद्याला मदत करणे नाकारतात. यासंदर्भातही कडक कायदा होण्याची गरज आहे.