>> प्रसाद ताम्हनकर
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे मानवाचे भविष्य असणार आहे यात आता कुठलीही शंका उरली नाही. काही काळापूर्वी पेपरात वाचायला मिळणारे आणि चर्चेच्या माध्यमातून आपल्याला माहिती होत असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान हळूहळू वेढून टाकायला लागले आहे. इंटरनेटवर एखादी माहिती शोधणे असो, एखादा पत्राचा नमुना लिहिणे असो किंवा आपल्या स्मार्टफोनचे पीनलॉक फेस रेकग्नेशनच्या मदतीने अनलॉक करणे असो ही सर्व कामे सामान्य माणूसदेखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सहज पार पाडू लागला आहे. यातल्या कित्येक कामात आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत मिळत असते हेदेखील अनेकांना माहिती नसते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता सर्व क्षेत्रांत होऊ लागला आहे. विविध रोगांची कारणे, त्यावरचे उपाय शोधणे, हवामान शाखेत पावसाचा अंदाज लावणे, भूकंप वा इतर नैसर्गिक आपत्तींचा आधीच अंदाज बांधणे, बांधकाम शाखेत शहरांचे नियोजन, पाणीपुरवठा व्यवस्था आखणे, कारखान्यांमध्ये उत्पादनात सुलभता आणि अचूकता आणणे, खेळाडूंना त्यांच्या खेळाचा व फिटनेसचा दर्जा उंचावण्यास मदत करणे अशा असंख्य क्षेत्रांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अचूक मदत होत आहे. हा वापर भविष्यात वाढत जाणार आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी अल्गोरिदम तयार करणाऱया संगणकांची संख्यादेखील वाढत जाणार आहे. या वापरासाठी लागणारी ऊर्जा आपण उपलब्ध करू शकणार आहोत का? हा सध्या जगाला पडलेला प्रश्न आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हादेखील एक प्रोग्राम आहे. त्याला तयार करण्यासाठी, त्याचा वापर सुनियोजित करण्यासाठी अनेक कॉम्प्युटर्सची गरज भासते. या संगणकांना मोठय़ा प्रमाणावर वीज लागते. एक अंदाज असा आहे की, 2027 पर्यंत नेदरलँडसारखा एक मोठा देश जेवढी वीज वापरतो तेवढी वीज या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी खर्च होणार आहे. हा प्रोग्राम तयार करणारी आणि सांभाळणारी जगात 9 ते 12 हजार डाटा सेंटर्स आहेत. एखाद्या मोठय़ा गोदामाच्या आकाराच्या या डाटा सेंटर्समध्ये खिडक्यादेखील नसतात. इथे AI चे संचलन करण्यासाठी सुपर कॉम्प्युटर्सचा मोठय़ा प्रमाणावर वापर करावा लागतो. हे कॉम्प्युटर्सदेखील मोठय़ा प्रमाणावर उष्णता निर्माण करत असल्याने त्यांना थंड ठेवण्यासाठी सर्वकाळ एसीचा वापर करून वातावरण थंड ठेवावे लागते.
बरीचशी डाटा सेंटर्स ही नद्या अथवा तलावांजवळ बांधली आहेत. ज्यामुळे या सेंटर्सना थंड ठेवण्यासाठी पाण्याचा सुलभ पुरवठा शक्य आहे असा एक दावा केला जातो. मात्र हे पाणी उपसण्यासाठी वापरल्या जाणाऱया पंपांनादेखील मुबलक वीज उपलब्ध करून द्यावी लागते आहे याकडे या विषयातील संशोधक लक्ष वेधून घेतात. संशोधकांच्या अभ्यासानुसार संपूर्ण जगाचे जे विजेचे बजेट आहे, त्याच्यापैकी 8 ते 10 टक्के वापर हा एकटय़ा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी होत आहे, जी अत्यंत गंभीर बाब आहे. त्याचबरोबर संपूर्ण जग हवामान बदल आणि त्यामुळे उद्भवणाऱया संकटांशी सामना करत असताना, ही वाढती उष्णता आणि ऊर्जेचा प्रचंड वापर हे दोन्ही चिंताजनक आहे.
कार्बन उत्सर्जनामुळे निर्माण होत असलेल्या गंभीर समस्येशी जग पूर्वीपासून सामना करत आहे. अशा वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरासाठी जी प्रचंड वीज सध्या लागत आहे व भविष्यात तिची वाढणारी मागणी लक्षात घेता, ही सर्व वीज हरित ऊर्जा अर्थात ग्रीन एनर्जी अथवा सौर ऊर्जा, अक्षय ऊर्जा यांच्या माध्यमातून उपलब्ध व्हायला हवी असा अनेक संशोधक आणि पर्यावरण अभ्यासकांचा आग्रह आहे. विजेची ही गरज भागवण्यासाठी काही संशोधक थर्मल एनर्जी आणि अणू ऊर्जेचा पर्यायदेखील समोर आणत आहेत. काही मोठय़ा डाटा सेंटर्सच्या जवळ अणुप्रकल्प उभारण्यासंदर्भात गांभीर्याने विचारदेखील केला जात आहे. काही संशोधक चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मानवी जीवन अधिक सुलभ, निरोगी, आनंददायी होण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक नक्की आहे. मात्र त्याच वेळी आपल्याला जीवन देणाऱया या निसर्गाची, या धरतीची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. )