>> प्रसाद कुळकर्णी
बालमोहन विद्यामंदिरची ती आठ वर्षे मी अगदी आजही, म्हणजे साठी पार केल्यावरही विसरू शकत नाही. फक्त आठवणी थोडय़ा धूसर झाल्यायत इतकंच.
बालमोहन विद्यामंदिर या शाळेचे संस्थापक शिवराम दत्तात्रय ऊर्फ दादासाहेब रेगे यांचा जन्म रत्नागिरी जिह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे गावात एका गरीब कुटुंबात झाला. 1921 पासून दादांनी हेदूल लोकल बोर्डाच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली, पण पुढे गावातील नोकरी सोडून दादा मुंबईला आले. 6 सप्टेंबर 1923 पासून दादा माटुंग्याच्या डेव्हिड ससून इंडस्ट्रियल अँड रिफॉर्मेटरी स्कूलमध्ये -लहान मुलांच्या तुरुंगात- शिक्षक म्हणून काम करू लागले. दादांनी या मुलांशी प्रेमाने बोलून, आपुलकीने मुलांना बोलते करून त्यांच्याशी दोस्ती केली. त्यांना चांगल्या सवयी लावल्या. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या परिस्थितीची, संगतीची, वाईट सवयींच्या कारणांची वगैरे माहिती दादांना मिळत असे. खेळ, स्पर्धा, सहली, बागकाम असे अनेक उपक्रम शाळेत सुरू झाले. मुलांमध्ये व्यवसाय शिक्षणाची आवड निर्माण झाली. 1939 मध्ये प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी दादांनी ही नोकरी सोडली. 3 जून 1940 रोजी दादांनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिराची स्थापना केली. 1940 मध्ये 8 मुले व चार शिक्षक घेऊन सुरू झालेल्या विद्यामंदिरात मुलांची संख्या तेराशेपर्यंत गेली व 53 शिक्षक झाले. शाळेची प्रगती वेगाने होत गेली. माध्यमिक शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पंचवीस वर्षांत त्रेसष्ट मुले चमकली. दादांनी स्थापन केलेल्या बालमोहन विद्यामंदिर शाळेला आज आठ दशकं उलटून गेलीयत. आज इतक्या वर्षांनी म्हणजे मी शाळा सोडून जवळ जवळ पाच दशकं उलटून गेल्यावरही (1964-1970) शाळेच्या नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच उभे राहतात. इयत्ता सातवी उत्तीर्ण झाल्यावर आम्ही ठाण्याला राहायला गेल्यामुळे मला शाळा सोडावी लागली, परंतु त्यानंतर एखाद्या समारंभाच्या निमित्ताने किंवा दुसऱया कोणत्याही कारणाने शाळेत जाण्याचा आलेला योग मी कधीही दवडला नाही. शाळेत शिरताच मन जुन्या आठवणींत कधीच पोहोचलेलं असायचं. संपूर्ण शाळेतून एकदा फिरून आलं की, खूप खूप बरं वाटायचं. शाळेच्या सुसज्ज सभागृहात शिरताच डोळ्यांपुढून तो जुना काळ अलवार सरकायचा. एखाद्या सणाच्या किंवा विशेष दिनाच्या निमित्ताने अथवा एखादा शैक्षणिक, प्रबोधनात्मक चित्रपट दाखवण्याच्या निमित्ताने आम्हाला याच सभागृहात रांगेने आणलं जायचं. देवी सरस्वतीच्या भव्य चित्रपडद्याची पार्श्वभूमी असलेल्या रंगमंचावर आमची नजर शोधत असायची दादांना. नियोजित वेळेवर दादांचं आगमन व्हायचं. पांढऱयाशुभ्र लांब कोटातील ती दादांची भव्य मूर्ती आजही माझ्या नजरेसमोर अगदी जशीच्या तशी उभी आहे. रंगमंचावर येऊन त्यांनी हातातली काठी उंचावली की, सारीकडे क्षणांत शांतता पसरत असे. आधाराव्यतिरिक्त या काठीचा उपयोग दादांनी एवढाच केला. ‘छडी लागे छमछम’ यावर त्यांनी कधीच विश्वास टाकला नाही. मुलांच्या (दादांच्या बाळांना) शरीराला नाही, तर मनाला वळण लावले पाहिजे यावर त्यांचा विश्वास होता.
ऋषितुल्य अशी ही व्यक्तिमत्त्वं विशिष्ट कार्यासाठीच जन्म घेत असतात. शिक्षणक्षेत्रात तरी बजबजपुरीचा प्रवेश न झालेला असा तो काळ होता. अनेक विद्वान, निःस्वार्थी व्यक्ती तन-मन-धनाने या पवित्र क्षेत्रात निरलसपणे कार्य करत होत्या. उद्दिष्ट एकच…समोरच्या विद्यार्थ्यांना सुसंस्कृत आणि सुशिक्षित करून सोडायचं. दादा तर यामध्ये अग्रभागी होते. आदर्श शाळा म्हणजे काय? याचं उत्तर ज्याने एकदा पूर्ण शाळा फिरून पहिली, त्याला लगेच मिळेल. आमच्या शाळेतील गुरुजनही, होय! गुरुजनच म्हणतो मी त्यांना. दादांसारखे तेही विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा घडवणारेच होते. ‘शिस्त, वेळेचं महत्त्व आणि प्रेम’ या त्रिसूत्रीवर दादांची बालमोहन नांदत होती.
शाळेच्या बालवर्गापासून सगळ्या शिक्षिकांच्या नावापुढे ताई लागायचं…इंदूताई, कुसुमताई, ताराताई आणि पुढे परब सर, पिंपुटकर सर, रावले सर ही काही नावं आजही आठवतात. आपले सण, राष्ट्रीय दिवस, थोर व्यक्तींच्या पुण्यतिथी – जयंती या सगळ्याचं महत्त्व आमच्या मनावर कायमचं कोरलं गेलं ते या शाळेमुळे. शाळेच्या प्रत्येक विभागाकडे दादांचं काटेकोरपणे लक्ष असायचं. मनात विचार येतो, किती मेहनतीने, अथक परिश्रमांनी आणि उदात्त हेतूने ही संस्था दादांनी उभी केली असेल.