>> प्रसाद कुळकर्णी
आपण थोर व्यक्तींच्या कार्याला समजून घेण्याचा प्रयत्न न करता फक्त त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामागचा उद्देशही महान असतो असंही नाही. वैयक्तिक स्वार्थ किंवा त्यांच्यामुळे मिळणाऱ्या उथळ प्रसिद्धीचा हव्यास इतकाच उद्देश त्यामागे असतो आणि तोही सफल झाला नाही, तर त्यांच्याच नावाने शंखही करत सुटतो गावभर. म्हणून अशा व्यक्तींना त्यांच्या कार्यातून जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आपण खरोखर त्यांच्या जवळ जाऊ. त्यांना सलाम करत राहण्यापेक्षा त्यांच्या कार्याला करू.
एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीवर, so called सेलिब्रिटीवर त्यांचे चाहते किती प्रेम करतात ना? अर्थात ‘चाहते’ हा शब्द आज फारच उथळ झालाय म्हणा! चित्रपटसृष्टीतल्या तारेतारकांचे अमाप चाहते, ज्यांना इंग्रजीत हे म्हणतात. यांचं प्रेम इतक्या टोकाचं असतं की, त्यांच्याकडून घडणाऱया लहानशा चुकीलाही हे चाहते माफ करत नाहीत. अगदी हाच अनुभव क्रिकेटर्सनासुद्धा एकेकाळी येत असे. चाहत्यांचं प्रेम हे असंच असतं, जे आपल्या हृदयात बसवतं आणि कोणत्याही क्षणी हृदयातून जमिनीवर आपटून टाकतं. हे खरंच प्रेम किंवा चाहणं असतं का ? की त्या चंदेरी दुनियेशी, झगमगाटाशी, सौंदर्याशी, झटपट प्रसिद्धीशी आकर्षित होत असतं? कोण जाणे! आणि तसंही चाहते आकर्षित होत असतात ते त्या व्यक्तीकडे, त्यांच्या आतल्याबाहेरच्या गोष्टींकडे, त्यांच्या प्रसारित होणाऱया चविष्ट बातम्यांमध्ये, ना की त्यांच्या सादरीकरणाकडे, त्यांच्या कलेकडे, त्यांच्या अभ्यासाकडे, ते जे आपल्याला देऊ पाहतात त्याकडे.
म्हणजे मग आम्ही खरंच त्यांचे चाहते असतो का ? हा एक खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
आता या सगळ्यांपासून काही व्यक्ती वेगळय़ा असतात. त्या आपल्या क्षेत्रात तनमनाने गढून गेलेल्या असतात. विविध विषयांवर आपल्या सखोल ज्ञानातून आणि व्यासंगामधून समाजोपयोगी काही निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सतत सुरू असतो. निःस्वार्थ भावनेने या व्यक्ती आपल्या कामात रममाण झालेल्या दिसतात. अशा व्यक्तींची नाळ जमिनीशी घट्ट जोडलेली असते. आपल्या कामाव्यतिरिक्त त्या सदैव आपल्यातल्या सर्वसामान्य वाटतात आणि अगदी सहजपणे त्या एकरूप होऊनही जातात. इथे उथळ काहीही नसतं. खळखळाट नसतो. सगळं शांत, सखोल, ओघवतं, ज्ञानवंत असतं.
आपल्या विदत्तेने, बुद्धिमत्तेने हजारो, लाखोंच्या समुदायात या व्यक्ती चमपून उठतात. आपलं सामाजिक ध्येय गाठण्यासाठी ही माणसं दिवसरात्र एक करतात. आता सगळ्याच थोर किंवा महान व्यक्ती वैयक्तिकदृष्टय़ा वृत्तीने, हृदयाने किंवा मनाने विशाल असतात, असा दावा मी अजिबात करणार नाही. आपल्या अफाट कार्याने सुप्रसिद्ध झालेल्या अनेक व्यक्ती मनाने, वृत्तीने संकुचित असतात , आत्मकेंद्रित असतात. असो, मुद्दा तो नाही.
कारण गाय काय खाते ते पाहायचं की काय देते ते?
अशा महान, थोर किंवा आपल्या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात जिवापाड मेहनत करून, काम करून झालेल्या आणि आजन्म मातीच्या पायांनी जगणाऱया या व्यक्तींना आपण अनेकदा सर्वसामान्य माणसांप्रमाणे तोलू पाहतो, सर्वसामान्य माणसांचे नियम त्यांना लावू पाहतो किंवा त्यांच्या चांगल्या, मोकळ्या वागण्याचा फायदा घेऊन त्यांना आपल्या स्तरावर आणू लागतो. त्यांच्याकडून वैयक्तिक अपेक्षा ठेवतो. या व्यक्ती आपल्याशी मोकळेपणाने वागतात, बोलतात हा त्यांचा मोठेपणा असतो, परंतु ते अंतर कायम राखूनच आणि आदर बाळगूनच आपली वागणूक त्यांच्याशी असायला हवी.
आता कुणी म्हणेल, अहो, तीही माणसंच आहेत की! मग त्यांना सर्वसामान्यांचे नियम का नाही लावायचे?
अहो, ही माणसं जरी सर्वसामान्य माणसांप्रमाणेच अवयव, भावभावना ल्यालेली असली तरी त्यांच्या मनाचा एक कोपरा सतत आपल्या कार्यक्षेत्राच्या विचारात गढलेला असतो. त्यांचं विचारचक्र सतत सुरू असतं आणि त्यामधूनच त्यांना काही नवं सुचत असतं, जे समाजाच्या उत्कर्षासाठी, प्रबोधनासाठी, आनंदासाठी जन्म घेत असतं. आपण थोर साहित्यिक पुलंच्या बाबतीत वाचलं असेल की, अनेकदा त्यांना नुसतं पाहायला, विनाकारण भेटायला त्यांचे चाहते येत असत आणि सुनीताबाई पु.ल. घरात नाहीत असं सांगून त्यांना वाटेला लावत असत. अर्थात सुनीताबाईंच्या या वागणुकीचा त्या चाहत्यांना राग येत असे, पण त्यांनी या गोष्टीची पर्वा केली नाही. कारण पु.ल. त्या वेळी आपल्या लेखनसमाधीमध्ये गढून गेलेले असायचे. अशा वेळी इतक्या क्षुल्लक कारणासाठी त्यांना त्यामधून बाहेर काढणं म्हणजे त्यांची लेखनसमाधी भंग करण्यासारखंच होतं. सुनीताबाईंना ठाऊक होतं की, भेटायला येणारे पुलंचा उगीचच वेळ घेऊन आपल्या वाटेने जाणार, त्यांच्यासोबत फोटो काढणार आणि प्रत्येकाला ‘मी पुलंना भेटून आल्याचा’ मोठेपणा सांगत सुटणार, परंतु त्यांच्या येण्याने आणि होणाऱ्या समाधीभंगामुळे एखाद्या आकार घेत असलेल्या साहित्यात खंड पडणार. सुनीताबाईंनी हे नेहमी होऊ दिलं असतं तर नुकसान आपल्यासारख्या वाचकांचं झालं असतं आणि आपण पुलंच्या अनेक अजरामर साहित्याला मुकलो असतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे की, यासाठी त्यांनी नेहमीच वाईटपणा स्वतःकडे घेतला. अर्थात याला जबाबदार कोण? तर आपणच. आम्ही अशा व्यक्तींच्या प्रेमात त्यांच्या कलापृतीपेक्षा जास्त पडतो. त्यांची निर्मिती, त्यांची कलाकृती, त्यांची प्रतिभा, त्यांचा व्यासंग यामधून ते जे समाजासाठी जन्माला घालत असतात, जे आपल्याला मनापासून देण्याचा प्रयत्न करत असतात ते त्या व्यक्तीपेक्षा खूप जास्त महत्त्वाचं असतं, पण आपल्याला हेच समजत नाही. श्रीराम आपला अवतार संपवून जेव्हा शरयू नदीमध्ये जलसमाधी घ्यायला निघाले तेव्हा संपूर्ण अयोध्यानगरी शोक करत त्यांच्या मागून निघाली. या सगळ्यामध्ये श्रीरामांना हनुमंत मात्र कुठेच दिसेना. कुणीतरी रामनामात मग्न असलेल्या हनुमंतांना श्रीरामांसमोर उभं केलं. श्रीरामांनी विचारलं,
“हनुमंता, तू आजवर सदैव माझ्या सोबत राहिलास. मग आज माझ्याबरोबर येणार नाहीस?’’
यावर हनुमंत उत्तरले,
“देवा, मी तुमच्यासोबत येऊन काय करू? माझं रामनाम इथे आहे. तुमच्या नामाचा, तुमच्या रामकथेचा मी भुकेला आहे. ती कायम माझ्या कानी पडत राहावी एव्हढीच माझी इच्छा आहे. हाच मला आशीर्वाद द्या.’’
म्हणजे रामापेक्षा मोठं आहे रामनाम, रामाचं कार्य, रामाचं मोठेपण, रामाचं एकपत्नीत्व आणि रामातलं माणूसपण. आपण थोर व्यक्तींच्या कार्याला समजून घेण्याचा प्रयत्न न करता फक्त त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामागचा उद्देशही महान असतो असंही नाही. वैयक्तिक स्वार्थ किंवा त्यांच्यामुळे मिळणाऱया उथळ प्रसिद्धीचा हव्यास इतकाच उद्देश त्यामागे असतो आणि तोही सफल झाला नाही, तर त्यांच्याच नावाने शंखही करत सुटतो गावभर. म्हणून अशा व्यक्तींना त्यांच्या कार्यातून जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आपण खरोखर त्यांच्या जवळ जाऊ. त्यांना सलाम करत राहण्यापेक्षा त्यांच्या कार्याला करू. शक्य होईल तेवढं त्यांच्या कार्यात हस्तक म्हणून सामील होऊ आणि हेही जमत नसेल तर त्यांच्या कार्यासमोर फक्त नतमस्तक होऊ…!