>> नीलेश कुलकर्णी , [email protected]
आंध्रात आजमितीस तरी मुख्यमंत्री जगनबाबूंचे म्हणजे जगन मोहन रेड्डी यांचे सरकार लोकप्रिय आहे. मात्र जगनबाबूंचे एकेक साथीदार त्यांची साथ सोडून जात आहेत. त्यात त्यांच्या सख्ख्या भगिनी शर्मिला यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. चंद्राबाबू जामिनावर बाहेर येऊन सहानुभूती एन्कॅश करत आहेत. थोडक्यात आंध्रचे राजकारणही तेलंगणाच्या वळणावर जाण्याची शक्यता दिसत आहे.
राजकारणात अनेक घटनांची पुनरावृत्ती होते. आंध्र प्रदेशचे राजकारण हे सध्या असेच इतिहासाच्या पुनरावृत्तीच्या आडवळणावर उभे आहे. काही महिन्यांपूर्वी तेलंगणाचे राजकारण असेच आडवळणावर गेलेले होते. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव काही महिन्यांपूर्वी तुफान लोकप्रिय होते. सर्व काही अनुकूल वातावरण त्यांच्या बाजूने होते. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय स्वारी करण्याच्या फुशारक्या त्यांनी मारल्या. मात्र त्याचवेळी काही नेते पक्ष सोडत होते त्याकडे सत्तेच्या धुंदीत रावांनी दुर्लक्ष केले. काँग्रेसला खिजगणतीतही धरले नाही. या सगळय़ाची अखेर विधानसभा निवडणुकीत रावांच्या दारुण पराभवात झाली. राजकारणात कायमस्वरूपी असे काहीच नसते याची न्रम जाणीवही चंद्रशेखर राव यांना आता झाली असेल. तेलंगणाचा हा ‘कोळसा’ उगाळण्याचे कारण म्हणजे अशाच घटना तेलंगणाची थोरली पाती असलेल्या आंध्रातही गेल्या काही महिन्यांपासून घडत आहेत.
आंध्रचे मुख्यमंत्री जगनबाबूंचे विश्वासू असलेले तरुण खासदार श्रीकृष्णा देवरायलू यांनी जगनबाबूंची साथ सोडली आहे. आता यात काय विशेष असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र गेल्या एका महिन्यात केवळ श्रीकृष्णा नाही तर तीन खासदारांनी वायएसआर काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे या गोष्टी हलक्यात घेता येणाऱया नाहीत. संजीवकुमार व बालाशौरी या अन्य दोन खासदारांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष सोडला आहे. पक्षाकडून त्यांना पुन्हा लोकसभेला संधी मिळणार नसल्याने हा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात असले तरी हा संदर्भ तेवढय़ापुरता मर्यादित नाही. चांगली कामगिरी केली आणि विकासकामे केली तरी जनता निवडून देतेच असे नाही. विशेषतः दक्षिणेकडील राज्यांची अशी परंपरा नाही. त्यात भाजपने नेहमीप्रमाणे आपले दरवाजे सगळय़ांसाठी खुलेआम उघडे ठेवलेले आहेत. एकीकडे चंद्राबाबूंसोबत बंद दरवाजाआड चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पवन कल्याण यांनाही भाजपने फशी पाडले आहे. या सगळय़ात जगनबाबू एकाकी पडणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत जगन रेड्डींच्या पक्षाने लोकसभेच्या 25 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या, तर विधानसभेत 175 पैकी 157 जागा दणदणीतपणे जिंकल्या होत्या. त्यामुळे जगन हे आंध्रातले सर्वात मोठे राजकीय प्रस्थ बनले. आंध्रात काँग्रेसची ताकद नसली तरी जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनी शर्मिला काँग्रेसमध्ये सामील झाल्याने ‘रेड्डी व्होटबँक’ नेमकी कोणाकडे जाणार, हा कळीचा मुद्दा आहे. जगन मोहन यांच्या व्होटबँकेत फाटाफूट झाली आणि चंद्राबाबूंच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली तर जगनबाबूंची गोची होणार आहे. त्यामुळे पक्षाला लागलेली गळती जगनबाबूंना तातडीने थांबवावी लागेल. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. दिल्लीच्या दमनतंत्राला अनेक जण बळी पडत आहेत. त्यात जगनबाबूंनी आजवर राज्यसभेत पडद्याआडून दिल्लीकरांना वेळोवेळी मदत केलेली असली तरी आंध्रात जगन रेड्डी प्रस्थापित होणे हे काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना परवडणारे नाही. त्यामुळेच या गळतीकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे. आपला चंद्रशेखर राव होणार नाही याची काळजी जगनबाबूंनी वेळीच घेतलेली बरी.
शेट्टर यांची ‘घरवापसी’
कर्नाटकाच्या राजकारणात जशाजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे नवनवे ‘प्रयोग’ रंगात येत आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपवर रुसून काँग्रेसवासी झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा अंतरात्मा अवघ्या सहा महिन्यांतच जागा झाला. केवळ भाजपच राष्ट्रहित करू शकते, असा साक्षात्कार त्यांना झाला. त्यामुळे जे. पी. नड्डांच्या कर्नाटक दौऱयाचा मुहूर्त साधून शेट्टर यांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकत राष्ट्रहितासाठी भाजपमध्ये घरवापसी केली. शेट्टर यांच्या घरवापसीने आता देशाचे किती हित होईल हे कळेलच. मात्र यानिमित्ताने राजकारण्यांच्या कोडगेपणाचा एक नमुना पुढे आला आहे. गेल्याच आठवडय़ात काँग्रेसचे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरिधर गमांग यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱया लिंगायत समाजाचे शेट्टर हे नेते आहेत. येडियुरप्पांचे पंख छाटण्यासाठी भाजप नेतृत्वाने शेट्टर, बसवराज बोम्मई यांच्यासारखी बुजगावणी उभी केली. मात्र त्यांना कानडी जनतेने साफ नाकारले. शेट्टर यांना अल्पकाळासाठी का होईना मुख्यमंत्रीपद मिळाले. मात्र विधानसभेला भाजपने तिकीट नाकारल्याने ते काँग्रेसमध्ये गेले, निवडणूक लढवली आणि काँग्रेसची लाट असतानाही सपशेल आपटले. काँग्रेसने नंतर त्यांची विधान परिषदेवर सोय लावून ते काँग्रेसमध्ये राहतील याची तजवीज केली. मात्र हे सगळे सोडून शेट्टर महाशयांनी लोकसभेच्या तिकिटाच्या अपेक्षेने कमळ हाती घेतले आहे. ते उमलते का, हे दिसेलच!
झुठी दुनिया, झुठे बंधन, झुठी है ये माया
‘झुठी दुनिया, झुठे बंधन, झुठी है ये माया’ हे भजन सध्या मध्य प्रदेशात लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अर्थात हे भजन कोणी बाबाबुवांनी गायलेले नाही किंवा कोणा कथावाचकाच्या भजनातून आलेले नाही. मध्य प्रदेशात मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे भाजपचे माजी मंत्री गोपाल भार्गव सध्या अध्यात्माच्या मार्गाला लागले आहेत, त्यांचे हे भजन आहे. हे गोपाल म्हणजे शिवराजमामांचे खासम्खास. मात्र दिल्लीची वक्रदृष्टी मामांवर पडली आणि मुख्यमंत्रीपदाचा लवाजमा मोहन यादवांसाठी सोडून, त्यागून मामांना शेतावर ट्रक्टर घेऊन जावे लागले. दुसरीकडे त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या गोपाल भार्गवांना विजनवासात जावे लागले. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भार्गव यांचे मन तसेही खट्टू झालेच होते. मोहन यादवांकडे मध्य प्रदेशाची जबाबदारी असल्याने आता राजकीय पुनर्वसन कठीणच आहे याची बहुधा भार्गव यांना जाणीव झाली असावी. याच जाणिवेतून एरवी पुढारी कपडय़ांमध्ये वावरणारे भार्गव सध्या भगवी वस्त्रs परिधार करून कथावाचन करत असल्याची चित्रे व्हायरल झाली आहेत. सागर जिह्यातील पटेरिया गावात भागवत कथेमध्ये गोपालराव जीवनाचे मर्म समजावून सांगत आहेत. 18 वर्षे मंत्रीपद उपभोगल्यानंतर त्यांना मानवी जीवनातील पह्लपणा प्रकर्षाने जाणवू लागला आहे. त्यातूनच ‘झुठी दुनिया, झुठे बंधन, झुठी है ये माया…’ हे जीवनाचे कटू सत्य ते सर्वांनाच सांगत आहेत. आता त्यांची ही उपरती किती खरी, किती खोटी हे त्यांचे त्यांनाच माहीत!