वेधक – काष्ठशिल्प संग्रहालय

>> मेघना साने

माध्यम कोणतंही असो सृष्टी आणि दृष्टी एकत्र आल्या की कलाकाराकडून वेगळं काहीतरी घडतं आणि रसिकांपर्यंत आपसूक पोहोचतं. कोलाड येथील रमेश घोणे यांचं नैसर्गिक काष्ठशिल्प संग्रहालय पाहताना असाच अद्वितीय अनुभव येतो. लाकडाच्या या कलाकृती मूर्त शैलीतलं सौंदर्यच दर्शवतात.

गणपतीपुळ्याहून रस्तामार्गे मुंबईला जाताना माणगावच्या पुकोलाड गाव लागतं. पर्यटकांनी या मार्गावर थांबून जरूर पाहावं असं रमेश घोणे यांचं नैसर्गिक काष्ठशिल्प संग्रहालय तेथे उभे आहे. एका दुमजली बंगलीत थाटलेले हे काष्ठशिल्पांचे प्रदर्शन म्हणजे झाडांच्या खोडातून नैसर्गिकपणे साकारलेल्या वस्तू आहेत. झाडे तोडली जातात, कोसळतात, पावसाळ्यात वादळांमुळे पडतात, वखारीत साठवलेली असतात. त्यातली काही टाकाऊ ठरतात. पण अशा टाकाऊतून केवळ टिकाऊच नव्हे, तर अत्यंत सुंदर अशी शिल्पं रमेश घोणे यांनी साकारली आहेत. एकाच माणसाने तयार केलेल्या या अनेक कलाकृती आपल्याला केवळ स्तिमित करून टाकतात. झाडाच्या खोडांमधून कलाकृती निर्माण करण्याचा हा छंद घोणे यांनी पन्नास वर्षं जोपासला होता. सत्तरीच्या जवळपास असताना त्यांना हृदयविकाराने गाठले आणि काळाने हिरावून नेले. पण त्यांच्या या सर्व कलाकृती आठवणी म्हणून कायमस्वरूपी जपण्याचा संकल्प त्यांचे पुत्र अमित यांनी केला आहे.

संग्रहालय पाहण्यापूर्वी आम्ही घोणे यांच्या घरी पोहोचलो. माझ्याबरोबर काही कवी मंडळीही होती. घोणे यांच्या सुनेने मानसीने आमचे स्वागत केले. खोडापासून तयार केलेल्या गुळगुळीत बैठकीवर आम्ही बसलो. आम्ही अनोळखी असूनही घरातील मंडळी आमच्याशी छान संवाद साधत होती. रमेश यांच्या पत्नी शशिकला यांचीही भेट झाली. रमेश यांच्या कलोपासनेला त्यांचा मनापासून पाठिंबा होता. रमेश यांचे नुकतेच निधन झाल्याने (सप्टेंबर 2024) घरातील मंडळी तशी दुःखात होती. आम्हाला त्यांच्या आठवणीही सांगत होती. रमेश यांच्या वडिलांची लाकडाची वखार होती. त्यासाठी झाडांची खोडं आणली जायची. त्यात रमेश यांना निरनिराळ्या पशुपक्ष्यांचे आकार दिसू लागले व त्यातून त्यांनी कलाकृती निर्माण करायला सुरुवात केली. यासाठी फारशा अवजारांची आवश्यकता भासली नाही. कारण मूळ आकारातच त्यांना चित्र दिसत होते. थोडे फेरफार करून टीकवूड पॉलिशने पेंट केले. रमेश यांच्या ऑफिसमध्ये घोणे यांनी तयार केलेल्या विशिष्ट प्रकारच्या लाकडी खुर्च्या होत्या. त्यावर बसल्यावर पाठीला एकदम आराम मिळतो. खुर्च्या, टीपॉय, प्लांट्स ठेवण्याचे शोभेचे स्टॅन्ड अशा अनेक वस्तूंची दाटी तेथे होती. त्यातील काही वस्तू वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या घरासाठी खरेदी केल्या होत्या, असं मानसी यांनी सांगितले.

काष्ठशिल्प संग्रहालय म्हणजे वेगळी अनुभूती आहे. अनेक प्राणी, पक्ष्यांच्या हुबेहूब लाकडी कलाकृती तिथे दिसत होत्या. सृष्टी आणि दृष्टी एकत्र आली तर अशी कलाकृती घडून येते…अमित सांगत होते. गरूड, मुंगूस, घोडे यांच्या बरोबरच काही संकल्पना मांडणारी शिल्पेही होती. उदाहरणार्थ, गणपती खांद्यावर घेऊन चाललेला माणूस, हसत खेळत पावले टाकणारा मुलगा, चिंतन करणारा मुलगा इत्यादी. ही सर्व शिल्पे अखंड लाकडाची होती. काही शिल्पे संदेश देणारीही होती. आठ बाय चारच्या एका मोठय़ा लाकडाच्या पाटीवर खालच्या भागात मदत मागणारे दोन हात आणि वरच्या बाजूला बेड्या घातलेले दोन हात यातून संदेश दिला होता की, बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. तसंच एका मोठय़ा खोडावर दोन स्त्रियांची शिल्पे होती. त्यांची केशभूषा व वेशभूषा पारंपरिक दिसत होती. त्यांच्या भोवती दोरी गुंडाळलेली होती. हे सर्व लाकडाचंच बरं का! या बंधनात असलेल्या स्त्रिया होत्या. याशिवाय दीपमाळ, ड्रेसिंग टेबल अशा वस्तूही लाकडातून बनवलेल्या होत्या. हे सर्व बनविण्यासाठी साग, आंबा, फणस, खैर, चिंच अशा झाडांची खोडे किंवा फांद्या वापरण्यात आल्या होत्या. एका झाडाला तर गाठ आली होती. त्यातून गरूड साकारला होता. मुंग्यांनी पोखरलेलं झाडसुद्धा उपयोगात आणलेलं होतं. एक आश्चर्यकारक कलाकृती मला दिसली. तेथे भिंतीवर एक पोस्टाची पेटी होती. पोस्टाची पेटी घरात कशी काय? असं आश्चर्य व्यक्त केल्यावर अमितने सांगितलं की, हीसुद्धा लाकडाची कलाकृती आहे.

या सर्व कलाकृतींवर वडिलांचा जीव होता. त्यामुळे या कितीही किमती असल्या तरी मला त्या विकायच्या नाहीत, अमित सांगत होते…फक्त खुर्च्या, टीपॉय अशा उपयोगी वस्तू आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करू. बाकी सर्व कलाकृती एक संग्रहालय म्हणून जपून ठेवू. या काष्ठशिल्प संग्रहालयाचं उद्घाटन 1997 साली झालं होतं. आता नूतनीकरणानंतर नव्या स्वरूपात ते लवकरच रसिकांसाठी खुलं होणार आहे. कोकणातील हे संग्रहालय आंतरराष्ट्रीय कीर्तीचंही होऊ शकतं इतकं देखणं आहे.