>> मनमोहन रो. रोगे
प्रत्येक ऋतू, पर्यावरण अशा गोष्टी लक्षात घेऊन लोकांना आनंद मिळावा, पर्यावरणाचे आणि लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे याचे भान ठेवून आपल्या पूर्वजांनी सण-उत्सवांची निर्मिती केली आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. आपला प्रत्येक सण पर्यावरणाला पूरक आहे. पर्यावरणातील घटकांचे महत्त्व पटवून देणारा आहे. पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करणारा आहे. मात्र काळाच्या ओघात त्यात काही अनिष्ट प्रथा, संकल्पना घुसल्याने त्यातील मांगल्य, पावित्र्य कमी होऊन पूर्वजांच्या उद्दिष्टास आणि आपल्या संस्कृतीस, धर्मास आपण गालबोट लावत आहोत. नेमका याचाच फायदा हिंदूविरोधी लोक, स्वतःला पुरोगामी म्हणवणारे घेतात. अलीकडच्या काळात हिंदू धर्म, देव-देवता, सण-उत्सव, रीती-परंपरा यांच्यावर टीका-टिपणी केली, त्यांची निंदा-नालस्ती केली की, तो पुरोगामी समजला जातो. बरे, त्यांनी कितीही टीका केली तरी अतिसहिष्णू हिंदू विरोध करण्याची शक्यता नसते. त्यामुळे त्यांनाही ते सोपे होते. म्हणूनच हिंदूंच्या प्रत्येक सणाअगोदर तो कसा चुकीचा आहे, वाईट आहे हे पटवून देण्यासाठी मोठय़ा अक्कलहुशारीने सोशल मीडियावर मेसेज फिरवतात. रक्षाबंधनाच्या सणादरम्यान महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली आजच्या काळातील मुली स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे त्यांना स्वरक्षणासाठी कोणाचीही गरज नाही अशा आशयाचे मेसेजेस फिरतात. वास्तविक रक्षाबंधन हा सण केवळ भावाने बहिणीचे रक्षण करण्यासाठी नसून त्या दोघांचे नाते अधिक दृढ व्हावे याकरिता साजरा करतात. तसेच दिवाळीच्या वेळी ‘दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. फटाक्यांचा नाही. त्यामुळे फटाक्यांचा वापर टाळा’ असे म्हणणारे इतर धर्मांच्या सणांमध्ये होणाऱया फटाक्यांच्या वापराबाबत मौन धरतात. महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर केला जाणारा दुधाचा अभिषेक असो वा होळीला पाण्याचा केला जाणारा वापर असो, प्रत्येक सणाला चुकीचे ठरवणारे मेसेज प्रत्येक वर्षी फिरतात. गेल्या काही वर्षांत गणपती सणापूर्वी ‘गणपतीला मोदक नको वही द्या’ असा एक मेसेज फिरतो. श्री गणेश ही विद्या-कलांची देवता. प्रथम पूजेचा मानही गणेशालाच. त्याचे वाहन उंदीर. त्याला दूर्वा-लाल फुले, मोदक आवडतात असे उल्लेख आढळतात व तसे मानले जाते. गणेश विद्या-कलेची देवता आहे, तर त्याची उपासना करणाऱयांनी विद्या-कलेची उपासना केली पाहिजे हे ओघाने आलेच. तो गणांचा पती आहे म्हणून त्याची पूजा करणाऱयांनी समाजातील शोषित, पीडित, मागास यांच्यासाठी कार्य करून शिक्षणापासून वंचित असलेल्यांना शिक्षण मिळेल असे कार्य केले पाहिजे हे खरे. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवात शैक्षणिक साहित्य जमवून ते गावोगावच्या गरीब विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम हाती घेतल्यास तीही एक प्रकारची गणेश पूजाच ठरेल, पण त्यासाठी ‘गणपतीला मोदक नको, वही द्या’ हे म्हणणे योग्य कसे? गणपतीस मोदक देणारे कधीही वही-पेन देऊ नये असे म्हणत नाहीत, पण वहीचा आग्रह करणारे मात्र ‘गणपतीस मोदक नको’, असा दुराग्रह करताना दिसतात. त्याऐवजी ते ‘गणपतीस मोदकासह वही-पेन द्या’ असे का नाही म्हणत ? आमच्या देवतांसोबत काही वार, वस्तू, वृक्ष, प्राणी यांना महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे कोणत्याही देवतेचे नाव घेतले की, त्याचे वाहन, त्या देवतेचा ठरावीक वार, त्याला आवडणारा पदार्थ-फुले हेही आठवते. त्यामुळे त्या देवतेला आवडणाऱया गोष्टी भक्त यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करतो. असे असताना नेहमीच हिंदूच्या धार्मिक भावनेला तोडण्याचे काम का करताय? हल्ली सणासुदीला नकली, बनावट माव्याचे पदार्थ सर्रास विकले जातात म्हणून मोदक नको असे म्हणणे असेल तर तसे सांगितले गेले पाहिजे, पण मोदकच नको म्हणजे मग ज्या श्रद्धेने भाविक आपल्या घरी मोदक बनवतात त्यालाही अव्हेरणे नव्हे का? गणपतीला मोदक नको म्हणणे म्हणजे करोडो भाविकांच्या श्रद्धेला लाथाडणेच नव्हे का? आज मोदक नको म्हणतात, उद्या म्हणतील दूर्वा-फुले नको, परवा आरती-भजन नको, त्यानंतर मंडप सजावट नको आणि हे सगळे झाल्यावर काही वर्षांनी गणपतीच नको असे म्हणतील. खरे तर हिंदू धर्मासारखा परिवर्तनवादी, सुधारवादी दुसरा धर्म नाही. हिंदूंनी काळानुरूप काही रूढी-पद्धती बंदही केल्या. इतर धर्मांत तसे झालेले दिसत नाही. आज हिंदूंमध्ये असंख्य लोक देव-ईश्वर-परंपरा न मानणारे आहेत. तरीही ते हिंदूच आहेत. समाजावर कोणतेही संकट आले (पूर, दुष्काळ, भूकंप) की, हिंदू मंदिरातून मदत केली जाते. कितीतरी गणेशोत्सव मंडळांचे, मंदिरांचे सामाजिक कार्य बारा महिने सुरू असते. लाखो रुपये दान देतात. आमच्या देव-देवतांना आम्ही काय द्यावं हे सांगण्याचा अधिकार या मंडळींना कुणी दिला?