प्रासंगिक – भारतीय बालकलाकारांचा युरोप दौरा

>>> मंजुल भारद्वाज

अंधाधुंद विकासाने पृथ्वीचा ओझोन थर फाडला आहे आणि जगाला आपत्तीच्या उंबरठय़ावर आणून ठेवले आहे. प्रत्येक जण त्याचा बळी पडत आहे. भारतातील सुशिक्षित वर्ग जंगले तोडून बहुमजली इमारतींमध्ये एसी बसवण्याला आपल्या विकासाचा पुरावा मानतो. खरं पाहता एक झाड शंभर एसीपेक्षा सशक्त आहे. विकासाच्या संकल्पनेचा सध्याचा मानवी मापदंड मती कुंठीत करणारा आहे आणि या संकल्पनेत जे पाणी, हवा आणि ऊर्जेवर सर्वात जास्त खर्च करतात ते श्रीमंत आहेत आणि जे कमी संसाधनांवर जगतात ते गरीब आहेत. याउलट, जे कमीत कमी साधनसंपत्तीसह जगतात आणि जंगलांचे रक्षण करतात ते पृथ्वी आणि निसर्गाचे मित्र आहेत, आणि जे जास्त ऊर्जा वापरतात ते शिक्षित आणि विकसित लोक पर्यावरण, निसर्ग आणि पृथ्वीचे शत्रू आहेत.

जगाचा हाच दृष्टिकोन बदलण्यासाठी भारतातील पाच बाल कलाकार एका अनोख्या मिशनवर निघाले आहेत! त्यांच्या ‘द..अदर वर्ल्ड’ या नाटकाद्वारे जगाला जाणीव करून देण्यासाठी ही मुले 72 दिवस युरोपात जाणार आहेत. या प्रवासादरम्यान शाळा, नाटय़गृहे आणि विविध समुदायांमध्ये हे नाटक रंगणार आहे.

जर्मनीच्या Kinder Kultur Karawane तर्फे आयोजित या बालसंस्कृती महोत्सवात जगातील विविध खंडातील सांस्कृतिक मुलांचा आणि तरुणांचा समूह सहभागी होत आहे. आंतरखंडीय सांस्कृतिक समूहांचा हा अनोखा संगम असणार आहे.

थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय़ सिद्धांताने गेल्या 32 वर्षांपासून जगाला अधिक मानवीय बनविण्याच्या आपल्या रंगकर्माने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. याच उद्दिष्टाने पर्यावरण, पृथ्वी आणि हवामान वाचण्यासाठी ‘द..अदर वर्ल्ड’ हे नवीन नाटक युरोपमध्ये प्रस्तुत केले जाणार आहे. हे नाटक जर्मनी आणि युरोपमधील कोलोन, हॅम्बर्ग, रोडेफ्जल, वॉफेन, रोडेस्तान, आचेन, लेव्हरपुसेन आदी विविध शहरांमध्ये प्रस्तुत होणार आहे. थिएटर ऑफ रिलेव्हन्स नाटय़ सिद्धांताने नाशिक जिल्ह्यातील अंजनी पर्वतरांगांच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या चिखलवाडी (आदिवासी पाडा) गावात गेल्या वर्षी डिसेंबर 2023 ते जून 2024 या कालावधीत पाच दिवसीय निवासी नाट्य कार्यशाळांची मालिका आयोजित केली होती. आणि या कार्यशाळांचा मुख्य विषय ‘ecology आणि porerty’ समजून घेऊया हा होता.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या प्रेरणेने, 12 ते 18 वर्षे वयोगटातील 20-25 मुलांनी या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. यातील 5 मुलांनी रंगनिर्मितीच्या सरावासाठी स्वतःला झोपून दिले. त्यांची नावे अशी : प्रांजल गायकवाड (14 वर्षे) – नाशिकमध्ये राहणारी, दहावीत शिकत आहे. राधिका गाडेकर (14 वर्षे) – पिंपळगाव (नाशिक) येथील, नववीत शिकत आहे. नेत्रा देवाडिगा (13 वर्षे) – डोंबिवलीतील, दक्षिण भारतातील कुटुंबात जन्मलेली, 8 वीत शिकत आहे. तनिष्का लोंढे (16 वर्षे) – रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील, 10 वीत शिकत आहे. संजर शिंदे (14 वर्षे) – या गटातील एकुलता एक मुलगा आहे.

या पाच मुलांनी पर्यावरणशास्त्र आत्मसात करण्यासाठी स्वतःला निसर्गाशी जोडले. रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘द… अदर वर्ल्ड’ हे नाटक नेत्रा देवाडिगा, प्रांजल गायकवाड, राधिका गाडेकर, तनिष्का लोंढे आणि संजर शिंदे हे बालकलाकार सादर करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री व थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांतच्या अभ्यासक अश्विनी नांदेडकर आणि सायली पावसकर, कोमल खामकर यांच्या मार्गदर्शनासह, या कलाकारांनी ‘द… अदर वर्ल्ड’ हे नाटक तयार केले आहे! थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे रंगप्रणेते मंजुल भारद्वाज यांच्यासह हे बालकलाकार 14 सप्टेंबरला युरोपला भरारी घेणार आहेत.

‘द…अदर वर्ल्ड’ या नाटकात पाच तत्त्वांच्या उत्पत्तीपासून सजीव आणि मानव यांच्या निर्मितीचा प्रवास आहे. मानवाने हिमयुगातून अश्मयुगात आणि अश्मयुगातून शेती व पशुपालनाकडे कशी वाटचाल केली, संपत्तीचे निर्माण करत मनुष्य दास्यत्व गुलामगिरी आणि सरंजामशाहीच्या अंधकारात कसा गुरफटत गेला. औद्योगिक क्रांतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादनाद्वारे भांडवलशाही आणि साम्यवादाला जन्म दिला. मानवी कल्याणाचे सर्व मार्ग इकॉलॉजी, पर्यावरण आणि हवामान नष्ट करत आहेत आणि आज आत्मघातकी बनले आहेत.

मानवी विकासाच्या विकृत आकलनाला योग्य दिशा देत मानवता, पृथ्वी, पर्यावरण आणि हवामान यांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन करण्यासाठी हे नाटक महत्त्वाचे ठरणार आहे.

(लेखक ज्येष्ठ व प्रसिद्ध रंगकर्मी आहेत)