मुद्दा – ‘खरा संवाद हरवला’

>> लीना वालावलकर

माणूस हा कळपाने राहणारा प्राणी. संवादाशिवाय माणूस सापडणे कठीण. अत्याधुनिक यंत्रामुळे माणूस कोसो अंतर पार करून जवळ आला. मोबाईल, इंटरनेट यामुळे लांबचा माणूस जवळ आला. संवाद होऊ लागला. कुठेही राहून डॉक्टर कुठल्याही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करू लागले. औषध, सिनेमा, दळणवळण, सर्वच क्षेत्रात माणूस उत्तम प्रगती करू लागला. एकीकडे माणूस प्रगत होत असताना दिसतो तर दुसरीकडे तो एकलकाsंडा, निराश, असमाधानी दिसतो. पूर्वी माणसाकडे दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट अशी अध्यावत उपकरणे नव्हती, पण माणूस हा ‘माणूस’ होता. माणसामाणसात एकी होती, सहकार्याची भावना होती. गावात कुणाचे लग्न असेल तर सारा गाव लग्नमय व्हायचा. लग्न घर असे वेगळे वाटायचे नाही. सर्व गाव उत्साहाने व आनंदाने सहभागी होत असे. गावात कुणाचे मयत झाले तर अख्खा गाव दुःखात बुडून जात असे. आता शहरात सोसायटी/बिल्डिंगमध्ये लग्न असेल तर आमंत्रण असल्यास हॉलवर जातात, तर मयत झाल्यास तिथे तासभर जाऊन आपआपल्या कामाला लागतात. आज प्रगत माणसाचे मूळ ‘माणूसपण’ हरवलंय. एकमेकांना प्रत्यक्ष भेटणे कमी झाले आहे. त्यामुळे संवाद हरवला आहे. तब्येत बरी नसताना घरी वा इस्पितळात स्वतः येऊन आजारी माणसाला भेटणे, त्याची चौकशी करणे यामुळे आजारी माणसाला बरे वाटते. माणसाचा माणसाला आधार वाटतो. तो इतरांच्या माया, ममता, सहानुभुतीमुळे आजारातून लवकर बरा होतो. वेळ नसल्याचे कारण देत दूरध्वनीवरून किंवा व्हॉट्सअॅपवरूनच विचारपूस केली जाते.

वाढदिवसाला व परीक्षेसाठी जाणाऱयांना शुभेच्छा देणे, त्या शुभेच्छांचे मोल किती अमूल्य असते हे त्या त्या ‘उत्सवमूर्ती’लाच ठाऊक. गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील ‘सहकार’ हा शब्दसुद्धा हरवत चालला आहे. यावर वेळीच उपाय शोधून ते कार्यान्वित केले नाहीत तर अनर्थ ओढवेल. भारतीय संस्कृतीत तर ‘अतिथी देवो भवः’ म्हणजे येणाऱया पाहुण्यालासुद्धा देवा समान मानून त्यांचे आदरातिथ्य केले जाते, त्यांना हवे नको ते आपलेपणाने पाहिले जाते. मुले दर सुट्टीत हक्काने मामाच्या गावाला जात होती. आजी, आजोबा, मामा, मामी, मामे भाऊ, मामे बहीणी, मावशी, मावस भाऊ, मावस बहिणी सर्वांशी संवाद साधला जात असे, मग पूर्ण वर्षे उत्साहात जात असे. आता बऱयाच मुलांना मामाचा गावच उरला नाही. मामाचा गाव आपल्या ‘माणसाच्या’ यादीतून पुसला गेला. त्याचबरोबर मायेचा, आपुलकीचा ओलावा आटत गेला. सुट्टीतसुद्धा शिबीर, छंद वर्ग या नावाखाली मुलांना जणू डांबून ठेवलं जाऊ लागलं. इथेसुद्धा मुलं आई-वडिलांपासून मनाने दुरावत चालली, कारण आई-वडिलांना एकाच वेळी सुट्टी मिळेनाशी होऊ लागली आणि मुलांना घेऊन बाहेर फिरायला एकत्र जावे तर तेही अशक्यप्राय होऊ लागले. आई-वडिलांच्या सततच्या व्यस्त राहण्यामुळे घरातला संवादही हरपला. यामुळे आपल्या मुलांच्या मानसिकतेवर किती वाईट परिणाम होईल याचा विचार करण्याइतकाही वेळ पालकांकडे उरलेला नाही. अधिक संपत्तीच्या हव्यासापोटी दोघांनाही नोकरी करणे अपरिहार्य होऊन बसले आहे. तशात मुलांचे आजी-आजोबा नसणं किंवा असले तरी ते लांब असणे, त्यांच्याशी संवाद नसल्यामुळे त्यांचे सहकार्य मिळणेही धुसर होऊ लागले. मग मुलांना पाळणाघरात ठेवण्याशिवाय पर्यायच नसतो. मुलांना पाळणाघरात ठेवल्याने मुले एकलकाsंडी होणे, इतर मुलांच्या सहवासात होणारे चांगले व वाईट संस्कार, याला जबाबदार कोण हे शोधत बसण्यापेक्षा हरवलेला संवाद कसा पूर्णप्रस्थापित करता येईल याचा विचार करून कृती करावयास हवी.