सूरताल- आवड-निवड

>> किरण खोत

कोणतीही कला शिकण्यासाठी त्या कलेची उपजत आवड किती आहे यासोबत योग्य मार्गदर्शक असणेही तितकेच महत्त्वाचे. म्हणूनच एखाद्या संस्थेत शिकण्यास जाण्यापूर्वी त्या संस्थेचा एकूण अनुभव, त्यांचे होणारे वार्षिक कार्पाम, विद्यार्थ्यांना दिले जाणारे शैक्षणिक साहित्य या सगळय़ाचा सारासार विचार करूनच मग प्रशिक्षणासाठीची संस्था निश्चित करावी.

संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य या तीन कलांचे संमिश्रण. प्रत्येक कलेचे स्वतंत्र उपविभाग हे आहेतच. जसे की, गायनात शास्त्राrय गायन पण शिकता येते आणि सुगम संगीतही शिकता येते. वादनात कुणाला तालवाद्य वाजवायला आवडते, तर कुणाला सूरवाद्य. नृत्यात कुणाला भरतनाटय़म, कथकसारखी शास्त्राrय नृत्ये करायला आवडतात, तर कुणाला बॉलीवूड, टॉलीवूड किंवा मराठी ट्रेंडिंग गाण्यावर ताल धरायला आवडतो.

सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस कसा पाडता येईल या संभ्रमात न अडकता ज्याने त्याने प्रथम त्याच्या आवडीनिवडीचा विचार करावा आणि आपल्या आवडत्या कलेत शिक्षण घ्यावे. त्यासाठी एक चांगल्या दर्जाचा ऑनलाईन किंवा

ऑफलाईन क्लास लावावा. योग्य मार्गदर्शक गुरू मिळणे हे खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच एखाद्या संस्थेत शिकण्यास जाण्यापूर्वी त्या संस्थेचा एकूण अनुभव, त्यांचे होणारे वार्षिक कार्पाम, विद्यार्थ्यांना दिले जाणारे शैक्षणिक साहित्य या सगळय़ाचा सारासार विचार करूनच मग प्रशिक्षणासाठीची संस्था निश्चित करावी.

लक्षात असू द्या, पदव्या देणारी अनेक विद्यापीठे उपलब्ध आहेत, पण जर तुम्हाला या क्षेत्रात पुढे जाऊन करीअरची संधी हवी असेल तर मुंबई विद्यापीठासारखे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयासारख्या राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेकडूनच संगीताचे औपचारिक शिक्षण घ्यावे. पण ज्याला आपल्या समाधानासाठीच शिकायचे आहे किंवा कार्पामात सादरीकरणासाठी प्राथमिक माहिती हवी असण्यासाठी शिकायचे आहे अशा व्यक्तींनी अनुभवी गुरू शोधून संगीताचे शिक्षण घेण्यास काहीही हरकत नाही. बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्याला या गोष्टीची जाणीव होईल की, संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळी खरे तर पुस्तकी ज्ञानासाठी शिष्याची निवड करतच नाहीत. त्यापेक्षा तो विद्यार्थी किती उत्तमरीत्या रियाज करतो आहे, शिकवलेल्या गोष्टीकडे लक्ष देतो आहे याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. गुरुकुल शिक्षण पद्धतीत शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे म्हणूनच तुलनात्मकरीत्या अधिक तरबेज असतात.

शिकण्यापूर्वी विद्यार्थ्याने आपला शिकण्यामागचा उद्देश निश्चित करायला हवा. हे समजून घ्यायला हवे की, आपण नक्की कशासाठी हे शिकतोय. ज्याला स्वतच्या मनाच्या आनंदासाठी शिकायचे आहे, त्याने कुठलीच घाई व गडबड न करता स्वरताल पक्के करत पार्श्वसंगीत शिकून घ्यावे. इथे तुम्ही लोकांसमोर सहसा सादरीकरण करत नाही. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही तुमचा आवाज किंवा वाद्य ध्वनिमुद्रित करता. त्यामुळे तुमची देहबोली, तुमचे सादरीकरण कौशल्य यापेक्षा तुमची स्वरतालावरची पकड जास्त महत्त्वाची ठरते.

परंतु जर तुम्हाला आपली कला चारचौघांत सादर करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ते सादरीकरण उत्तम कसे करता येईल, तुमचा पेहराव काय असेल, तुमची देहबोली यांसारख्या अतिरिक्त गोष्टींचासुद्धा रियाजासोबत अभ्यास करायला हवा.

अर्थातच यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्याने त्याने आपल्या आवडीनिवडीनुसार, आपल्या हेतूनुसार संगीतात शिक्षण घ्यावे. कारण संगीत हा जरी अभ्यासाचा विषय असला तरीही त्याचे दडपण न घेता त्यातला आनंद मनमुरादपणे लुटता येतो आहे का, याकडे लक्ष द्यावे आणि संगीताच्या स्वरतालात दंगून जावे.

(लेखक आवाज संगीत विद्यालयाचे संस्थापक आहेत)