मुद्दा – बिहारमधील नितीश ‘राज’नीती

>> जयंत माईणकर

संयुक्त जनता दलाचे युनायटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी 2005 पासून बिहारमध्ये एक नवा ट्रेण्ड सुरू केला आहे. मला पाठिंबा कोणाचाही असेल, पण माझ्या कुर्मी समाजाच्या मतांच्या भरवशावर बिहारचा मुख्यमंत्री मीच असेल हा तो ट्रेण्ड.

पक्षफोडीच्या राजकारणात एकाच वेळी भाजप, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस या पक्षांना आपल्या इशाऱयावर खेळवण्यात आणि स्वतःकडे बिहारचे मुख्यमंत्रीपद ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आतापर्यंत सहा वेळा भाजपच्या आणि तीन वेळा लालू प्रसाद यादव यांच्या पाठिंब्यावर गेली वीस वर्षे मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वतः कडे राखले आहे. आता ते पुन्हा भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले आहेत. बिहारमधील नितीश ‘राज’नीती म्हणायची ती हिच!

समाजवादी विचारसरणीच्या नेत्यांच्या कट्टर काँग्रेसविरोधी भूमिकेचा भाजपला फायदाच झाला. 1967 साली संयुक्त विधायक दल सरकार उत्तर प्रदेशात अस्तित्वात आले. या सरकारमध्ये जनसंघाचा समावेश होता. 1984 ला केवळ दोन खासदार असलेल्या भाजपची 86 पर्यंतची झेप शक्य होऊ शकली ती त्यांना मिळालेल्या समाजवादी मंडळींच्या पाठिंब्यामुळेच. ‘जर संघ फॅसिस्ट असेल तर मीसुद्धा फॅसिस्ट आहे,’ 1977 मध्ये जनता पक्षाच्या स्थापनेच्या वेळी त्या पक्षात जनसंघाच्या अंतर्भावाबद्दल पक्षाचे संस्थापक जयप्रकाश नारायण यांनी उत्तर दिले होते. भाजपच्या आजच्या वाढीमध्ये समाजवादी नेत्यांची महत्त्वपूर्ण भूमिका दाखविण्यास हे वाक्य पुरेसे आहे.

केवळ जयप्रकाश नारायणच नव्हे तर त्याच्याआधी समाजवादी चळवळीचे अध्वर्यू डॉ. राममनोहर लोहिया यांनी 1963 च्या जौनपूर पोटनिवडणुकीत जनसंघाचे त्यावेळचे अध्यक्ष दीनदयाल उपाध्याय यांना झोकून देऊन मदत केली होती. त्यानंतर 1964 च्या फरुखाबादच्या निवडणुकीत तीच भूमिका दीनदयाल उपाध्याय यांनी लोहियांकरिता निभावली आणि दोघेही निवडून आले होते. लोहियांची ही परंपरा त्यांचे पट्टशिष्य जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, रामविलास पासवान, चरणसिंग, अजित सिंग, देवीलाल, ओमप्रकाश, अजय व दुष्यंत चौटाला, बिजू तसेच नवीन पटनाईक, रामकृष्ण हेगडे, जे एच पटेल, एच डी कुमारस्वामी यांनी अगदी आतापर्यंत निभावली आणि म्हणूनच अतिरेकी उजव्या विचारसरणीचा भाजप आज इतका मोठा झाला आहे.

भाजपची हिंसक आणि धार्मिक द्वेष पसरविणारी विचारसरणी ओळखून डॉ. राममनोहर लोहिया, जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार यांसारख्या नेत्यांनी जर या पक्षाला दूर ठेवले असते तर हा पक्ष सत्तेवर स्वतःच्या भरवशावर येण्याइतपत कधीही मोठा झाला नसता. पण डॉ. लोहियांच्या अतिरेकी काँग्रेसविरोधी भूमिकेमुळे सत्तेवर येण्यासाठी त्यांनी डाव्या, उजव्या सर्वच विचारसरणीची मदत घेतली आणि यामुळे त्यांना काही काळ जरी फायदा झाला तरी खरा फायदा मात्र पूर्ण देशावर आपल्या हिंदुत्व विचारसरणीची सत्ता आणायचे ध्येय ठेवलेल्या भाजपचा झाला आहे.

लोहिया शिष्य जॉर्ज फर्नांडिस यांनी 1994 मध्ये केवळ भाजपला पाठिंबा देण्यासाठी नितीश कुमार यांच्या सहाय्याने 14 खासदारांना घेऊन समता पक्षाची स्थापना केली. आज 24 वर्षांनंतरही नितीश कुमार भाजपबरोबरच आहेत. जॉर्ज फर्नांडिस यांना मिळणारे महत्त्व लक्षात घेऊन रामविलास पासवान यांनीसुद्धा लोकजनशक्ती या पक्षाची स्थापना केली होती आणि 2004 ते 2009 हा कालखंड सोडला तर सतत भाजपला मदत करण्याचीच भूमिका निभावली. कर्नाटकात जनता पक्षाचा झेंडा रोवणारे रामकृष्ण हेगडे यांनी आणि त्यांचे शिष्य जे एच पटेल यांनीसुद्धा भाजपला समर्थन देण्याचीच भूमिका निभावली. या तुलनेत लालू-मुलायम या समाजवादी यादव जोडगोळीने ठामपणे निभावलेली भाजपविरोधी भूमिका लक्षणीय ठरते.

मला गुजरातचे माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांचा 1990 पासूनचा प्रवास आठवतो. चिमणभाई जनता दलातर्फे गुजरातचे मुख्यमंत्री बनले भाजपच्या पाठिंब्यावर. भाजपने केंद्रात व्ही. पी. सिंग आणि राज्यात चिमणभाई सरकारचा पाठिंबा काढला, पण चिमणभाई मुख्यमंत्रीपदी कायम राहिले. काँग्रेसच्या भरवशावर पुढे त्यांनी जनता दलातून समाजवादी जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रात चंद्रशेखर यांचे सरकार कोसळले, पण चिमणभाईंनी आपला जनता दल (गुजरात) पक्ष काढला आणि मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम ठेवले.

मूळ काँग्रेसी असलेल्या चिमणभाईंनी पुढे आपला पक्षच काँग्रेसमध्ये विलीन केला आणि मृत्यूपर्यंत मुख्यमंत्रीपदी कायम राहिले. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या वेळी आर. के. लक्ष्मण यांनी एक व्यंगचित्र काढले होते. चिमणभाईंच्या तोंडी राजीव गांधींना उद्देशून एक वाक्य होते, ‘‘मी काँग्रेसशी तेवढाच प्रामाणिक राहीन जेवढा मी जनता दल, समाजवादी जनता पक्ष आणि जनता दल (गुजरात) यांच्याशी प्रामाणिक राहिलो.’’ त्यांच्यानंतर गेल्या 29 वर्षांत काँग्रेस गुजरातमध्ये सत्तेवर येऊ शकली नाही. बिहारमध्ये नितीश कुमार याचपद्धतीने भाजप आणि लालू प्रसाद यादव या दोघांशीही खेळत आहेत. एकाच वेळी भाजप आणि भाजपविरोधी आघाडी या दोघांनाही स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेत आहेत. मागील गेल्या दोन दशकांपासून ते त्यात यशस्वी होत आहेत.