नाटय़रंग – माध्यमांतर

>> हिमांशू भूषण स्मार्त

नाटक म्हणून अन्य साहित्य प्रकारांची होणारी माध्यमांतरे हा खरंतर विस्तृत चर्चेचा विषय. कोणतेही माध्यमांतर सोपे नसते, सहजसाध्य नसते. माध्यमांतरामागच्या प्रेरणा शोधताना आपल्या हाती उद्बोधक आणि रंजक असं काहीतरी नक्कीच गवसेल. सोबत आपली रूपजाणीव अधिक परिपक्व होऊ शकेल.

मराठीत आजवर जसे नाटय़ संहितांचे प्रयोग झालेले आहेत तसे मुळात नाटक म्हणून न लिहिलेल्या संहितांचे-साहित्यकृतींचेही नाटय़ प्रयोग झालेले आहेत. जयवंत दळवींच्या ‘अंधाराच्या पारंब्या’ या कादंबरीवर आधारित ‘बॅरिस्टर’, शाम मनोहरांच्या ‘शीतयुद्ध सदानंद’ या कादंबरीवरील नाटक, कवी वसंत आबाजी डहाके यांच्या कवितांवर आधारित ‘स्वगत कोसळत्या शतकाचे’ हा नाटय़प्रयोग…अशी असंख्य उदाहरणे आपल्याला घेता येतील. कथांवर आधारित नाटय़ प्रयोग तर वारंवार होतच असतात. या माध्यमांतरामागच्या प्रेरणा कोणत्या असतात? हे शोधणे अत्यंत उद्बोधक आणि रंजक ठरेल. असे करण्यामागची कारणे सर्जनशील असतात की व्यावहारिक? कारण कोणतेही माध्यमांतर सोपे नसते, सहजसाध्य नसते. या प्रािढयेकडे लेखकाच्या बाजूने पाहायचे झाल्यास त्याला आशय, तो अभिव्यक्त करणारी माणसे, स्थळ-काळ आयते तयार मिळणार असतात. परंतु या प्रािढयेत एक बिकट आव्हानही असतेच. ते म्हणजे एक रूप दुसऱया रूपात ढाळण्याचे. वाङ्मयीन रूपांच्या संदर्भात एक करारांची संकल्पना सांगितलेली आहे. कवितेचा असतो तो भावविण्याचा करार, नाटकाचा असतो तो दाखवण्याचा करार आणि कथेचा-कादंबरीचा असतो तो सांगण्याचा करार. या करारांच्या मूलभूततेविषयीही खूप सिद्धांतन झालेले आहे. श्याम मनोहर, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, राजीव नाईक आदी नाटककार म्हणून प्रस्थापित असणाऱया लेखकांनी कथनपर गद्यही लिहिलेले आहे. दिलीप चित्रे, व्यंकटेश माडगूळकर, किरण नगरकर या कवी-कथाकार-कादंबरीकार म्हणून प्रस्थापित असलेल्या साहित्यिकांनी (अपामे ‘मिठू मिठू पोपट’, ‘तू वेडा कुंभार’, ‘बेडटाईम स्टोरी’) नाटय़लेखनही केलेले आहे. या साऱयातून एक विधान करता येईल की, नाटककारांना कथनपर गद्य (किंवा कविता) सुचते तेव्हा ते तो अनुभव नाटकात ढाळू पाहत नाहीत आणि कथनपर गद्य लिहिणाऱया (किंवा कविता) लेखकांना जेव्हा काही दृश्य प्रयोगात्म सुचते तेव्हा ते तो अनुभव कथनात-काव्यात ढाळू पाहत नाहीत. म्हणजेच लेखनपूर्व प्रािढयेत, आशय आणि रूप यांचा करार झालेला असतो. या स्थितीत एक अपरिहार्य-अनन्य रूप निश्चित झालेले असते. नाटककाराला हे कळलेले असते की, माझी अमुक एक अभिव्यक्ती एक दृश्यानुभव आहे, परंतु प्रयोगात तो साकार होणारा नाही. तो वाचकाच्या कल्पनाशक्तीत आणि पूर्वसंचितावर आधारलेलाच उभा राहील. कादंबरीकार नाटक लिहील तेव्हा नेमके याच्या उलटे घडेल. मग असे असताना माध्यमांतरे का घडतात? बरे, आपल्याला नाटकाची कविता झालेली आहे किंवा नाटकाची कादंबरी-कथा झालेली आहे असे कधी दिसत नाही. एखादी कविता कदाचित नाटकाला प्रतिसाद म्हणून लिहिली जाणे शक्य आहे, परंतु असेही अभावानेच घडत असावे.

या साऱया चर्चेतून एक शक्यता दिसते ती नाटक करणाऱयाच्या स्व-रूप शोधाची. नाटक हे नाटक करणाऱयांचे स्व-रूप मानले तर त्यांना ते विविध नाटकेतर साहित्यकृतींमधून शोधावेसे वाटत असले पाहिजे. अनेकदा हवी तशी नाटय़ संहिता न मिळाल्याने किंवा हाताशी नसल्याने कथेचे नाटक करण्याचा व्यावहारिक मार्गही निवडला जात असावा. यासाठी खूपदा आळसही कारणीभूत ठरण्याची शक्यता असतेच, परंतु जेव्हा आळस, व्यावहारिकता दोन्ही नसते तेव्हा काय घडत असावे? तिथे आपण वर पाहिली तशी शोधाची प्रेरणा काम करत असणार. सातत्याने नाटय़ व्यवहारात काम करणाऱया एखाद्या व्यक्तीला एखादी कथा-कादंबरी आवडते तेव्हा त्याला त्यातले प्रत्यक्षीकृत होऊ शकेल असे नाटय़ही जाणवू लागण्याची शक्यता आहे. जयवंत दळवींच्या ‘बॅरिस्टर’ नाटकात एका बाजूला बधिर-निर्जीव वाटावीत अशी, शहाणपणा आणि वेडेपणा यांच्या धूसर सीमेवर वावरणारी माणसे आहेत, तर दुसरीकडे नवविवाहित जोडप्याचा नवथर, यौवनसुलभ रसरशीतपणा आहे. मूळ कादंबरीत हे सारे कथनरूप घेऊन असते तर नाटकात या अनुभवांचे साक्षात वर्तन साकारते. कादंबरीमधील माणसे वाचकाच्या कल्पनाशक्तीतच साकारतात, तर नाटकामध्ये प्रत्येक वर्तनाचा एक माणूस अनुभवता येतो. यौवनसुलभ रसरशीतपणा कथनातून पोहोचून जे साधतो ते निराळे आणि नटांच्या प्रत्यक्ष वर्तनातून, स्थळ-काळ व्यापून साधतो ते निराळे, पण निराळे, एकच एक नव्हे! म्हणजे मग माध्यमांतर हे अनुसर्जन असते का? खरे तर एक सर्जनशील प्रकल्प म्हणून नाटकाची कादंबरी-कथा करून बघायला हवी. आळेकरांच्या सगळ्याच नाटकांमध्ये प्रयोगरूप जास्त प्रबळपणे जाणवते. त्यांच्या नाटकांच्या संहिता वाचतानादेखील प्रयोग प्रभाव गाजवत असतोच. उदाहरणार्थ; ‘महानिर्वाण’मध्ये आटय़ापाटय़ाचा सामना खेळायला गेलेला नाना परत येतो तेव्हा चाळकरी भाऊंच्या अंत्यसंस्कारासाठी त्याची वाट पाहात असतात. नाना आणि चाळकरी यांची नाटकातली जी भिडंत आहे, त्यात एक ाढाrडासदृश ऊर्जा आळेकरांनी योजलेली आहे. ही भेट हा एक खेळच आहे. याचे जर कथनरूप झाले तर ते काय शैली धारण करेल? हा रंजक प्रश्न आहे. कदाचित त्यातून ‘महानिर्वाण’ हे अपरिहार्यपणे नाटकच का आहे? हा प्रश्नही सुटू शकेल. नाटक म्हणून अन्य साहित्य प्रकारांची होणारी माध्यमांतरे हा विस्तृत चर्चेचा आणि साधार अनुसंधानाचा विषय आहे. त्यातले काही मोजकेच प्रश्न इथे छेडलेले आहेत. अलीकडे मराठी वाङ्मय विद्याशाखेत माध्यमांतरावर बरेच संशोधन प्रकल्पही केले जात आहेत. माध्यमांतराच्या प्रािढयेत किंवा प्रेरणेत कोणती आव्हाने आणि आवाहने असतात याचा शिस्तबद्ध शोध घेतल्यास आपली रूपजाणीव अधिक परिपक्व होऊ शकेल. ‘रूप विशुद्ध असते’ आणि ‘रूप ही निवड असते’ या दोन्ही विधानांचे पक्षकार आपल्याकडे मुबलक आहेत. माध्यमांतराची सैद्धांतिक मीमांसा या चर्चेत निर्णायक भूमिका बजावू शकेल.
[email protected]
(लेखक नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)