>> हर्षवर्धन दातार
महाराष्ट्रात प्राचीन काळापासून संगीताची उदंड, उज्ज्वल परंपरा आहे. नाटय़, भक्ती, भाव आणि चित्रगीतातून आपली संस्कृती झळकत असते. या परंपरेला आपल्या संगीत आणि गायकीतून पुनेणारे अनेक दिग्गज कलाकार या मातीत जन्माला आले. कर्तृत्व, संगीताची समज आणि सुरांवर पकड या निकषांवर श्रेष्ठ ठरणाऱया वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार तीनही दिग्गजांनी रसिकांना सुरीला वसंत-बहारचा अनुभव दिला.
महाराष्ट्रात प्राचीन काळापासून संगीताची उदंड, उज्ज्वल परंपरा आहे. नाटय़, भक्ती, भाव आणि चित्रगीतातून आपली संस्कृती झळकत असते. या परंपरेला आपल्या संगीत आणि गायकीतून पुनेणारे अनेक दिग्गज कलाकार या मातीत जन्माला आले. वसंत ऋतूत फुललेली फुले, वसंत ऋतूत पळसाला आलेला बहर हा आनंद, ऊर्जा आणि आशावादाचे प्रतीक आहे. हाच ऋतू आपल्या संगीत रचनांतून बाराही महिने फुलवला विसाव्या दशकातील तीन वसंतांनी. वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे ते तीन वसंत होत.
कर्तृत्व, संगीताची समज आणि सुरांवर पकड या निकषांवर तिघेही श्रेष्ठ. वसंत देसाईंनी मराठीबरोबर हिंदीतही आपला ठसा उमटविला. उमेदवारीच्या काळात पडेल ते काम करण्याची तयारी असलेल्या वसंत देसाईंनी ‘अयोध्येचा राजा’ (1932) आणि ‘धर्मात्मा’ चित्रपटात अभिनयही केला आणि ‘सकळ जगत मे छत्रपती’ हे गाणंही ते गायले. शास्त्राrय संगीताचं शिक्षण घेतलेल्या वसंत देसाईंनी सुरुवातीला गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे आणि मास्टर कृष्णराव यांना सहाय्य्य केलं. स्वतंत्रपणे संगीत दिलेला त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे कुमारसेन समर्थ यांचा ‘शोभा’ (1942). मात्र त्यांना प्रसिद्धी दिली ‘शकुंतला’ (1943) नी. पुशांताराम आणि वसंत देसाई हे समीकरणच झालं. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ (1955), यातलं ‘नैन सो नैन नाही मिलाओ’ आणि ‘दो आँखे बारह हाथ’ (1957) मधलं ‘ए मालिक तेरे बंदे हम’ ही प्रार्थना किंवा लोकसंगीताच्या ग्रामीण बाजावर आधारित ‘सैय्या झूठो का बडा’ ही आणि अनेक गाणी आजही अत्यंत लोकप्रिय आहेत. ‘गुंज उठी शहनाई’ हा त्यांचा गाजलेला संगीतप्रधान चित्रपट, ज्यात स्वत बिस्मिल्लाह खान यांनी शहनाई वाजवली आहे आणि त्यांची सितारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्याबरोबर जुगलबंदीसुद्धा आहे.
मनाचा ठाव घेणारे गोड ‘तेरे सूर और मेरे गीत’ आणि आर्त सुरांचं ‘दिल का खिलौना हाये टुट गया’ आणि एक अप्रतिम युगल गीत ‘जीवन मे पिया तेरा साथ रहे’ या कविश्रेष्ठ भरत व्यास यांच्या गाण्यामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला आणि त्याचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनावर आहे. ‘गुड्डी’ (1971) मधील ‘हम को मन की शक्ती देना’ आणि ‘बोल रे पपी हरा’ या गाण्यातून वाणी जयरामने हिंदी चित्रपट गायनात पदार्पण केले. ‘आशीर्वाद’ (1968) यातील ‘एक था बचपन’ ऐकून आजही डोळे पाणावतात तर अशोक कुमारनी गायलेले ‘रेल गाडी’ हे बालगीत मुलांच्या चेहऱयावर आनंद पसरवते. मराठी संगीत नाटकांनाही त्यांनी संगीत दिलं. ‘देव दीनाघरी धावला’ यातील कुमार गंधर्वांकडून ‘उठी उठी गोपाळा’ आणि ‘ऋणानुबंधाच्या गाठी’ ही उठावदार पदे त्यांनी गाऊन घेतली. ‘रामजोशी’, ‘अमर भूपाळी’, ‘मोलकरीण’ आणि आचार्य अत्रेंचा ‘श्यामची आई’ हे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचे दगड ठरले. 1975 साली इमारतीच्या लिफ्टच्या अपघाताने हा सुरेल संगीतकार आपल्यातून हिरावून नेला. रागांचा भक्कम आधार असूनसुद्धा वसंतरावांची गाणी मधुर आहेत. सामान्य श्रोत्यांना गुणगुणायला लावणारी आहेत.
देसाईंच्या तुलनेत पवार आणि प्रभू यांची कारकीर्द ही मराठीपुरती मर्यादित राहिली. मराठी भावसंगीताचा इतिहास संगीतकार वसंत प्रभू यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. वसंत प्रभू (1924-1968) यांनी आपल्या अल्प कारकिर्दीत जवळजवळ 25 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आणि सर्व प्रकार मिळून साधारणपणे दीडशे गाणी केली. त्यात मुख्यत्वे भावगीतं आहेत. सुरुवातीच्या काळात काही चित्रपटात त्यांनी भूमिकाही केल्या. गंमत म्हणजे प्रभू कथ्थक नृत्याचे उत्तम जाणकार होते.
मूळचे व्यंकटेश प्रभू यांनी चित्रपटाकरिता वसंत हे नाव घेतले ‘कॉम्रेड्स’ (1939) मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले आणि ‘वो चमक चमक कर तारे’ या गाण्यात कोरसमध्ये आवाजही दिला. वसंत प्रभू यांचे नाव घेतले की ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला’, ‘चाफा बोलेना’, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’, ‘राधा कृष्णावरी भाळली’ अशी भावपूर्ण भावगीतं, ‘कळा ज्या लागल्या जिवा’ हे नाटय़गीत आणि ‘मानसीचा चित्रकार तो’ (कन्यादान), ‘जेथे सागरा धरणी मिळते’, (पुत्र व्हावा ऐसा) ही आणि अशी अनेक अवीट गोडीची गाणी अगदी सहज ओठांवर येतात. 1947 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित कुसुमाग्रजांच्या ‘अनाम वीरा जिथे जाहला’ या स्फूर्तिगीताला प्रभूंनी चाल लावली आणि लताजींनी हे गायले. संगीतकार वसंत प्रभू, कवी/गीतकार पी. सावळाराम आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयीने मराठी भाव व चित्रपट संगीताला अवीट गोडीच्या गाण्यांची अमूल्य भेट दिली आहे. ‘पुत्र व्हावा ऐसा’ चित्रपटासाठी हिंदीमध्ये आपल्या मखमली आणि तलम आवाजासाठी प्रसिद्ध तलत महमूदनी दोन गाणी गायली. प्रभू यांनी काही काळ ‘एचएमव्ही’मध्येही संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरी केली. ‘एचएमव्ही’मध्ये नोकरी करत असतानाच्या काळातही प्रभू यांच्याकडून अनेक उत्तमोत्तम गाणी तयार केली गेली. प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि पी. सावळाराम यांनी लिहिलेल्या ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’ या गाण्याने इतिहास निर्माण केला. लता मंगेशकर यांच्या यांच्या भावपूर्ण गायकीने या आर्त गाण्याला योग्य तो न्याय दिला. साधी व सोपी आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल हे प्रभू यांच्या गाण्याचे ठळक वैशिष्टय़.
देसाई आणि प्रभू या दोन ‘वसंता’च्या तुलनेत वसंत पवार यांची कारकीर्द खूपच अल्प ठरली. व्यसनाच्या अतिरेकामुळे हा गुणी प्रतिभावंत वादक, संगीतकार अवघ्या 38 वर्षी हे जग सोडून गेला. या अवधीत त्यांनी 50 मराठी, 8 हिंदी चित्रपटांना तसेच 5 मराठी नाटकांना संगीत दिले. ‘सांगत्ये ऐका’ (1959) व ‘मानिनी’ (1962) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा ‘फाळके गौरव चिन्ह’ पुरस्कार, तर ‘रंगल्या रात्री अशा’ (1964) व ‘सवाल माझा ऐका’ (1965) या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला. मूळचेच हुशार वसंत पवारना व्यासंगातून बहुश्रुतता, विद्वत्ता, चतुरस्त्र बुद्धिमत्ता प्राप्त झाली. सतार, फ्लूट आणि सारंगीही ते उत्तम वाजवत. अगदी सुरूवातीला त्यांच्या सतारवादनाने प्रभावित झालेले संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी पवारांना आपला सहाय्य्क म्हणून घेतले.
सुधीर फडकेंनी त्यांचा ‘जयभीम’ हिंदी चित्रपट वसंत पवार यांना संगीत दिग्दर्शनासाठी दिला. त्यानंतर शंकर पवार यांच्या ‘बलिदान’ या चित्रपटालाही त्यांनी संगीताचा हातभार लावला. पण त्याची खरी वाटचाल सुरू झाली ती 1950 सालच्या ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटापासून. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मराठी चित्रपटात अस्सल मर्दानी, रंगेल झोकदार लावणी वसंतरावांनीच आणली. प्रसिद्ध पेटीवादक रामचंद्र कर यांच्याबरोबर वसंत पवारांनी ‘वसंत-रामचंद्र’ या जोडनावांनी 5 चित्रपटांना संगीत दिलं. त्यात ‘चिमणी पाखरे’ (हिंदीमध्ये ‘नन्हें मुन्ने’), ‘महात्मा’ हा हिंदी इंग्रजी आणि मराठी या तीन भाषांतला चित्रपट आणि अनंत माने दिग्दर्शित ‘सुवासिनी’ (हिंदी मध्ये ‘सुहागन’) आणि ‘सावधान’ हे चित्रपट होते. पवारांची काही प्रचंड गाजलेली गाणी – ‘मानिनी’ (1961) मधील ‘अरे संसार संसार’ ही बहिणाबाई चौधरी यांची कालत्रयी रचना, ‘सुखाचे सोबती’ चित्रपटातलं श्रीनिवास झाले यांनी संगीत दिलेलं ग. दि माडगूळकरांचं ‘एका तळ्यात होती बदके पिले सात’, जगदीश खेबुडकर यांची ‘कसं काय पाटील बरं हाय का’ ही सुलोचना चव्हाणनी गायलेली लावणी, ‘वरदक्षिणा’ चित्रपटातलं ‘घन घन माला नभी दाटल्या’ हे मन्ना डेनी गायलेले वर्षागीत, ‘तू सुखी रहा’ चित्रपटातलं ‘झुक झुक अगीन गाडी’ हे तुफान लोकप्रिय बालगीत. ‘मल्हारी मार्तंड‘ चित्रपटातील ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ आणि ‘फड सांभाळ तुऱयाला’ या सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या फक्कड लावण्या.
1926 पासून सुरू झालेला मराठी भावगीतांचा हा प्रवास आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. कवी/गीतकार, गायक आणि संगीतकार या सगळ्यांनी मराठी भावसंगीताचे दालन समृद्ध केले आहे. अस्सल मराठमोळा बाज असलेलं संगीत घराघरात पोहोचवलं त्या तीन ‘वसंतां’चे योगदान हे कायम स्मरणात राहील.
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)