>> गुरुनाथ तेंडुलकर
‘महाराष्ट्राचे वाल्मिकी’ हे भूषण लाभलेल्या महाकवी ग. दि. माडगुळकर यांच्या गीतरामायणातील एक गाणं….
प्रभू श्रीराम वनवासात जाण्यासाठी निघून गेल्याची वार्ता भरताला समजल्यानंतर भरत प्रभू रामचंद्रांना परत आणण्यासाठी धावला. प्रभू रामचंद्रांच्या चरणाला त्याने मिठी मारली आणि म्हणाला, “माझ्या आईच्या मूढपणामुळे आणि वडिलांच्या पत्नीप्रेमामुळे तुम्हाला वनवासी व्हावे लागले. आपल्या वियोगामुळे वडिलांचा मृत्यू झाला. या सर्व सर्व अनपेक्षित आणि अतर्क्य घटनांना मी कारणीभूत आहे असं मला वाटतं. प्रभू, मला क्षमा करा आणि आपण पुन्हा अयोध्येला परत चला. मी आपल्याला नेण्यासाठी आलो आहे.’’
यावर प्रभू रामचंद्र जे सांगतात ते गदिमांच्या लेखणीतून उतरलेले शब्द आपण पाहू या.
दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…
तब्बल दहा कडव्यांच्या या गाण्यात गदिमांनी माणसाच्या जीवनातील फार मोठं तत्त्वज्ञान मांडलं आहे. ते म्हणतात,
जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात
दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत
काय शोक करीसी वेडय़ा स्वप्नींच्या फळांचा?
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।
जरामरण यातून सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।
गदिमांनी सांगितलेलं हे तत्त्वज्ञान भगवद्गीतेतील दुसऱया अध्यायातील ज्या श्लोकांवर आधारित आहे, ते श्लोक आज आपण अभ्यासणार आहोत.
जातस्य हि धृवो मृत्युः धृवं जन्म मृतस्य च
तस्मात् अपरिहार्ये अर्थे न त्वंशोचितुम् अर्हसि ।। 27 ।।
भावार्थ ः जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाचा मृत्यू होणं हे अपरिहार्य आहे. त्यामुळे हे अर्जुना, तू आप्त-स्वजनांच्या मृत्यूसाठी शोक करू नकोस.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात…
उपजे ते नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हे घटिकायंत्र तैसे । परिभ्रमे गा ।।
ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे ।।
हे जन्ममरण तैसें । अनिवार जगी ।।
भावार्थ ः जे उत्पत्तीस आलं त्याचा कधी ना कधी विनाश होतो. विनाशातून पुन्हा दुसरं काहीतरी नवीन उत्पन्न होतं. हे जगाचं रहाटगाडगं ( घटिकायंत्र ) पूर्वापार चालत आलेलं आहे. दररोज सकाळी सूर्य उदयाला येतो. दुपारी तो माथ्यावर येतो. संध्याकाळी अस्ताला कलंडून दिसेनासा होतो आणि पुन्हा दुसरे दिवशी नव्या रूपानं पुन्हा उदयाला येतो. तसंच या जन्ममरणाच्या बाबतीत घडणं अनिवार्य आहे.
अव्यत्खादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत
अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना ।। 28 ।।
भावार्थ ः हा देह जन्माला येण्याच्या आधी त्यातील पंचमहाभूते ही अव्यक्त स्वरूपात असतात. पुरुषाच्या शुक्रजंतूचा स्त्राrच्या अंडय़ाशी संयोग होऊन ज्या वेळी गर्भधारणा होते त्या वेळी देहाला आकार नसतो, पण त्यात पंचमहाभूतांचे वास्तव्य अव्यक्त स्वरूपात असतेच की! पुढे गर्भ जसजसा वाढत जातो तसतसा त्याला एक विशिष्ट आकार प्राप्त होऊन त्यातून देहाचा जन्म होतो. पुढे हा देह बाल्य, शैशव, यौवन, प्रौढावस्था असा प्रवास करीत वार्धक्याकडे झुकतो त्या वेळीही हीच पंचमहाभूते देहात कायम असतात. देहाच रूप आणि आकार बदलला तरी मूळ आत्मा तोच कायम असतो. पुढे मृत्यूनंतर देहातील पंचमहाभूते पुन्हा विश्वातील पंचत्वात विलीन झाली तरी आत्मा हा कायमच असतो. असं असताना हे अर्जुना, दुःख कशासाठी करायचं?
आश्चर्यवत् पश्यति कश्चित् एनम् । आर्श्चयवत् वदति तथैव च अन्य ।
आश्चर्यवत् च अन्य श्रुणोति । श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ।।29।।
भावार्थ ः देहात वास करणाऱया या देही म्हणजेच आत्म्याबद्दल कोणी एक अद्भुत आश्चर्य म्हणून पाहतो, तर कुणी आश्चर्याने याचं वर्णन करतो, तर कुणी इतरांनी सांगितलेलं आश्चर्यपूर्वक ऐकतो, पण काहीही झालं तरी या आत्म्याबद्दल कोणीही पूर्णपणे निश्चित असं काहीही जाणत नाही. आत्मा म्हणजे नेमकं काय? सजीवातील जीव नेमका कसा असतो? याबद्दल जगातील कोणीही माणूस निश्चित असं काहीच सांगू शकत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकातून मानवी जाणिवांच्या मर्यादा सांगितल्या आहेत.
सर्वसामान्यपणे माणसाला पाच ज्ञानेंद्रिये असतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा… डोळ्यांनी आपण पाहतो. कानांनी आपणांस ऐकू येतं. नाकामुळे आपल्याला गंधाचं ज्ञान होतं. जिभेमुळे आपल्याला पदार्थाची चव आणि स्वाद समजतो आणि त्वचेमुळे स्पर्शज्ञान होतं. ही पाचही ज्ञानेंद्रिये योग्य प्रकारे वापरणाऱयाला सहावं ज्ञानेंद्रिय आपोआप प्राप्त होतं. विशेषकरून स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं तर हे सहावं ज्ञानेंद्रिय त्यांना जन्मजातच लाभलेलं असतं असं म्हणतात. त्यामुळे स्त्रियांची जाणीव पुरुषांपेक्षा अधिक असते. त्यांना नजरेतला सूक्ष्म फरक जाणवतो. एखाद्या पुरुषाचा चुकून झालेला स्पर्श आणि त्याने मुद्दाम केलेला स्पर्श यातील भेद ताबडतोब समजतो. बोलणाऱयाच्या केवळ शब्दोच्चारांतून समोरच्या व्यक्तीच्या मनातली नेमके भाव त्यांना कळतात. या सहाव्या इंद्रियामुळे स्त्रियांना समोरच्या व्यक्तीच्या मनातील अंतस्थ हेतू क्षणार्धात उमगतो. या सहाव्या इंद्रियाबद्दल पुढे कधीतरी सविस्तर बोलू या.
सामान्य माणसाला जन्मजात लाभलेली पाचही ज्ञानेंद्रिये ही बहिर्मुख आहेत. म्हणजेच या ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने आपल्याला आपल्या बाह्य जगाचं ज्ञान मिळतं, पण आत्मा हा देहात स्थित असूनही देहाचा भाग नसल्यामुळे त्याचं ज्ञान या पंचज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येत नाही. ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने आपणास जे ज्ञान प्राप्त होते ते केवळ व्यवहारात उपयोगी पडतं. या पंचज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग करून आपण पंचकर्मेंद्रियांच्या सहाय्याने कर्म करतो. ही पाच कर्मेंद्रिये म्हणजे हात, पाय, स्वरयंत्र (वाणी), मूत्रमार्ग-गुदद्वार आणि जननेंद्रिये. या कर्मेंद्रियांच्या सहाय्याने आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यवस्थित राहण्यासाठी आवश्यक त्या क्रिया करतो. या क्रियांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पाच प्राणांची आवश्यकता असते. त्याबद्दल पुढे सविस्तर चर्चा होईलच, पण सध्या या पाच प्रकारच्या वायूंची नावे सांगतो आणि पुढे जातो. पहिला म्हणजे प्राणवायू, दुसरा अपानवायू, तिसऱया वायूचं नाव आहे व्यानवायू, चौथा आहे उडानवायू आणि पाचवा समानवायू. असो.
देही नित्यम् अवध्य अयम् देहे सर्वस्य भारत
तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि ।। 30 ।।
भावार्थ ः वर उल्लेखिलेली पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्रकारचे वायू म्हणजेच पंचप्राण आणि त्यांच्यात समन्वय साधणारं मन आणि बुद्धी अशा सतरा घटकांनी बनलेलं हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर दोन्ही नाशिवंत आहेत. म्हणूनच हे अर्जुना, तू कोणत्याही प्रकारचा शोक करू नकोस.
अर्जुनाच्या मनात एक प्रकारचा संदेह होता की, या युद्धासाठी उपस्थित सर्वजण हे माझेच आप्तेष्ट, बंधुजन आणि गुरुजनदेखील आहेत. यांच्या हत्येचं मला पाप लागेल. याचबरोबर त्यांच्या हत्येमुळे त्यांचा कायमचा वियोगदेखील होईल. या दोन्ही भीतीपोटी अर्जुन अस्वस्थ झाला होता. त्याला भगवंतांनी पायरीपायरीनं संदेहमुक्त करून युद्धासाठी पुन्हा तयार केलं. त्यातली ही पहिली पायरी होती. युद्धात मरेल ते केवळ शरीर. आत्मा अविनाशीच आहे. म्हणूनच तू शोक करू नकोस. त्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला दुसरी पायरी म्हणजेच क्षात्रधर्म समजावून सांगितला. त्याबद्दल पुढच्या प्रकरणात बोलू या.