>> दुर्गेश आखाडे
रत्नागिरीतील संगीत क्षेत्रात एक उंची निर्माण करून शास्त्राrय संगीतामध्ये मुग्धा भट-सामंत यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी महाराष्ट्रासह देशभर शास्त्राrय, उपशास्त्रीय, नाट्य संगीत आणि अभंग गायनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. स्वतःच्या गायनाबरोबरच त्यांनी अनेक गुणी गायकांना घडवले आहे. अनेक नवोदित गायकांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
मुग्धा भट-सामंत यांनी पुणे विद्यापीठातून संगीत क्षेत्रात एम.ए. केले. त्यांना मंगला आपटे, कुसुम शेंडे, वीणा सहस्रबुद्धे, पद्मा तळवलकर आणि पंडित विशाल कशाळकर या गुरूंचे मार्गदर्शन लाभले. या गुरूंकडे त्यांनी गायनाचे धडे गिरवत स्वतःची एक नवी ओळख निर्माण केली. गायनाबरोबरच त्यांनी अनेक संगीत नाटकांमध्ये भूमिकाही केल्या आहेत. काही भूमिका त्यांच्या विशेष गाजल्या आहेत. रत्नागिरीत अनेक शास्त्रीय संगीताच्या मैफली त्यांनी रंगवल्या आहेत.
रत्नागिरी येथे मुग्धनाद संगीत अकादमीच्या माध्यमातून गेली वीस वर्षे मुग्धा भट-सामंत संगीत वर्ग चालवत आहेत. रत्नागिरीतील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या वर्गातून आज अनेक तरुण गायक, गायिका घडले आहेत. संगीत अलंकारपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मुग्धा भट-सामंत मार्गदर्शन करतात. मुग्धा भट-सामंत यांनी अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. दिल्लीमध्ये त्यांना महर्षी अॅवॉर्ड मिळाला. रत्नागिरीत त्यांना संगीतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईचा कलाभूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यांतील संगीत मैफलींमध्ये मुग्धा भट-सामंत यांनी गायन केले आहे. त्यामध्ये ग्वाल्हेरमध्ये तानसेन समारोह, मुंबईमध्ये गुणिजान बैठक, गोव्यामध्ये वास्को सप्ताह आणि मडगाव दिंडी, धारवाडमध्ये पंचाक्षरी गवई संमेलन, पुण्यामध्ये अभिषेकी महोत्सव, चिपळूणमध्ये कुमार गंधर्व महोत्सव, दिल्लीत महर्षी संगीत सभा, धारवाडमध्ये बसवराज राजगुरू संमेलन, गोव्यामध्ये श्रीधर पार्सेकर संगीत संमेलन, वास्कोमध्ये दामोदर संगीत संमेलन या कार्यक्रमांमध्ये त्यांनी गायन केले आहे. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘भक्तिरंग’ कार्यक्रमात अभंग गायन आणि ई टीव्हीवरील ‘पाऊलखुणा’ या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. अनेक नामवंत गायकांसोबत गायनाची साथ करण्याचे त्यांना भाग्य मिळाले. त्यामध्ये शौनक अभिषेकी, आनंद भाटे, रघुनंदन पणशीकर, सुरेश बापट आणि अर्चना कान्हेरेसारख्या गायकांना त्यांनी साथ दिली आहे. गायन क्षेत्रातील त्यांना प्रचंड अनुभव आहे. तो अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन रूपाने देतात.