>> डॉ. सुनील मोरेकर, नेत्ररोगतज्ञ
सध्या हिवाळ्याचा मौसम सुरू झाला आहे. नुकतीच दिवाळी साजरी केली, ज्यात फटाक्यांमुळे हवेत धुराचे प्रमाण जास्त दिसून येतेय. हिवाळ्यामुळे डोळे आधीच कोरडे झालेले असतात. त्यात संगणक, मोबाइल, टेलिव्हिजन यांच्या अतिवापरामुळेही डोळे कोरडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. या कारणामुळे डोळ्यांच्या अॅलर्जीचे प्रमाण वाढले आहे.
सध्या अनेकांना डोळ्यांच्या अॅलर्जीचा त्रास दिसून येत आहे. डोळ्यांच्या मुख्यतः चार प्रकारच्या अॅलर्जी असतात. टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. यातील दिवाळीच्या काळात तसेच सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे उडणाऱया हवेच्या धुळीमुळे आणि हवेतील पार्टिकल्समुळे होणाऱया अॅलर्जीचे प्रमाण वाढले आहे. तसेच सुट्टय़ांमुळे लोक बाहेर फिरायला जातात. त्यामुळे गाडय़ांच्या धुरामुळे होणाऱया अॅलर्जीचे प्रमाणही वाढले आहे. दिवाळीच्या काळात धुरामुळे जी अॅलर्जी होते त्याला हवेतील कार्बन मोनोक्साईड मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत असतो. त्याचबरोबर फटाके फोडल्यानंतर डोळ्याला लगेच हात लावताच फटाक्यांमधील सल्फरमुळे होणाऱया अॅलर्जीचे प्रमाणही याकाळात जास्त असते.
फुलांमुळेही डोळ्यांना अॅलर्जी
दिवाळीच्या काळात फक्त धुरामुळे अॅलर्जी होते असे नाही. याकाळात फुले, फुलांची तोरण याचा वापर जास्त असतो. आपण आपल्या मुलांना फटाक्यांच्या धुरापासून दूर ठेऊ शकतो. त्यांना छातीचे त्रास होऊ नये म्हणून तोंडाला मास्क लावू शकतो. त्यातही डोळ्यांची निगा राखण्यासाठी आजकाल कोविडच्या काळात पूर्ण डोळे झाकणारे चष्मे वापरण्याची उत्तम काळजी बरेच जण घेत आहेत. त्यामुळे डोळ्याला होणारी इजाही होत नाही. तसेच धुरापासून डोळ्यांचे संरक्षण होते, पण धुराच्या पलीकडे जाऊन एक अॅलर्जी होते. त्याचे कारण म्हणजे फुलांमधील पोलन ज्याला आपण मराठीत परागकण म्हणतो त्याची अॅलर्जी होण्याचे प्रमाणही जास्त आहे. यामध्ये डोळ्यांच्या बाहुलीभोवती बारीक कण तयार होतात. याला वर्नल कटार असे म्हणतात. ज्या वेळी धूळ किंवा धूमाळ म्हणजेच धुरामुळे अॅलर्जी होते, त्या वेळी डोळा लाल होतो त्याला अॅलर्जिक कंजुव्हायटिस म्हणतात.
टीबीच्या संसर्गामुळे अॅलर्जी
आजकाल सुट्टय़ा पडल्या की, अनेक जण बाहेरगावी पर्यटनाला जातात. अशा वेळी एखादा टीबीच्या रुग्णाच्या संपर्कात कोणी आलं तरीही त्याच्या डोळ्याला टीबीच्या संसर्गामुळे अॅलर्जी होऊ शकते. याचा अर्थ त्याला टीबी झाला का? तर असे नाही, तर त्याला टीबीमुळे झालेली अॅलर्जी आहे. याला फेल्कटन असे म्हणतात.
उपाय
खबरदारी ही उपचारांपेक्षा कधीही चांगली हा कानमंत्र आपण ध्यानी ठेवला पाहिजे. डोळे पिण्यायोग्य पाण्याने धुतले पाहिजेत. जर तुम्हाला आधीच कल्पना असेल की, धुरामुळे तुम्हाला अॅलर्जी होते, तर तुम्ही दिवाळीच्या काळात धुरापासून लांब राहिले पाहिजे. अॅलर्जी टेस्टिंग हा उपाय तुम्ही खबरदारीचा उपाय म्हणून करू शकता. ज्यामध्ये आपल्या कुठल्या गोष्टीची अॅलर्जी आहे याची माहिती आधीच समजते. बरेचदा खाण्यातून जाणाऱया गोष्टींमुळेही अॅलर्जी होते. दिवाळीत आपण बरीच मिष्टान्न खातो. त्यामुळे अॅलर्जी टेस्टिंग हा प्रभावशाली खबरदारीचा उपाय होऊ शकतो.
तुम्ही घरात एअर प्युरिफायर लावू शकता. जेणेकरून बाहेर कितीही प्रदूषण असलं तरी घरातील हवा शुद्ध राहते आणि तुम्ही सुरक्षित राहता. प्रवास करताना मास्क वापरणे, कोविडच्या काळात वापरले होते तसे पूर्ण डोळे झाकणारे चष्मे वापरणे असे खबरदारीचे उपाय तुम्ही करू शकता.
काय टाळावे?
अमेरिकेत एक घटना घडली. ज्यात डोळ्यात टाकल्या जाणाऱ्या एका कंपनीच्या ल्युब्रिकंटमुळे अनेक जण अंध झाले. काही जण मृत्युमुखीही पडले. त्यामुळे डॉक्टर बरेचदा किंवा वर्तमानपत्रात येणाऱ्या डोळ्यांच्या आरोग्यविषयक लेखात संगणकासमोर बसून डोळे कोरडे पडल्यामुळे ल्युब्रिकंट वापरण्याचा सल्ला दिला जातो. हे ल्युब्रिकंट वापरण्यास काही धोका नाही, पण तीस दिवसांपूर्वीचे ल्युब्रिकंट वापरल्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्यानेच हे ल्युब्रिकंट वापरावेत. बरेचदा अॅलर्जी नेमकी कसली आहे हे डॉक्टरांना बघितल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे डॉक्टर ल्युब्रिकंट वापरण्याचा सल्ला देण्याआधी दवाखान्यात येऊन डोळ्यांची तपासणी करायला सांगतात. दुसरं आहे स्टिरोईड्सच्या बाबतीत. काहीवेळा अॅलर्जी जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टर स्टिरॉईड्स देतात. त्यामुळे रुग्णाला पटकन आराम पडतो, पण हे रुग्ण पुढच्या वेळी अॅलर्जी झाल्यास त्याच स्टिरॉईड्सचा वापर करतात. या स्टिरॉईड्सचा अतिवापर केल्यामुळे मोतीबिंदू, काचबिंदू व अन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षात ठेवा खबरदारी ही उपचारापेक्षा योग्य असली तरी सर्वकाही तज्ञांच्या सल्ल्यानेच करणे तुमच्या डोळ्यांसाठी इष्ट.
शब्दांकन – अश्विनी पारकर
[email protected]