सृजन संवाद – रामायणातील पावसाळा

>> डॉ. समिरा गुजर जोशी

सध्या सगळीकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. आपल्याला या जोरदार पावसाचा तडाखा बसत असला आणि वाढलेला ट्रॅफिक, इतर अडचणी यामुळे पावसाळ्यातला रोमँटिसिझम कमी झाल्यासारखा वाटत असला तरीही पावसाचे महत्त्व आपल्याला नाकारता येत नाही. आजूबाजूची हिरवीगार सृष्टी पाहून आपली दृष्टी आणि मन सुखावल्याशिवाय राहत नाही. रामायणामध्ये श्रीरामांनी किष्किंधा कांडात वर्षा ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.

वाल्मिकींच्या रामायणाचा विशेष हा की, येथे निसर्गवर्णनही कथेचा भाग बनून येते. श्रीरामांनी सुग्रीवाला राज्याभिषेक करविला आणि तो किष्किंधापती झाला. अशा वेळेस श्रीराम त्याच्यासोबत त्याच्या राज्यात राहिले असते तर ते वावगे ठरले नसते, पण आपल्या सत्यवचनी स्वभावानुसार ते जवळच असलेल्या माल्यवान पर्वतावर वनवासी स्थितीत राहू लागले. वर्षाकाळ समोर येऊन ठेपला होता. या काळात दळणवळणाच्या सर्व सोयी बंद असत. (विशेष म्हणजे तेव्हाही रस्त्यावर खड्डे असत आणि रस्ते पाण्याने तुंबत असे साक्षात श्रीरामांनी सांगितले आहे.) एखाद्या राज्यावर राजाने मोहीम आखली असेल, चढाई केली असेल तरी या काळात युद्धविराम घ्यावा लागे. अशा परिस्थितीत सुग्रीवाने सीतेच्या शोधाची मोहीम आखावी अशी अपेक्षा योग्य ठरणार नव्हती. सीतेच्या शोधासाठी चार महिने थांबल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अशा वेळी श्रीरामांच्या मनाची काय अवस्था झाली असेल, याची आपण कल्पनाच करू शकतो.

पाऊस कसा पडतो याचे विज्ञान आपण शाळेत शिकतो. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात. पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडून नद्यांद्वारे परत समुद्राला जाऊन मिळते हे सगळे आपण शाळेत पाठ केलेले असते. पण वाल्मिकी ऋषी याच वैज्ञानिक सत्याकडे कवीच्या नजरेने पाहतात. ते म्हणतात, आकाशरूपी तरुणी सूर्यकिरणांमधून समुद्राचा रस पिऊन नऊ महिने धारण केलेल्या गर्भाला म्हणजेच जलरूपी रसायनाला जन्म देते आहे (नवमासधृतं गर्भं भास्करस्य गभस्तिभि पीत्वा रसं समुद्राणां द्यौः प्रसूते रसायनम्.) पाऊस सुरू झाला आहे. डोंगरावरून झरे, धबधबे वाहू लागले आहेत. श्रीरामांना हे डोंगर कसे दिसतात, तर नुकत्याच अभिषेक झालेल्या सुग्रीवासारखे दिसतात. एखाद्या सम्राटाच्या मस्तकावरून सप्तनद्यांचा अभिषेक होत असावा, त्याच्या चेहऱयावरून पाणी ओघळावे, तसा जणू पर्वतराजाला अभिषेक होतो आहे. या कल्पनेचे सौंदर्य लगेच मनात भरणारे आहे. या डोंगरांवर मोठमोठय़ा गुहासुद्धा आहेत, ज्यामधून वाऱयाचा घोंगावणारा आवाज कानी पडतो आहे. याविषयी श्रीरामांनी सुंदर कल्पना मांडली आहे की, मेघ काळे आहेत. ते जणू कृष्णाजीन म्हणजे काळवीटाचे कातडे आहे आणि पावसाच्या धारा बरसत आहेत, त्या म्हणजे जणू यज्ञोपवीत अर्थात जानवे. हे पर्वत जणू कृष्णाजीन धारण केलेल्या बटूंप्रमाणे वाटत आहेत. त्या गुहांमध्ये येणाऱया वाऱयांच्या आवाजामुळे असा भास होत आहे की, हे डोंगर म्हणजे पाठांतर करत बसलेले बटू आहेत.

अशा या पावसाळी वातावरणात आकाशात अचानक एखादी वीज चमकून जाते आहे. श्रीरामांना त्या विद्युल्लतेमध्ये रावणाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करणारी तेजस्वी सीता दिसते आहे. श्रीरामांच्या मनात सीतेची काय प्रतिमा आहे, हेही यानिमित्ताने लक्षात येते. सीता मुळूमुळू रडणारी नाही, तर अतिशय अवघड प्रसंगातही प्रतिकार करणारी आहे. वीज जशी कडाडते त्याप्रमाणे ही तेजस्वी स्त्राr शत्रूवर कडाडली असणार याची श्रीरामांना खात्री आहे.

वनामध्ये एकीकडे अतिशय सुंदर वातावरण आहे. निसर्गाचा वाद्यवृंद जणू वाजतो आहे. भुंगे गुंजारव करत असल्यामुळे त्यांचा ध्वनी तंतुवाद्यांच्या ध्वनीसमान ऐकू येतो आहे. बेडूक ‘डराव डराव’ करत असल्यामुळे कोणी गवईच रियाजाला बसला आहे असे वाटते आहे, तर मेघाची गर्जना सुरू असल्यामुळे मृदंग वादनही सुरू आहे, असा भास होतो आहे. वनात कुठे मोर नाचत आहेत, तर कुठे केकारव करत आहेत. कुठे नुसतेच झाडावर बसून या नृत्य-संगीताच्या मैफलीचे प्रेक्षक बनले आहेत. सगळीकडे कोवळे गवत उगवले आहे आणि त्यावर पावसाळ्यात दिसून येणारे इंद्रगोप नावाचे लाल रंगाचे किडे दिसत आहेत. असे वाटते आहे की, धरित्रीने हिरव्या रंगाची शाल पांघरली आहे, ज्यावर लाल खडय़ांची नक्षी आहे. जांभळाचे वृक्ष फळांनी इतके लगडले आहेत की, काळे दिसत आहेत. लोक मनसोक्त जांभूळ फळांचा आस्वाद घेत आहेत. त्याचप्रमाणे आंब्याची झाडेही फळांनी इतकी लगडली आहेत की. वाऱयाची झुळूक आली तरी पिकलेली फळे जमिनीवर पडत आहेत. अशा प्रसन्न वातावरणात श्रीरामांच्या मनाला मात्र शांतता लाभत नाही. श्रीरामांच्या मनात सीतेच्या विरहाने जे काहूर उमटले आहे, त्याच्या पार्श्वभूमीला हा पाऊस निनादत राहतो.

[email protected]

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)