कला परंपरा – महाराष्ट्राची लाडकी पैठणी

>> डॉ. मनोहर देसाई

पैठणी हा महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार. आपली संस्कृती आणि सण साजरे करताना पैठणीसाठी हट्ट कायम धरला जातो. अशी ही महाराष्ट्राचे वैभव असणारी पैठणी आणि तिच्या समृद्धतेची परंपरा जपायला हवी.

”पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा…” लग्नामध्ये मुलीने आपल्या आईकडे हट्ट केलाय मला लग्नामध्ये पदरावरती मोराचे नक्षीकाम असलेलाच शालू हवाय. महाराष्ट्राच्या वस्त्र अलंकारातील एक अतिशय सुंदर असे वस्त्र म्हणजे पैठणी साडी. वर नमूद केलेलं गाणं एकेकाळी महाराष्ट्रात खूप गाजलं. ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं हे गाणं सुलोचना चव्हाण यांनी ‘मल्हारी मार्तंड’ या चित्रपटासाठी गायलं. साडीचा हट्ट धरणाऱया या तरुणी आणि मराठी संस्कृती जपणारी अनेक घरे आता दुर्मिळ होत चालली आहेत. विविध मराठी मालिका आणि चित्रपटांतून हळूहळू मराठी वस्त्र अलंकार नकळत दूर करून तेथे अनेक इतर प्रांतांतील कपडे प्रमुख कलाकारांना परिधान करून नव्या पिढीला आपल्या महाराष्ट्रीयन वस्त्र संपदेविषयी अनभिज्ञ करण्याचा प्रयत्न चालू असावा अशी कधी कधी शंका येते. महाराष्ट्रातील अनेक लग्न सोहळ्यांमध्ये मराठी वस्त्र अलंकार दुर्मिळ झाले आहेत आणि परप्रांतीय वस्त्र पोशाखांचा अलगद शिरकाव नव्या पिढीच्या मनावर ठसवून तोच उच्च दर्जा व श्रीमंतीचे प्रतीक आहे अशा प्रकारची भावना निर्माण झालेली दिसते. इथे इतर कुठल्याही प्रांताच्या कपडय़ांवर टीका करणे हा हेतू नसून महाराष्ट्राचे स्वतचे वस्त्र अलंकार कालबाह्य करण्याचा पोरकट प्रयत्न काही मंडळी करतात. जे चुकीचे आहे. आपली परंपरा, भावना ज्या साडीभावेती गुंफलेल्या आहेत ती साडी म्हणजे ‘महाराष्ट्राची पैठणी साडी.’

जगभरातून मराठी कुटुंबे आज विविध कामांच्या निमित्ताने विविध ठिकाणी स्थिरावली आहेत. आपली संस्कृती आणि सण जसे जमतील तसे ते त्याöत्या ठिकाणी साजरेसुद्धा करत आहेत. ज्या-ज्या वेळी या मंडळी महाराष्ट्रात येतात, त्या वेळी महिला आवर्जून येथील पैठणी साडी सोबत घेऊन जातात. परदेशातील एका महाराष्ट्र मंडळाच्या सांस्कृतिक कार्पामाच्या निमित्ताने सभागृहात उपस्थित जवळपास बऱयाच महिला व तरुणी या पैठणी साडी घालून वावरताना दिसल्या. त्यांचे कौतुक करावेसे वाटते. पूर्वी लग्नाचा बस्ता बांधताना मुलीसाठी पैठणी साडीचा शालू असावा ही आग्रहाची विनंती दोन्ही कुटुंबांकडून असायची. आजही अनेक नव्या पिढीतील तरुणी या पेहरावाचा आग्रह धरताना दिसतात. या लेखातून पैठणी साडी याविषयी काही धागेदोरे उलगडून माहिती मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे.

पैठणी साडीला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. सातवाहन राजांच्या कालखंडात पैठणीच्या निर्मितीला सुरुवात झाली. विविध रंगांचे रेशमी, सोनेरी, चंदेरी धागे विणून ही साडी तयार केली जाते. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावरच्या ‘पैठण’ या गावी हा साडी बनवण्याचा उद्योग होता, म्हणून या साडीला ‘पैठणी’ असे नाव दिले गेले. सातवाहन राजांच्या रोमन साम्राज्यातील व्यापारात या साडीची निर्यात रोमन साम्राज्यात होत होती. त्या वेळी रोमन लोकांना या साडीचे इतके आकर्षण होते की, व्यापाराच्या निमित्ताने येथे आल्यानंतर साडय़ा पूर्ण होईपर्यंत व्यापारी थांबायची तयारी दाखवत असत. पुढे विविध राजवटींमध्ये अनेक राजांनी या कलेला राजाश्रय व प्रोत्साहन दिले. मुघल राजवटीत औरंगजेबानेसुद्धा या कारागिरांना प्रोत्साहन दिले. पेशव्यांच्या राजवटीमध्ये या कारागिरांना नाशिकच्या येवला येथेसुद्धा विशेष सहाय्य करण्यात आले. पेशव्यांच्या कालखंडात पेशवाई पद्धतीची सोने आणि तांबे एकत्रित करून विणलेले पदर असणारी पेशवाई पैठणी उदयास आली.

पैठणी साडीमध्ये दोन प्रकारचे पदर आहेत. यातील पहिल्या सिंगल पल्लू प्रकारात पदरावरती सहा मोर असतात, तर दुसऱया डबल पल्लू प्रकारात पदरावरती चौदा मोर असतात.

पैठणी साडीमध्येसुद्धा अनेक प्रकार आहेत. यातील काही प्रकार पाहू. बांगडी मोर पैठणी या प्रकारात बांगडीच्या गोल आकारामध्ये मोराचे नक्षीकाम केलेले असते. ब्रोकेड पैठणी प्रकारामध्ये संपूर्ण साडीवर फुले, वेली, मोर, पोपट यांचा वापर नक्षीकामासाठी केला जातो. तोता-मैना किंवा मुनिया ब्रोकेड पैठणीमध्ये पोपटाच्या आकारांचा वापर नक्षीकामासाठी केलेला असतो व साडीचा रंगसुद्धा पोपटी असतो. यात मुनिया म्हणजेच पोपट व ही पोपटी रंगाची साडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. काळी चंद्रकला पैठणीमध्ये संपूर्ण साडी काळ्या रंगाच्या धाग्यांमध्ये विणलेली असून तिचा काठ हा लाल रंगाचा असतो. संगीत पैठणी या प्रकारामध्ये पदरावरती विविध वाद्यांच्या आकारांचा वापर नक्षी कामासाठी केलेला दिसतो जसे सनई, तबला, तानपुरा, पिपाणी, चौघडा, ढोलकी ही वाद्ये दिसतात. एक धोती पैठणी प्रकारात साडी बनवण्यासाठी सिंगल शटल लावले जाते आणि या साडीला नारळी बॉर्डर असते व यातील बुट्टीसुद्धा नाण्यासारखी साध्या आकाराची असते. पारंपरिक रंगांनी सजलेली पेशवाई पैठणी हीसुद्धा पैठणींच्या प्रकारातील सर्वांना मोहित करणारी अशी सुंदर नक्षीकाम असणारी पैठणी आहे.

पैठणीच्या काठाचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या चटईमध्ये मधून मधून चौकोनी जाळी दिसते. याच प्रकारची जाळी बॉर्डर यातून प्रेरित झाली व तिला नारळी बॉर्डर असे नाव पडले. साखळी बॉर्डर प्रकारांमध्ये पोपट आणि मोराचे विणकाम हे साखळीने केलेले असते. मुनिया म्हणजेच पोपट या आकाराचा वापर बॉर्डरसाठी केला जातो. त्यामुळे त्याला मुनिया बॉर्डर असे संबोधतात. ही बॉर्डर पोपटी कलरची असते. मदिरा आणि फुल असलेल्या नक्षीकामाच्या बॉर्डरला अस्वली बॉर्डर असे म्हणतात. आंब्याच्या आकाराची बुट्टी त्याला कोयरी प्रकार असे म्हणतात. मोरबुट्टीमध्ये काठावरती मोराच्या आकाराची नक्षी विणली जाते. अजिंठय़ातील लेण्यांमध्ये दिसणारी कमळाच्या फुलांच्या आकारातून प्रेरणा घेऊन तयार झालेली कमळबुट्टी नक्षी कामासाठी वापरली जाते, तर परिंदा बुट्टीमध्ये परिंदाच्या आकाराचा वापर नक्षीकामासाठी केला जातो. अशा प्रकारच्या विविध बॉर्डर्सचा वापर पैठणीच्या विणकामांमध्ये केल्यामुळे त्या नक्षीकामांना वेगवेगळी नावे देऊन ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार डिझाईन उपलब्ध करून दिल्या जातात.

नवीन ग्राहकांची संख्या जशी वाढत गेली तसतसे नवनवे रंग पैठणीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. पैठणीचे तसे मूळ तीन पारंपरिक रंग. ‘काळी चंद्रकला’ यात संपूर्ण साडी काळ्या रंगाची तर तिचा काठ लाल रंगाचा. ‘राघू पैठणी’ यामध्ये संपूर्ण साडी पोपटी म्हणजेच हिरव्या रंगाची. ‘शिरोडक पैठणी’ यातील शिरोडक म्हणजे पांढरा रंग. या रंगात तयार झालेली पैठणी पांढऱयाशुभ्र रंगाची असते. या व्यतिरिक्त पिवळा, जांभळा, शेवाळी, वाईन, चिंतामणी, वांगी, नारंगी असे रंगसुद्धा पैठण्यांमध्ये उपलब्ध आहेत.

हातमाग पद्धतीने तयार झालेल्या पैठणी विविध किमतींमध्ये उपलब्ध आहेत. उत्कृष्ट प्रतीची सोन्याची किंवा चांदीची जर, तसेच उच्च प्रतीचे रेशीम याच्या वापरामुळे या पैठणीची किंमत जास्त असते. साडी तयार करण्यासाठी लागणारी मेहनत, त्यावर असणारे नक्षीकाम यामुळे साडीची किंमत वाढते. सात हजारांपासून ते सात लाखांपर्यंत व त्याहूनही अधिक किमतींमध्ये पैठणी साडय़ा विकल्या जातात. पैठणी साडय़ा अतिशय जपून व सांभाळून ठेवाव्या लागतात किंबहुना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

महाराष्ट्राचे वैभव असणारी ही पैठणी अधिकाधिक समृद्ध व्हावी म्हणून शासनसुद्धा प्रयत्न करत आहे. कामाचे व्याप तर सर्वांच्याच मागे आहेत, पण आपल्या राज्यात तयार होणाऱया व येथील कारागिरांचे उपजीविकेचे साधन असणाऱया या व्यवसायाच्या मागे सर्वांनीच उभे राहायला हवे. विविध सणांना अनेक सोपस्कार करून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणाऱया आपणा सर्वांना पैठणी साडी घराघरात असावी ही परंपरा जपण्याचा आग्रह करावासा वाटतो. निसर्गामध्ये पर्जन्यवृष्टीची चाहूल मोराच्या नाचण्यातून आपल्याला लागते. तशाच प्रकारच्या पैठणी साडीवरच्या मोरांचे आगमन घराघरात झाल्यानंतर तेथे नक्कीच समृद्धी आणि आनंदाची चाहूल लागेल यात शंका नाही.
[email protected]