>>डॉ. श्रीपाल सबनीस
शिक्षण, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 5 सप्टेंबर रोजी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, मोहनराव कदम नगर वांगी ता. कडेगाव जि. सांगली येथे होत आहे त्या निमित्ताने त्यांचे स्मरण करणारा लेख…
डॉ. पतंगराव कदम यांचं जीवन केवळ एका कुटुंबापुरतं, केवळ एका संस्थेपुरतं, एका राज्यापुरतं, एका क्षेत्रापुरतं मर्यादित नव्हतं. म्हणूनच वेगवेगळ्या क्षेत्रांतील, विविध वयोगटांतील, वेगवेगळ्या प्रवाहांतील, वेगवेगळ्या जातीधर्मांतील लोकांचा गोतावळा त्यांनी जमा केला. शून्यातून विश्व कसं उभं करावं, शून्याचं मूल्य संस्कृतीच्या प्रवाहात शिक्षणाच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून, राजकारण, समाजकारण यांच्या माध्यमातून कसं विकसित करावं, समाज आणि संस्कृती कशी जपावी, नाती कशी काळजामध्ये शिल्लक ठेवावीत, राष्ट्रीयत्व कसं जोपासावं, मानवतेचा धर्म जाती-धर्मापलीकडे जाऊन कसा निभवावा, सेवेचा आणि सत्तेचा काय संबंध आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं डॉ. पतंगराव कदमांच्या कृतिशील जीवनातून मला सापडलेली आहेत. दहा बाय दहाच्या छोटय़ा चार भिंतींच्या खोलीत एक मॅट्रिक्युलेट मुलगा विद्यापीठ काढतो. आज महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल ओलांडून जगभर या विद्यापीठाचा लौकिक पसरला आहे. या विद्यापीठाच्या शाखा सर्वदूर पोहोचल्या. 180 शाखांचा कारभार, पाच लाख विद्यार्थ्यांचा पसारा, दहा हजार कर्मचाऱ्यांचे संसार एका शून्य जगणाऱ्या माणसाने उभे केलेले आहेत. म्हणूनच पतंगरावांच्या जीवनाचं मूल्य हे शब्दांत बांधता येत नाही. यशवंतराव चव्हाण, पी. व्ही. नरसिंह राव, प्रणव मुखर्जी, अब्दुल कलाम यांसारख्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त राजकीय नेतृत्वांच्या गोतावळ्यातील लोकांचा आशीर्वाद आणि कृपा लाभलेले पतंगराव समकालीन शरद पवारांसह सर्वच राजकीय वर्तुळामध्ये आकर्षणाचं, आत्मीयतेचं केंद्र राहिले. त्यांच्या संस्थेमध्ये जातीधर्माच्या पलीकडील मुस्लिम, हिंदू धर्मातील अठरापगड जातीचे नोकरदार आले. म्हणूनच या माणसातील देवत्व केवळ भारती विद्यापीठाच्या चौकटीत बंदिस्त करता येणार नाही.
आपल्या विद्यापीठाचे नाव भारती विद्यापीठ ठेवताना 18-19 वर्षांच्या त्या मुलामध्ये राष्ट्रीय भावना किती जागरूक असली पाहिजे, याचा मी अंदाज बांधतो. फाटक्या घरात प्रतिकूलतेमध्ये जगणारा हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपले राज्य आणि देश शेतकरीप्रधान आहे. या शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दुःखाला बाजूला ठेवून, प्रतिकूलतेवर मात करून एक माणूस 20 वर्षे मंत्री होतो, वेगवेगळी खाती यशस्वीपणे सांभाळतो, सहावेळा आमदार म्हणून जिंकून येतो, त्याचबरोबर समाजसेवेचे अनेक प्रकल्प उभे करतो. सहकारातल्या सूतगिरण्या असोत, साखर कारखाना असो, भारती सहकारी बँक असो, हे उद्योग गरीब कुटुंबांच्या भरणपोषणासाठी निर्माण झाले. शिवाय दुष्काळातल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी छावण्या आणि मरणाऱ्या माणसाला दिलासा देण्यासाठीसुद्धा त्यांची सबंध ही सहकारी चळवळ आणि प्रकल्प उपयोगी पडले. असा हा माणूस साहित्यामध्ये, संस्कृतीमध्ये रमला. ग. दि. माडगूळकर असोत, पु. ल. देशपांडे असोत, विजय तेंडुलकर असोत, रावसाहेब कसबे असोत, नरेंद्र जाधव असोत, अनेक जाती-धर्मांच्या प्रवाहातील सांस्कृतिक मानदंड त्यांनी पचवले, पेलले. त्यांच्या सहवासाला अर्थपूर्णता आणि सांस्कृतिक अर्थ प्राप्त झाला. करुणेचं मूल्य जाणणारं, माणुसकीचं मूल्य सिद्ध करणारं आणि समता आणि लोकशाहीचा विचार आपल्या शिक्षण आणि कृतिशीलतेतून आपल्या धार्मिक आणि लोकशाही असणाऱ्या देशात समंजसपणे रुजवणारे व्यक्तित्व आणि नेतृत्व महाराष्ट्रामध्ये विरळ आहे.
एक माणूस एका क्षेत्रामध्ये निश्चित उत्तुंग होऊ शकतो, झालेली माणसं आहेत, पण एकच डॉ. पतंगराव… शिक्षणामध्येही आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त, राजकारणामध्येही अग्रेसर असणारं आणि मानदंड म्हणून शोभणारं व्यक्तित्व. सहकारामध्ये, संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी झेप घेणारी परिमाणं हा चमत्काराचा भाग आहे. सर्व पातळीवरचा, सर्व प्रवाहांतला एक जबरदस्त यशस्वी मानदंड म्हणून आहे. झोपडीतल्या माणसाची बांधीलकी मानणारा, सांस्कृतिक श्रीमंती जगणारा, सांस्कृतिक मूल्यात्मकतेचे डोंगर उभे करणारा डॉ. पतंगरावांसारखा माणूस महाराष्ट्राला नेहमीच प्रेरक राहील.
(लेखक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ समीक्षक, माजी अध्यक्ष आहेत.)