>> डॉ. अपर्णा गोविल भास्कर
गेली 17 वर्षे लठ्ठपणाशी लढा देत असलेल्या रुग्णांवर मी उपचार करत आहे. यामध्ये एक गोष्ट जाणवते ती म्हणजे हे रुग्ण स्वतःलाच दोष देतात तसेच नैराश्याला बळी पडतात आणि त्यांचा आत्मविश्वासदेखील कमी होतो.
लठ्ठपणाने ग्रासलेला प्रत्येक रुग्ण हा मानसिकरीत्या खचल्याचे दिसून येते. मग समाजाने शरीरयष्टीवरून त्याची केलेली निंदा असो किंवा आपल्या शरीराचा आकार आणि बाह्यरूपामुळे मनावर येणारे दडपण या साऱयाच गोष्टी त्या व्यक्तीवर परिणाम करतात.
लठ्ठ व्यक्ती वजन वाढण्यास ते स्वतः कारणीभूत असल्याचे समजून स्वतःलाच दोष देतात. डायटिंगचे अयशस्वी प्रयत्न, चुकलेली जीम सेशन्स आणि व्यस्त जीवनशैली यांमुळे या स्थितीस आपण स्वतः जबाबदार असल्याचे वाटू लागते. निराशा, अपयशाची भावना ही कायमस्वरूपी मनात घर करून बसते.
इतर आजारांप्रमाणेच लठ्ठपणादेखील एक आजार असल्याचे समजून न घेता सतत अपराधीपणाची भावना बाळगल्याने मानसिक आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. लठ्ठपणा एक जुनाट आजार असून अनेकदा गैरसमजुतींमुळे संबंधित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असतो.
लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह ही एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यासाठी उपचारांसाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. हा केवळ पॅलरीजचा प्रश्न नाही, तर ही एक आनुवंशिक स्थिती आहे. निर्णयाची भीती, स्वतःच्या बाह्यरूपाबद्दल वाटणारी लाज वैद्यकीय उपचारास विलंब करतात. लठ्ठपणासारख्या आजारावर वेळीच उपचार न केल्यास अनेक आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकतात. जसे की हृदयविकार, मधुमेह, यकृत रोग, श्वासोच्छ्वासाच्या समस्या, सांध्यांसंबंधित समस्या आणि मानसिक त्रास यांचा धोका वाढू शकतो.
दुर्बलतेचे लक्षण नाही
लठ्ठपणासाठी वैद्यकीय मदत घेणे हे दुर्बलतेचे लक्षण नसून सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. ज्याप्रमाणे एखाद्याने इतर कोणत्याही जुनाट स्थितीसाठी वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे लठ्ठपणाला संबोधित करण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन आवश्यक आहे. वैद्यकीय मार्गदर्शन, योग्य पोषक आहार, मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन आणि बऱयाचदा बॅरिएट्रिक सर्जरीसारख्या पर्यायांची निवड योग्य ठरते. एक समाज म्हणून लठ्ठपणाच्या संबंधित गैरसमजुतींना दूर करणे आवश्यक आहे. आपण असे वातावरण निर्माण केले पाहिजे जेथे व्यक्तींना निर्णय घेताना स्वतःला दोष न देता अचूक वैद्यकीय सेवा उपभोगण्यास मदत होईल. आपण हे ओळखले पाहिजे की, लठ्ठपणा हा एक आजार आहे जो केवळ संबंधित व्यक्तीचा दोष नसून एक आरोग्यविषयक समस्या आहे.
लठ्ठपणास सामोरे जाताना तुम्ही एकटे नाहीत आणि हा तुमचा एकटय़ाचा संधर्षमय प्रवास नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आजाराने पीडित व्यक्तीला सहानुभूतीपूर्ण वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. लठ्ठपणालाही इतर कोणत्याही आजारांप्रमाणेच वैद्यकीय मदतीचीदेखील आवश्यकता आहे. हीच खरी वेळ आहे जिथे या व्यक्तींना सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी आणि त्यांना वैद्यकीय उपचारास सक्षम करणे आवश्यक आहे.
(लेखिका बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत.)