
>> डॉ. अनिल प्रकाश जोशी
गेल्या काही वर्षांपासून ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ ही उपाधी प्रत्येक वर्षाला लागलेली आपण पाहत आहोत. याचे कारण विकासाच्या नावाखाली होत गेलेल्या निसर्गाच्या दोहनामुळे, अमर्याद वायू प्रदूषणामुळे, वनांच्या ऱहासामुळे पृथ्वीवरील तापमान वेगाने वाढत आहे. उन्हाळ्याच्या ऋतूत याची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवते. यामागे आपल्या नद्या आणि अनेक जलस्रोत, तलाव, ओढे यांचे सुकणे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. स्वातंत्र्यानंतर देशात 24 लाख तलाव होते, परंतु आता फक्त 5 लाख तलाव शिल्लक राहिले आहेत. अशा स्थितीत उन्हाळ्यात पाणी येणार कोठून?
मार्च महिन्यापासूनच देशात तापमानाचा पारा चाळिशी पार करून पुढे गेला आहे. हवामान खात्याने उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे आणि अनेक भागांत हे चटके जनता सोसत आहे. येणारे प्रत्येक वर्ष हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदविले जात आहे. सतत वाढणारी उष्णता ही ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. उष्णता वाढण्याचे एक कारण म्हणजे समुद्राच्या तापमानातील वाढ. त्यामुळे येणाऱ्या काळात उष्णता आणखी वाढणार आहे. त्यासोबतच पृथ्वीचे तापमानही वाढत जाईल. साधारणतः समुद्राचे तापमान 39 अंश सेल्सियसपर्यंत असायला हवे, पण ते आता लक्षणीय वाढले आहे.
आज पृथ्वीसमोरील मोठय़ा संकटांमध्ये तिचे वाढते तापमान हा एक प्रमुख मुद्दा आहे. तापमानवाढीमुळे नदी असो वा वन, सर्वच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पर्यावरणीय संकटांमधून जात आहेत. 70 टक्के जलस्रोत आणि जगभरातील हिमखंड हळूहळू आपली क्षमता गमावत आहेत. वास्तविक हे हिमखंड एका अर्थाने पाण्याच्या फिक्स्ड डिपॉझिटसारखे आहेत, जे हिमनद्यांच्या माध्यमातून नेहमी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवतात, पण त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. जिओफिजिकल रिसर्च लेटरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, उद्योगांमुळे पृथ्वीचे तापमान 4 अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकते. त्यामुळे एक तृतीयांश बर्फ वितळून समुद्रात जाईल आणि पृथ्वीवर प्रचंड पूर येईल. वैज्ञानिकांचे मत आहे की, तापमान कोणत्याही परिस्थितीत 2 अंश सेल्सियसपेक्षा जास्त वाढू नये. तसेच 1.5 अंश सेल्सियस वाढल्यास जवळपास 14 टक्के बर्फ वितळू शकतो. या अभ्यासानुसार, अलास्कामध्ये 39 मैल लांबीची हिमनदी वाढत्या तापमानामुळे जवळपास शंभरपट अधिक वेगाने वाहू लागली आहे. जगातील वने तर आणखी बिकट अवस्थेत आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर पृथ्वीवरील निम्म्याहून अधिक वनक्षेत्र नष्ट झाले आहे. भारतातच 1988 ते 2000 दरम्यान 10 कोटी हेक्टरपेक्षा अधिक वनतोड झाली. वनक्षेत्रामुळे तापमान वाढ नियंत्रणात राखण्यास मदत होते. कडाक्याच्या उन्हात शीतल गारवा देण्याचे काम झाडे करत असतात. वने ही हवा, पाणी आणि माती यांची केंद्रे असतात. सबब, ती नाहीशी झाली तर या तिन्ही गोष्टींवर मोठे संकट येऊ शकते. देशातील वर्षाजन्य नद्या मोठय़ा संकटात सापडल्या आहेत आणि याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जलस्रोत क्षेत्रांतील वनांचा होत असलेला ऱहास. आता या नद्या पूरच आणतात किंवा पूर्णपणे सुकून जातात. या नद्यांवर अवलंबून असलेले तलाव आणि विहिरीही नामशेष होत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात 24 लाख तलाव होते, परंतु आता फक्त 5 लाख तलाव शिल्लक आहेत. सरासरी दरवर्षी भूगर्भातील पाणी एक मीटर खाली जात आहे आणि लाखो विहिरी कोरडय़ा पडून नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात मोठी लोकसंख्या बाधित होत आहे.
उन्हाळ्यामध्ये तापमानाचा पारा वर सरकू लागला की, नद्या, नाले, तलाव यामधील पाणी कमी होऊन ते कोरडे पडण्याची समस्या वाढते. त्यामुळे लाखो लोक बाधित होतात. वर्षानुवर्षे आपण ही परिस्थिती पाहत आलो आहोत, पण आपण पाण्याला दोनच प्रकारांमध्ये पाहतो. एक, जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा आणि दुसरे, जेव्हा देश पुराच्या तडाख्यात सापडतो तेव्हा ! पण हे दोन्ही प्रकार आपल्या व्यवस्थापनाच्या अभावामुळे निर्माण झाले आहेत. कारण जर आपण चारशे वर्षांपूर्वीचे चित्र पाहिले तर आपल्याला निसर्गाच्या व्यवस्थापनाची ताकद मान्य करावी लागेल. निश्चितच त्या काळी लोकसंख्या कमी होती आणि पाण्याचा वापरही तुलनेने मर्यादित होता, पण तरीही व्यवस्थापन अचूक होते. मुख्य समस्या अशी आहे की, आपण पाण्याच्या बाबतीत निसर्गाच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले. आपण फक्त उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले आणि तेच पाणी मोठय़ा इमारतींमध्ये आणि उद्योगांमध्ये झिरपवले. आपण हे लक्षात घेतले नाही की, पाण्याची भरपूर उपलब्धता आणि त्याचे योग्य अस्तित्व हेच आपल्या व्यवस्थापनाचे मुख्य आधार आहेत. आपण पाणी वितरणावर भर देताना त्याच्या वापराकडे दुर्लक्ष केले. पाण्याची कमतरता ही मोठी समस्या असूनही देशभरात होणाऱया पायाभूत विकासामध्ये पाण्याच्या गरजेबाबतचा दृष्टिकोनच नाही. उदाहरणार्थ, आपण आधी मोठमोठय़ा इमारती आणि उद्योग उभारतो आणि त्यानंतर जमिनीखालच्या पाण्याचा बेसुमार उपसा सुरू करतो, पण भूमिगत पाण्याचा उपयोग एका ठरावीक मर्यादेपर्यंतच शक्य आहे. आज देशातील अनेक भागांत भूजलाची स्थिती भीषण बनली आहे. आपण जलसाठे संपवत आहोत. जुन्या विहिरी आणि हजारो वर्षांपासून वाहणाऱया पर्जन्याधारित नद्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे काही नद्या मृत झाल्या आहेत. या नद्यांचा नष्ट होण्याचा अर्थ म्हणजे जमिनीखालचा पाण्याचा स्तर कमी होणे आणि परिणामी विहिरी कोरडे पडणे. पाण्याबाबत फक्त दुष्काळ आणि पुराच्या संदर्भात विचार न करता त्याच्या संपूर्ण व्यवस्थापनावर भर द्यावा. पाणी ही आता केवळ कोणत्याही सरकारची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
थोडक्यात, उष्णतेच्या झळा आणि त्यामुळे निर्माण होणारी पाणी टंचाई या सर्वांच्या मुळाशी आपण निसर्गाशी केलेली प्रतारणा हे मूलभूत कारण आहे, पण मानवाच्या चुकांचा फटका संपूर्ण जीवसृष्टीला बसत आहे. दुर्दैवाने, तापमानवाढीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी काय झाले हे पाहिले तर आपल्याला फक्त निराशाच मिळेल. ना मिथेनच्या प्रमाणात कोणतीही घट झाली, ना प्राणवायूच्या गुणवत्तेत सुधारणा होईल असे कोणतेही पाऊल उचलले गेले. आपण कधी पराळी जाळण्याला, कधी बांधकामांना, कधी वाहतुकीला आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला दोष देत राहिलो, पण या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. जोपर्यंत आपण निसर्गस्नेही, निसर्गानुकूल आणि निसर्ग संवर्धनक पावले उचलत नाही तोपर्यंत तापमानवाढीच्या झळा सोसत राहाव्या लागणार आहेत. तापमानवाढीपासून पृथ्वीला वाचवायचे असेल तर ‘माता भूमिः पुत्रोहं पृथिव्याः’ या विचारांना लक्षात ठेवून पृथ्वीच्या संवर्धनावर अधिक भर देण्याची गरज आहे.
(लेखक ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ आहेत.)