ठसा – राम गोविंद

>> दिलीप ठापूर

चित्रपटसृष्टीसारख्या झगमगाटी दुनियेत राहूनही आणि बरीच वर्षं काम करूनही काहींना प्रकाशझोतात राहता येत नाही. चलतीचा काळ ओसरला की ते दुर्दैवाने बरेचसे विस्मृतीत जातात आणि एके दिवशी अचानक त्यांच्या निधनाची बातमी येते. पटकथा लेखक व दिग्दर्शक राम गोविंद यांच्याबाबत असेच काहीसे झाले. जवळपास तीस-पस्तीस वर्षं ते हिंदी चित्रपटसृष्टीत लेखक म्हणून कार्यरत राहिले. चित्रपट दिग्दर्शनाचाही अनुभव त्यांनी घेतला. पण ‘आपले काम भले नि आपण भले’ अशी वृत्ती त्यांनी जपल्याने ते यशस्वी असूनही फारसे नावारूपास आले नाहीत.

त्यांचा लेखनात सहभाग असलेला बहुचर्चित चित्रपट म्हणजे बी.आर. फिल्म निर्मित व बी.आर. चोप्रा आणि रवी चोप्रा दिग्दर्शित ‘बागबान’. अमिताभ बच्चन व हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या काwटुंबिक चित्रपटाचे लेखन खुद्द बी.आर. चोप्रा यांच्यासह अचला नागर, सतीश भटनागर, शफीक अन्सारी आणि राम गोविंद यांचे आहे. एक भारी संचच. म्हणून हा चित्रपट जास्त प्रभावी ठरला. चित्रपट माध्यमात पटकथा व संकलन या दोन अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी. दृश्य माध्यमातून कथा सांगण्यासाठी लेखकास त्या माध्यमाची उत्तम जाण असावी लागते आणि वारंवार ड्राफ्ट लिहावा लागतो. राम गोविंद यात विशेष रस घेत. त्यामुळेच त्यांनी तब्बल बारा हिंदी चित्रपट स्वतंत्रपणे लिहिले. आत्माराम दिग्दर्शित ‘आरोप’ ( 1974) हा त्यांनी लिहिलेला पहिला चित्रपट. त्यात विनोद मेहरा, सायरा बानू व विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर राम गोविंद यांनी पैद, मेरा रक्षक, बिंदिया चमकेगी इत्यादी चित्रपटांचे पटकथा लेखन केले. पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपट हे वैशिष्टय़ त्यांनी जपले आणि पटकथाकार म्हणून जम बसल्यावर चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले. पहिला चित्रपट ‘पत्तो की बाजी’ (1986) त्यात राजन सिप्पी, खुशबू, स्वप्ना आणि गुलशन ग्रोव्हर यांच्या भूमिका होत्या. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर सुपर होते. पण चित्रपटाला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. तरीही नाराज न होता त्यांनी गोविंदा, किमी काटकर या जोडीला घेऊन ‘तोहफा मोहब्बत का’ (1988) या चित्रपटाच्या दिग्दर्शनावर लक्ष पेंद्रित केले, तर नेमका गोविंदा एकाच वेळेस अगणित चित्रपटात कार्यरत राहिल्याने राम गोविंद यांनी न त्रासता चित्रपट पूर्ण तर केला पण त्यानंतर दिग्दर्शनापेक्षा लेखनावर लक्ष पेंद्रित केले. विशेषतः मनोरंजक उपग्रह वाहिनीच्या काळात ते अतिशय मोठय़ाच प्रमाणावर यशस्वी ठरले. हेमा मालिनी यांच्या वुमन ऑफ इंडिया, आम्रपाली, उर्वशी, झांझी की राणी यांचे लेखक राम गोविंद तसेच महाभारत कथा, औरत, मै हू दिल्ली, बेटा, विष्णू पुराण, माँ शक्ती, आप बिती, दो खिलाडी अशा मालिका लिहिताना कोणत्याच चौकटीत आपणास अडपू दिले नाही. नायिकाप्रधान विषय असो वा पौराणिक त्यांनी सारखाच रस घेतला. बाल प्रेक्षकांसाठी थीफ ऑफ बगदाद, चमत्कार अशा मालिका लिहिल्या. आपल्या कामात असे व्यग्र राहणे त्यांनी पसंत केले. त्यांच्या पत्नी माया गोविंद या चित्रपट गीतकार. राम गोविंद लिखित काही चित्रपट व मालिकांचे गीतलेखन माया गोविंद यांचेच. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील. तिकडेच लग्न करून मग ते मुंबईत आले. राम गोविंद महाविद्यालयात असल्यापासून लेखक. विजय तेंडुलकर लिखित ‘शांतता कोर्ट सुरू आहे’ हे बहुचर्चित नाटक ‘खामोश अदालत जारी है’ या नावाने हिंदीत रूपांतरीत केले. यासाठी त्यांना उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.

हिंदी व इंग्लिश भाषेत पारंगत असलेल्या राम गोविंद यांना मराठी, गुजराती व पंजाबी भाषादेखील उत्तम येऊ लागल्या होत्या. आपल्याच कामात मग्न होणे हे आजच्या दिखाऊ अशा चित्रपटसृष्टीत अतिशय दुर्मिळ. राम गोविंद त्यातील एक होते.