>> दिलीप ठाकूर
2024 अर्धे संपले. या सहा महिन्यांत काही सिनेमांनी गल्ला जमवला, तर काही चांगलेच आपटले. आता उर्वरित सहा महिन्यांत कोणते सिनेमे येत आहेत, त्यांची चर्चा कशी सुरू आहे आणि त्यातील नेमके कोणते सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील याचा अंदाज.
चित्रपट हिट ठरोत वा फ्लॉप, ‘निर्मितीची फॅक्टरी’ कायमच जोरात असते. आता तर मल्टिप्लेक्सच्या पडद्यावरून उतरलेला चित्रपट ओटीटीवर घरबसल्या पाहायला मिळतोय याची जणू सवय झाल्याने महागडे तिकीट काढून थिएटरवर जावे नि ‘कल्की 2898 एडी’ हा थ्री डायमेन्शन चित्रपट एन्जॉय करावा की ओटीटीवर आलेला ‘लापता लेडीज’ पाहून सोशल मीडियात व्यक्त व्हावे असे चित्र निर्माण झाले आहे.
2024 च्या पूर्वार्धातील हिंदी चित्रपट असाच वाटचाल करत करत आता उत्तरार्धात प्रवेश करतोय. सहामाही संपताना ‘मुंज्या’ने घवघवीत यश मिळवून ‘छोटे चित्रपट मोठे यश’ यावर विश्वास वाढवला.
उत्तरार्धातील महत्त्वाच्या चित्रपटातही विविधता स्पष्ट दिसतेय. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट तिकडच्या अन्य प्रादेशिक भाषांसह हिंदीत डब होऊन जगभरात प्रदर्शित होण्याच्या ‘पॅन इंडिया’ संस्कृतीत आता ‘अहो! विक्रमार्का’ या भव्य दिमाखदार चित्रपटाकडे रसिकांचे विशेष लक्ष आहे. पुरातन काळापासूनची गोष्ट आजच्या सायन्स फिक्शनपर्यंत रंगवणे हे अशा चित्रपटांचे विशेष. “प्रचंड मोठय़ा बजेटमध्ये हे चित्रपट बनताना पटकथेवरही लक्ष द्या हो!” असे म्हणेपर्यंत हे चित्रपट शे-दोनशे कोटींचा गल्ला जमवल्याच्या बातम्या येतात. ‘पुष्पा-2’ ही महत्त्वाचा. रश्मिका मंदानाची ाsढझ या चित्रपटाचे जोरदार स्वागत करेलच. म्हणूनच ‘स्टार’ महत्त्वाचा असतो तो असा. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सिंघम फॉर्म्युला’ ऐन दिवाळीत ‘सिंघम अगेन’ करत येईल. महागडय़ा गाडय़ा उडवणे नि प्रचंड हिंसा यात असणारच. रोहित शेट्टीचा पिक्चर म्हणजे डोक्याला शॉट नाही याची तेवढी खात्री. ‘सर्कस’च्या अपयशानंतर रोहित शेट्टी कसा सावरलाय हे दिसेल.
कमल हसन आपल्याच ‘इंडियन’चा ( 1996) सिक्वेल ‘इंडियन-2’ नावाने आणतोय. कमल हसनचा चाहता वर्ग प्रचंड आहे. अक्षय कुमारची भूमिका असलेल्या ‘सरफिरा’मध्ये सामान्य माणसालाही विमान वाहतुकीची संधी व आनंद मिळावा ही मध्यवर्ती कल्पना छान आहे. पडद्यावर कशी रंगलीय हे पाहायचे आहे. ती रनवेवरच राहतेय की टेकऑफ घेतेय हे दिसेलच. अक्षय कुमारला एका सुपरहिटची गरज आहेच. भूतपटात ‘स्त्राr-2’ येतोय. ‘औरें में कहा हैं दम’, ‘भुलभुलैया-3’, ‘छावा’, ‘वेलकम टू जंगल’, ‘बेबी जॉन’, ‘गेम चेंजर’,
‘बॅड न्यूज’, ‘जिगरा’ असे अनेक चित्रपट येत आहेत. आमीर खान व जेनेलिया डिसोझा देशमुख अशी अगदी वेगळीच जोडी असलेल्या ‘सितारों जमी पर’ या चित्रपटाची घोषणेपासूनच चर्चा आहे. या सगळ्यात आणखी काही चित्रपट येत आहेत. त्यातील हिट किती नि कसे होतील आणि नाकारले कोणते जातील हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.
चित्रपट रसिकांना एखादा चित्रपट आवडला रे आवडला की, त्यांना कोणीही थोपवू शकत नाही, पण त्यांना तो अजिबात आवडला नाही तर तो चित्रपट रिकाम्या खुर्च्यांना दाखवावा लागतो. हे तर अनेक वर्षे सुरू आहेच. फरक इतकाच की, आता यश काय नि अपयश काय, त्यांचा कालावधी फार छोटा झालाय. आपण या प्रत्येक चित्रपटाला शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)