>> दिलीप ठाकूर
चित्रपट म्हणजे अनेक प्रकारच्या कला व विज्ञान यांचे मिश्रण अशी वस्तुस्थिती असली तरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची खरी व खोटी प्रेमप्रकरणे, त्यांची लग्ने, संसारातील कुरबुरी, भांडणे, वादविवाद, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, कॉन्ट्रॅक्ट लग्न, अभिनेत्रींचे धाडसी पह्टो सेशन यात रस असणारा खूपच मोठा वर्ग आहे आणि या सगळ्यांना प्रसार माध्यमातून रुजवले त्या ‘स्टारडस्ट’ या गॉसिप्स मॅगझिनचे जन्मदाते नारी हिरा यांचे मुंबईत गेल्या आठवड्यात निधन झाले.
सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नवीन प्रवाह कार्यरत झाले (समांतर चित्रपट चळवळ, नवीन चित्रपट मॅटीनी खेळास प्रदर्शित वगैरे). स्थित्यंतराचा हा काळ होता आणि त्यातीलच एक गोष्ट सिनेपत्रकारितेने कूस बदलली. तत्पूर्वीही कलाकारांच्या खासगी गोष्टींवर बोलले, लिहिले, सांगितले जाई, पण त्याला मुख्य प्रवाहात आणले ते नारी हिरा यांच्या मॅग्ना प्रकाशन संस्थेच्या ‘स्टारडस्ट’ या चित्रपट कलाकारांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींना चविष्ट मीठ मसाला लावून प्रसिद्ध करणाऱया मासिकाने. 1971 साली हे मासिक सुरू होताच चित्रपट कलाकारांच्या संसारातील गोष्टी, फिल्मी पार्ट्य़ांतून काय काय चालते, कोण कोणाला कसे बिलगतो (पार्टी कल्चर) यांची रसभरित वर्णने (पेज थ्री कल्चर) वाचकांपर्यंत पोहोचू लागली. त्यातच कमी-जास्त फॅशनेबल वस्त्रांतील कलाकारांच्या आकर्षक फोटो सेशनची भर होतीच. राजेश खन्नाच्या व्रेझचा हा काळ होता. रेखाच्या कारकीर्दीची ही सुरुवात होती. ‘स्टारडस्ट’ला भरपूर मसाला मिळण्यास जणू पूरक वातावरण होते. नारी हिरा यांचे व्यावसायिक पाऊल यशस्वी ठरले होते तरी त्या काळात असे मासिक प्रामुख्याने श्रीमंत व उच्चभ्रू वर्गात पाहिले जाई ( त्यात वाचण्यासारखे काय असते असे पुत्सितपणे म्हटलेही जाई ). मध्यमवर्गीय अशा मासिकाला वाचनालयात गेल्यावर हळूच चाळत असे, अजिबात घरी आणत नसे. राजेश खन्नाला सुपर नखरा, शत्रुघ्न सिन्हाला शॉटगन सिन्हा, धर्मेंद्रला गरम धरम, अनिल कपूरला स्मार्ट ऑपरेटर असे सर्वप्रथम याच ‘स्टारडस्ट’ने म्हटले आणि अनेक कलाकारांचा रोष ओढवून घेतला. या मासिकाच्या बेधडक शैलीचा स्वतःचा हुकमी वाचक वर्ग होता. अमिताभ, शाहरुख खान, आमीर खान यांनी काही काळ या मासिकावर बहिष्कार टाकला. परवीन बाबीच्या एका मुलाखतीचे शीर्षकही बेधडक होते. अशा बेधडक मुलाखती आणि रेखा, झीनत अमानपासून पूजा भट्ट, अनू अगरवालपर्यंत अनेक तारकांचे धाडसी पह्टो सेशन हे ‘स्टारडस्ट’चे वैशिष्टय़. या मॅगझिनमधील चटकदार, खमंग, चघळत रहावे असे गॉसिप्स अन्य भाषांत पाझरत गेले. ‘स्टारडस्ट’चा दिवाळी अंक म्हणजे जणू स्फोटक मजकूर, बेधडक वक्तव्य आणि वादग्रस्त फोटो सेशन. त्यात त्यांना सातत्य ठेवताही आले. तीच नारी हिरा यांची खासियत ठरली.
नारी हिरा अशा एकाच यशावर समाधान मानणारे नव्हतेच. अतिशय महत्त्वाकांक्षी माणूस. दक्षिण मुंबईच्या श्रीमंत वर्गाच्या जीवनशैली संस्कृतीची ओळख असणारा. कुलाब्यातील आपल्या मॅग्ना प्रकाशन व्यवसायाचा पसारा वाढवताना शो टाईम हे आणखीन एक चित्रपटसृष्टीविषयक मासिक सुरू करून जमही बसवला. तसेच सॅव्ही, सोसायटी, हेल्थ अशी विविध प्रकारची इंग्लिश मासिके सुरू केली. लक्षवेधक मुखपृष्ठ आणि गुळगुळीत कागदावरील मजपूर नि पानभर फोटो हे वैशिष्टय़ जपले. प्रकाशन व्यवसायात जम बसवून मग नव्वदच्या दशकात व्हिडीओ चित्रपट निर्मितीतही पाऊल टाकले. त्यासाठी हिबा फिल्म्स ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. त्यांनी ‘घोटाळा’, ‘शिंगोरा’, ‘कलंक का टिका’, ‘सोने का पिंजरा’, ‘खतरनाक इरादे’, ‘नकली चेहरा’ असे व्हिडीओ चित्रपट निर्माण केले. त्यात उर्मिला मातोंडकर, आदित्य पांचोली, पर्सिस खंबाटा अशा कलाकारांनीही काम केले. नारी हिरा यांचा जन्म पाकिस्तानातील कराची शहरातील. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय हिंदुस्थानात आले. कालांतराने नारी हिरा यांनी आपली जाहिरात एजन्सी सुरू केली. बदलत्या काळानुसार आपली व्यावसायिक धोरणे ठरवत त्यांनी बरेच यश संपादले. ते अविवाहित होते. चित्रपटसृष्टीतील पुचाळक्या (अर्थात गॉसिप्स) जनसामान्यांपर्यंत आणण्यात व रुजवण्यात त्यांचा मोठाच वाटा होता.