सिनेविश्व – दक्षिणेकडील दिग्दर्शकांची हिंदीत चलती

>> दिलीप ठाकूर

हिंदी चित्रपटात नेहमी एक हुकमी संवाद असायचा, ‘वक्त बदलने मे देर नहीं लगती…!’ दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट अन्य भाषेत डब होऊन मोठय़ाच प्रमाणावर अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यावरून तरी असंच म्हणायला हवं.

एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ (पहिला व दुसरा), ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’, सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ (पहिला व दुसरा) हे एकाच वेळेस तेलगु, मल्याळम, कन्नड, तामीळ आणि महत्त्वाचं म्हणजे, हिंदीत पडद्यावर आले व धो धो यशस्वी ठरले. या यशाने मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीला चांगलाच धक्का बसलाय. प्रेक्षकांपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच या दाक्षिणात्य पिक्चर्सची रंगतदार चर्चा, लाईक्स वगैरे जोरात सुरू झाले. यामुळेच दक्षिणेतले दिग्दर्शक मराठी व हिंदी चित्रपट रसिकांना ज्ञात होत आहेत. गुगलवर जाऊन राजमौली, सुकुमार यांचे आणखी कोणते चित्रपट आहेत, ओटीटीवर कोणते पाहता येतील, याचा शोध सुरू झाला. सुपरहिट चित्रपट बरेच काही घडवत असतोच आणि चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे असल्यानेच त्यातील कलाकार, गीत, संगीत, दिग्दर्शक या सगळ्यानाच महत्त्व येतं.

तुम्हाला कल्पना नसेल की, दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शक हिंदीत येण्याचीही मोठी परंपरा आहे. त्यातील अनेकांना हिंदी भाषाही येत नव्हती तरी त्यांनी हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. साठच्या दशकात एस. एस. वासन (घराना), एस. एम. श्रीरामुलू नायडू (आझाद), चाणक्य (राम और श्याम), टी. प्रकाश राव (ससुराल) अशा दक्षिणेकडील अनेक दिग्दर्शकांनी हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्या काळात दक्षिणेकडील प्रसाद प्रॉडक्शन्स, एव्हीएम, जेमिनी वगैरे चित्रपट निर्मिती संस्था सातत्याने हिंदी चित्रपट निर्माण करीत. प्रसाद प्रॉडक्शन्सच्या के. बालचंदर दिग्दर्शित ‘एक दुजे के लिए’ या शोकात्म क्लायमॅक्स असलेल्या चित्रपटाची सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रात भरपूर चर्चा रंगली.

दिग्दर्शक भारती राजा याने आपल्या तामीळ चित्रपटावरून ‘रेड रोझ’ आणि ‘सोलवा सावन’ हिंदीत दिग्दर्शित केला.‘सोलवा सावन’मध्ये मूळ चित्रपटातील श्रीदेवीला हिंदीत आणलं.

के. राघवेंद्र राव, दासरी नारायण राव, के. बापय्या, टी. रामाराव, के. भाग्यराज, के. बापय्या, सुरेश कृष्ण वगैरे अनेक दाक्षिणात्य दिग्दर्शक हिंदीत आले. यात मणिरत्नमने आपला स्वतचा रसिक वर्ग निर्माण केला. त्यांचे ‘रोजा’, ‘बॉम्बे’ हे मूळ तमीळ चित्रपट हिंदीत डब झाले. तर ‘नायकन’ (तामीळ) फिरोझ खानने ‘दयावान’ नावाने रिमेक केला होता. विनोद खन्नाची प्रभावी अदाकारी वगळता बाकी सगळं फसलं होतं. रामगोपाल वर्मा दक्षिणेकडूनच आला आणि हिंदीत रंगिला, सत्या, कौन, भूत, कंपनी अशी उल्लेखनीय विविधता दाखवली.

[email protected]
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)