>> दिलीप ठाकूर
कोल्हापूर म्हणजेच कलापूर. कोल्हापूर व चित्रपट यांचे अगदी मूकपटापासून दीर्घकालीन घट्ट नाते. विशेषतः मराठी चित्रपटाच्या वैभवशाली इतिहासात कोल्हापूरची भूमिका अतिशय मोलाची, उल्लेखनीय आणि त्यात विविध माध्यमांतून चित्रपट माध्यम व व्यवसायात आलेले लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, अगदी कामगारही अगणित. असेच कोल्हापुरातील एक पटकथा लेखक, दिग्दर्शक व कलाकार नारायण ईश्वर रेळेकर. चित्रपटसृष्टीत ते एन. रेळेकर या नावाने वावरले. त्यांचे वयाच्या 80 व्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन झाले. 1970 सालापासून ते कलाक्षेत्रात कार्यरत होते.
एन. रेळेकर हे मूळचे कलापथकाचे लेखक व लहान-मोठय़ा भूमिका साकारणारे कलाकार. विशेषः मराठवाडा व विदर्भ येथे मोठय़ाच प्रमाणावर ते दौरे करीत आणि कोल्हापूरमध्ये असताना मराठी चित्रपटातून लहान-मोठय़ा भूमिका साकारत. बहुरूपी वगैरे अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारत असतानाच चित्रपट माध्यम व व्यवसाय समजून घेतला. त्यांनी चित्रपटाचा विषय व बजेटचा विचार करत निर्मितीचा मध्यम मार्ग स्वीकारत चित्रपट पटकथा, संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले, असे त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांची नावे व स्वरूप पाहताना लक्षात येईल. विशेष उल्लेखनीय गोष्ट अनेक नामवंत कलाकारांनी त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांत भूमिका साकारल्या हे त्यांचे यश म्हणता येईल. ‘झुंज तुझी माझी’ (1992, प्रमुख भूमिकेत अशोक सराफ, अश्विनी भावे, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू), ‘टोपीवर टोपी’ ( 1995, प्रमुख भूमिकेत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निशिगंधा वाड, पूजा पवार), ‘धनी कुंकवाचा’ (2000, प्रमुख भूमिकेत वर्षा उसगावकर, दीपक देऊळकर, सतीश पुळेकर, चेतन दळवी, सुरेखा कुडची), ‘शांतीनं केली क्रांती’ (2002, प्रमुख भूमिकेत वर्षा उसगावकर, दीपक देऊळकर, चेतन दळवी, राजशेखर, राहुल सोलापूरकर), ‘छंद प्रीतीचा’ (2017, प्रमुख भूमिकेत सुबोध भावे, सुवर्णा काळे, शरद पोंक्षे, गणेश यादव, हर्ष कुलकर्णी, विकास समुद्रे) हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट.
‘छंद प्रीतीचा’ या आपणच फार अगोदर लिहिलेल्या नाटकावरून त्यांनी त्याच नावाचा चित्रपट पडद्यावर आणताना अतिशय उत्तम माध्यमांतर केले आणि भरपूर मेहनतही घेतली. त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे त्यांच्या चौफेर यशस्वी कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा होता. ढोलकी सम्राट यासिम माम्बरी यांना डोळ्यांसमोर ठेवून ‘छंद प्रीतीचा’ हे नाटक लिहिताना त्यात भरपूर नाटय़ निर्माण केले आणि मग चित्रपटात लोकसंगीतावरील या चित्रपटात त्यांनी शृंगारिक लावणी, शाहिरी लावणी, सवाल जवाब यांची उत्तम मांडणी केली. ते अधूनमधून चित्रपट गीतलेखन करीत. त्यामुळे त्यांना चित्रपटातील गीत संगीत व नृत्य यांचे महत्त्व चांगलेच ज्ञात होते. हा चित्रपट अधिकाधिक प्रभावी ठरावा म्हणून सांगली जिह्यातील नांद्रे, वसगडे, भिलवडी, ब्रह्मनाळ, हरिपूर या रम्य अशा कृष्णामाईच्या परिसरात तसेच कर्नाटकमधील बदामी येथे चित्रीकरण केले आणि मग कोल्हापूरमधील प्रभात चित्रपटगृहात याच चित्रपटाचा भव्य दिमाखदार प्रीमियर आयोजित केला. कलेच्या क्षेत्रात अनेक वर्षे काम करत करत वाटचाल करणाऱया एन. रेळेकर यांच्यासाठी हे सगळेच विशेष असेच होते.
‘टोपीवर टोपी’ या चित्रपटात त्यांनी अशोक सराफचा सहाय्यक, वाहन चालक वगैरेचा ‘थ्री इन वन’ या नावाची व्यक्तिरेखा साकारली. अशोक सराफ त्यांना उद्देशून म्हणे, दाढी गाडी माडी थ्री इन वन. अनेक ध्वनिफीत व चित्रफितीचेही लेखन, निर्मिती त्यांनी केली. अतिशय दिलदार म्हणून ते ओळखले जात. सतत हसत हसत बोलणे हे त्यांचे वैशिष्टय़. निर्माता अचानक अडचणीत आला तर त्याला सांभाळून घेत चित्रपट पूर्ण करून तो पश्चिम महाराष्ट्रातील शहरापासून दूर खेडय़ापाडय़ातून प्रदर्शित होईल याकडे त्यांचे लक्ष असे. जनसामान्यांचे मनोरंजन करणे हाच त्यांचा हेतू कायम होता. त्या आपल्या वृत्तीशी ते कायमच प्रामाणिक राहिले.