>> धनंजय साठे
`बंध नायलॉनचे’ या एकांकिकेवर आधारित चित्रपटासाठी शून्यापासून आम्ही सुरुवात केली अन् अनेक खाचखळगे पार करत आमचा सिनेमा यशस्वीरीत्या प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने आमच्या टीमचेही बंध जुळले.
साधारणपणे असं म्हटलं जातं की, नाती जपावी लागतात, नाहीतर ती तुटतात, पण जर ती नायलॉनच्या धाग्याने बनलेली असतील तर ती तुटत नाहीत. एक दशकापूर्वी या थीमवर बेतलेली एक एकांकिका खूप चर्चेत होती. त्या एकांकिकेचं नाव होतं `बंध नायलॉनचे’ आणि त्याचे लेखक होते अंबर हडप आणि गणेश पंडित! अनेक खाचखळगे पार करत हा सिनेमा बनवला होता. ही एकांकिका पाहण्याचा योग आला तेव्हा माझा मित्र आणि `चकवा’ सिनेमाचा दिग्दर्शक जतीन वागळेला ती एकांकिका खूप आवडली आणि त्याने सिनेमा बनवण्याची इच्छा दर्शवली. एकांकिका होती 25 मिनिटांची आणि सिनेमा बनणार होता किमान दोन तासांचा. कथेच्या मूळ गाभ्याला धक्का न देता सगळं कसं जुळवून आणायचं? मलाही ती कथा खूप आवडली होती. तर आम्ही दोघांनी ठरवलं की, आपल्याला एखादा भक्कम निर्माता लाभला तर आपण एक उत्तम कलाकृती जन्माला घालू शकतो.
त्यानंतर मी आणि जतीन खूप फिरलो. ऊन-पाऊस न बघता अनेकांना भेटलो. तसंच एकांकिकेवरून सिनेमा बनवण्यामागचं गणितही सोडवत होतो. त्याच काळात जतीनचा आधीचा सिनेमा `चकवा’चं प्रॉडक्शनचं काम सांभाळणाऱ्या मिलिंदला टीममध्ये सामावून घेतलं. व्ही. के. मूर्तींसारख्या दिग्गज छायाचित्रकाराबरोबर काम केलेला जतीनचा मित्र शिरीष देसाई, तोही टीममध्ये सामील झाला. पण अजून आम्हाला निर्माता लाभला नव्हता.
शिरीष मूळचा गोव्याचा. त्याच्या परिवारातले काहीजण राजकारणात होते. एक दिवस `डुबनेवाले को तिनके का सहारा मिल जाये’, तसं घडलं आणि गोव्याच्या एका प्रसिद्ध उद्योगसमूहाचे तरुण, धडाडीचे युवक आमच्या संपर्कात आले. त्यांनी जतीनला गोव्याला बोलावून घेतलं. चर्चा झाली. गोष्ट ऐकून भारावून गेलेल्या त्या युवकाने आमच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी होकार दिला. आमचा आनंद गगनात मावत नव्हता. हीच ती वेळ, हाच तो क्षण! काही दिवसांतच आम्ही कलाकार कोण असतील, यावर चर्चा सुरू केली. या सिनेमाचा विषय आणि आवाका पाहता योग्य कलाकार मंडळी मिळणं कठीण झालं होतं. सिनेमाची कथाच तशी होती.
कथेतला नायक परदेशात आपल्या बायको आणि सात वर्षांच्या मुलीबरोबर राहत असतो. कंपनीच्या एका मोठय़ा प्रकल्पासाठी कुटुंबासह मायदेशी जाण्याचा तो प्लॅन आखतो. त्याच्या लेकीची एक अट असते ती म्हणजे तिला तिच्या आजी-आजोबांना भेटायचं असतं. ती वडिलांसमोर आजी-आजोबा हवेत असा हट्टच धरते. तरुणपणी नायकाला उच्च शिक्षणासाठी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांनी त्यांची जमीन गहाण ठेवून ते पैसे त्याच्या शिक्षणासाठी वापरावेत असं त्याचं म्हणणं असतं. वडील त्याला नकार देतात. त्यामुळे नायकाचं एक वर्षाचं नुकसान होतं. नंतर तो स्कॉलरशिपवर पुढचं शिक्षण पूर्ण करतो. त्यामुळे त्याची त्याच्या आईबाबांबरोबरच्या नात्यात एक कटुता निर्माण झालेली असते. हिंदुस्थानात आल्यावर नायक आईवडिलांना भेटायला कोकणात जातो, पण तिथे त्यांच्यात पुन्हा बिनसतं. त्याच्या चिमुरडीची तिच्या आईजवळ भुणभुण चालू असते. आजी-आजोबा कधी येणार? एका संध्याकाळी मित्राशी बोलताना नायक आपली व्यथा त्याच्या जवळ मांडतो. त्यावर मित्र म्हणतो, “हात्तिच्या, एवढंच ना! मी देतो तुझ्या छोटीला 4-5 दिवसांसाठी आजी-आजोबा.” मित्राचं बोलणं नायकाला काहीच समजत नाही आणि चौथ्या दिवशी नायकाच्या दारात आईवडील उभे असतात. एकीकडे त्याला आनंद होतो, तर दुसरीकडे तो पार गोंधळून जातो. आपल्या मित्राला हे कसं काय जमलं असावं? मित्र त्याच्या घरी येतो आणि सांगतो की, ते त्याचे खरे आईबाबा नसून ते रोबोट आहेत. खरे आईबाबा जेव्हा रोबोटच्या समोर येतील तेव्हा काय धमाल उडू शकते या आणि अशा बऱयाच शक्यता कथेत दिसू लागल्या. आम्ही सगळेच उत्सुक होतो. एक नवीन उभारी आली होती.
सुबोध भावे मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी ठरला. त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा तो त्याच्या `कटय़ार काळजात घुसली’च्या पोस्ट प्राडक्शनमध्ये व्यस्त होता. खाली जमिनीवर बसून चहा-पाव खात आम्ही त्याला गोष्ट ऐकवली. सुबोध फायनल झाला. आईबाबा यांची दुहेरी भूमिका होती. आम्ही नाना पाटेकर आणि अश्विनी भावे यांना भेटायचं ठरवलं. पण नाना पाटेकर `वेलकम टू’साठी दुबईला जाणार होते. एवढय़ा मोठय़ा कलाकाराची जागा कोण घेणार? हे विचार चालू असतानाच आम्हाला महेश मांजरेकर हे नाव सुचलं. महेश सरांना आम्ही काही सांगायच्या आत ते म्हणाले, मला कल्पना आहे, तुम्ही नानाला भेटून मग माझ्याकडे आला आहात. ते ऐकून माझ्या आणि जतीनच्या पोटात गोळा आला.
आता पुढे कोण? पण मांजरेकर म्हणाले, “घाबरू नका, नाना माझा मित्र आहे, पण मुळात मला तुमची गोष्ट आवडली आहे. त्यामुळे माझ्याकडून होकार आहे. आता शांतपणे चहा घ्या.” महेशजींनी दिलेल्या तारखा अश्विनी भावेच्या तारखांशी जुळत नव्हत्या. तसंच तिला पुन्हा इतक्या लवकर अमेरिकेवरून हिंदुस्थानात येणं शक्य होणार नव्हतं. पुन्हा आमची स्वारी महेशजींच्या दारी. महेशजींनी दोन मिनिटं विचार केला आणि म्हणाले, तुमचा काही आक्षेप नसेल तर मेधा माझ्याबरोबर सुबोधच्या आईची भूमिका करेल. सुबोधच्या बायकोच्या भूमिकेत श्रुती मराठे फायनल झाली आणि याच सुमारास गोव्याच्या निर्मात्याने माघार घेतली.
पण `भगवान के घर में देर है अंधेर नही…’ एक दिवस जतीनला त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने भेटायला बोलावलं. जतीन त्यांना जाऊन भेटला. कथा ऐकवली, आधीच्या निर्मात्याबरोबर झालेले आर्थिक व्यवहार सांगितले आणि तिथून तो बाहेर पडला ते एका नव्या निर्मात्याला जन्माला घालून.
मग आम्ही सुबोधच्या मित्राच्या भूमिकेत सुनील बर्वे आला. राम नावाच्या एका महत्त्वाच्या भूमिकेत संजय नार्वेकरची हजेरी लागली. छोटय़ा मुलीच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेऊन एका सात वर्षांच्या मुलीची नेमणूक झाली. गीतकार मंदार चोळकर, संगीतकार अमित राज, नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे… अशी मातब्बर मंडळींची टीम बनली आणि आमचं स्वप्न पूर्ण झालं.
अनेक खाचखळगे पार करत आमचा सिनेमा `बंध नायलॉनचे’ यशस्वीरीत्या प्रदर्शित झाला.
– [email protected]
(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)