>> धनंजय साठे
मनोरंजनाच्या क्षेत्रात निस्वार्थ भावनेने घडलेली मैत्री खरंच क्वचितच पाहायला मिळते. या क्षेत्रातील ईर्षा, स्पर्धा, असुरक्षितता, स्वार्थ हे सारं मैत्रीच्या आड येतं. सगळेच कामापुरते मामा… निस्वार्थ, निखळ मैत्री होणं हा या क्षेत्रातील दुर्लभ योगच समजावा.
निखळ मैत्रीची व्याख्या काय असावी असं मला कोणी तरी हल्लीच प्रश्न विचारला. माझ्या मते स्वच्छ मैत्री ही निस्वार्थ आणि कोणतीही अपेक्षाविरहित असावी. त्यात स्वार्थ किंवा अपेक्षा डोकावल्या की त्या मैत्रीत भेगा पडायला लागतात. मी ज्या चित्रपट क्षेत्रात इतकी वर्षं कार्यरत आहे तिथे निस्वार्थ मैत्री अनुभवायला मिळणं म्हणजे एकदम दुर्मिळच आहे. सिनेमा आणि मालिका क्षेत्रात पराकोटीची स्पर्धा असते. तिथे निस्वार्थ भावनेने दोन माणसं एकमेकांशी बोलतायत हे मृगजळापरी भासतं. तरीही उत्तम निस्वार्थ मैत्रीची या क्षेत्रातही उदाहरणं नक्कीच आहेत… पण ती हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच. विशेषत मनोरंजनाच्या क्षेत्रात निस्वार्थ भावनेने घडलेली मैत्री खरंच क्वचितच पाहायला मिळते.
आज सकाळचं उदाहरण द्यायचं झालं तर असा काहीसा संवाद घडला. माझी मैत्रीण कविताचा मला अनेक महिन्यांनंतर कॉल आला. बरं, मला साधारण नव्वद टक्के लोक ‘डीजे’ या नावाने संबोधतात. शूटिंगचे स्पॉट बॉइजसुद्धा डीजे सर असंच बोलावतात. धनंजय जरा लांबलचक नाव वाटतं लोकांना. असो. तर मला सकाळी कविताचा कॉल आला. संवाद सुरू झाला.
कविता ः हाय डीजे! अरे कुठे आहेस तू? किती दिवसांत तुझा कॉल कसा नाही?
मी ः मी मस्त! तू बोल, आज कशी काय आठवण काढलीस?
कविता ः अरे, काय यार तुला विसरलेच नाही तर आठवण कसली काढायची. बरं, आपण कॉफीला तरी भेटू ना. काढ ना थोडा वेळ माझ्यासाठी.
मी ः कधीही चालेल… तू ठरव…
कविता ः नक्की ठरवेन. बरं मला सांग तू किरणला ओळखतोस का? त्या निर्मिती संस्थेचा?
मी ः हो. माझा चांगला मित्र आहे तो. का गं?
कविता ः अरे काल मी त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसला ऑडिशन देऊन आले. मला वाटलंच होतं तुझे एवढे कॉन्टॅक्ट्स आहेत. तू तर ओळखतच असणार. ए माझी ऑडिशन छान झालीये रे. तू जर किरणकडे शब्द टाकलास तर आपल्याला (केवढी आपुलकी) हा रोल मिळू शकतो डिअर, प्लीज बोलशील ना किरणशी…?
आता या संवादावरून तुम्हाला उमगलं असेलच की तिची प्रस्तावना, तो तथाकथित जिव्हाळा, आपुलकी ही किती नाटकी होती. पण दुर्दैवाने हे असंच असतं. अजून एक प्रसंग! एका सिनेमाच्या प्रोजेक्टसाठी माझ्याच एक जुन्या ओळखीच्या अभिनेत्रीचं नाव मी माझ्या निर्मात्यांना सुचवलं होतं. तिच्याबरोबर आमची मीटिंग झाली. भावी चित्रपटाचं दिग्दर्शन करायची इच्छाही तिने दर्शवली. त्या वेळी माझे निर्माते खुश झाले होते. सगळं काही ठरलं. कालांतराने आम्हा तिघांच्या सिनेमा, क्रीन प्ले संबंधित अनेकदा भेटीगाठी झाल्या. मी त्या सिनेमाचा कार्यकारी निर्माताही होतो. पण म्हणतात ना, हावरटपणा नडतो आणि तेच झालं. त्या अभिनेत्रीला दिग्दर्शन, अभिनय याशिवाय आर्थिकरीत्या सक्षम व्हायचं होतं. म्हणजेच तिला तिचा माणूस पेरायचा होता त्या टीममध्ये. नंतर एका पार्टीत माझ्या निर्मात्यांशी तिची भेट झाली आणि स्वतच्या पायावर तिने कुऱहाड मारून घेतली. तिने चक्क ‘आपण डीजेला क्रिएटिव्ह हेडची जागा देऊ, पण प्रॉडक्शनसाठी माझ्याकडे एक भन्नाट मुलगा आहे. मेहनती आहे. तो सगळं छान सांभाळेल,’ असा सल्ला दिला.
बघितलंत कसं चालतं ते! म्हणजे मी तिचं नाव अभिनयासाठी सुचवलं, दिग्दर्शनासाठी पाठिंबा दिला आणि ही बाई माझ्याच पाठीत खंजीर खुपसायला निघाली. माझ्या निर्मात्याने मला पार्टीमधून बाहेर येऊन कॉल केला आणि म्हणाले की, ‘ तुम्हीच हिचं नाव सुचवलं आणि ही बाई तर तुम्हालाच बाजूला काढायला बघतेय. आपण उद्या भेटू आणि नव्याने टीम बनवू…’ यातून असं घडलं की तिने तो प्रोजेक्ट हातातून घालवला.
या क्षेत्रात असुरक्षितता खूप मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळते. गरजेप्रमाणे माणसांना वापरून घ्यायचं. पण त्यापेक्षा त्या माणसाच्या गुणांचा वापर केला तर किती छान होईल. पण नाही. असुरक्षिततेची भावना इतकी धगधगते की त्या आगीच्या प्रखर ज्वाळा सगळ्यांना जाळून टाकतात. आज काम आहे. उद्या असेल याची शाश्वती नाही. त्यामुळे सहजपणे कोणी कोणावरही विश्वास टाकत नाहीत. ही असुरक्षिततेची भावना बडय़ा बडय़ा नट मंडळींनाही भेडसावते. ‘परिंदा’ सिनेमाच्या कास्टिंगच्या वेळी म्हणे अनिल कपूरच्या मोठय़ा भावाचा रोल नसिरुद्दीन शाह करणार होते. अनिल कपूरच्या लक्षात आलं की, नसीर तगडा अभिनेता आहे, आपल्यावर भारी पडू शकतो. बस्स… अनिल कपूरने निर्माता, दिग्दर्शक विधु विनोद चोप्रांचं मन वळवलं आणि त्याकाळी, ज्याला आपण ‘ठोकळा’ म्हणत असू त्या जॅकी श्रॉफला मोठय़ा भावाच्या भूमिकेसाठी निवडलं. अनिल कपूरला वाटलं, आपण काय मास्टरस्ट्रोक मारलाय! चित्रपट प्रदर्शित झाला आणि घडलं काय…? जॅकी श्रॉफने त्याच्या कारकिर्दीतला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.
या क्षेत्रात खूप ईर्षा, स्पर्धा, असुरक्षितता, स्वार्थ… हे सगळं कामाच्या स्वरूपामध्येच दडून बसलं आहे. इथे हलक्या कानाची मंडळाही भरपूर आहेत. माहितीची शहनिशा न करता त्यावर विश्वास ठेवून खुशाल निर्णय घेतात. मग यावर उपाय हाच की स्वतःवरचा विश्वास डळमळू न देणं, कोणाचं वाईट न चिंतणं आणि मुळात कोणाकडूनही कोणती अपेक्षा न ठेवणं. मग बघा… निस्वार्थ, निखळ मैत्री आयुष्यात कशी बनू शकते ती!
z [email protected]
(लेखक fिक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)