>> चंद्रसेन टिळेकर
सार्वजनिक ठिकाणी आपल्या श्रद्धेचा बाजार मांडून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी संविधानाने परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही आपला समाज मात्र अशास्त्राrय कालबाह्य रूढीपरंपरासह, श्रद्धा-अंधश्रद्धांसह, प्रथा, कुप्रथांसह हे संविधान मोडीत काढण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र आहे.
बोले तैसा चाले। त्याची वंदीन मी पाऊले।।
अंगी झाडीन अंगण। त्याचे दासत्व करीन।।
हे वचन आहे जगद्गुरू तुकोबाचे. मात्र सांप्रत काळी जर तुकोबा या देशी आले तर त्यांना ‘दासत्व’ कोणाचे करावे?’ असा प्रश्न पडेल. कारण ‘बोले तैसा चाले’ असे आचरण करणारे ‘सत्यवचनी सत्यकाम’ आता या देशातून केव्हाच परागंदा झाले आहेत. किंबहुना, आम्हीच त्यांना देशोधडीला लावले आहे. या परामात आमचे राजकारणी आघाडीवर असले तरी सर्वसामान्य माणूसही मागे नाही हेही नम्रपणे सांगितलेच पाहिजे.
पण मित्रांनो, काळाप्रमाणे सगळे जग ज्या वेगाने बदलले आणि बदलते आहे त्या वेगाने आपण बदलले आहोत का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच येईल आणि बदललो असलो तर गोगलगायीच्या वेगानेच बदललो आहोत असे म्हणता येईल. कारण अजूनही आम्ही वेदकाळातच रमलो आहोत, जुन्यापुराण्या श्रुती-स्मृतीत दंग झालो आहोत. ‘जुने ते सोने’ हे आमचे घोषवाक्य आहे. न बदलणे हा आम्हा हिंदुस्थानींचा स्थायिभाव आहे. त्यामुळे आमच्या मूठभर शास्त्रज्ञांनी चंद्रावर जरी लीलया पदार्पण केले तरी सर्वसामान्य आम्ही जमिनीवरच ठाण मांडून बसलो आहेत, आमच्या दुष्ट रूढीपरंपरासह, आमच्या श्रद्धा-अंधश्रद्धांसह! प्रथा, कुप्रथांसह! या दुष्ट परंपरा, प्रथा जोपर्यंत व्यक्तिगत अन् खासगीरीत्या जोपासल्या जातात तोपर्यंत त्या निरुपद्रवी असण्याची शक्यता असते, पण जर त्यांचे प्रदर्शन सार्वजनिक ठिकाणी झाले तर कसा भयानक प्रसंग उद्भवू शकतो याचा मी नुकताच अनुभव घेतला. तो मी या ठिकाणी देत आहे.
वेळ साधारणत: दुपारची बाराची होती. घर जवळच असल्यामुळे रिक्षावाला कोणी यायला तयार नव्हता म्हणून घराकडे पायीच निघालो होतो. अचानक ब्रेकचा मोठा आवाज ऐकला. रस्त्यावर पाहतो तर एक शाळकरी मुलगा टॅक्सीच्या खाली येता येता वाचला होता. शाळा सुटल्यानंतर तो पायीच घरी चालला होता. फुटपाथवरून चालता चालता अचानक तो उडी मारून रस्त्यावर आला होता. टॅक्सीवाल्याने अर्जंट ब्रेक मारला नसता तर विचित्र परिस्थिती उद्भवली असती. हा मुलगा असा फुटपाथ सोडून अचानक रस्त्यावर का धावला? कारण थोडय़ा अंतरावर स्मशान होते. त्या स्मशानाच्या गेटच्या बाहेर फुटपाथवर एक सजवलेले प्रेत तिरडीसह उतरवले होते. हे स्मशान ओलांडूनच मला नेहमी घरी यावे लागते. त्यामुळे हे दृश्य मला नेहमीचेच झाले होते, परंतु फुटपाथवरून चालणाऱया त्या शाळकरी मुलाने ते प्रेत पाहताच त्याची भीतीने गाळून उडाली आणि फुटपाथ सोडून तो रस्त्यावर धावला. मागून येणाऱया ट्रक्सी ड्रायव्हरने तत्काळ ब्रेक दाबला नसता तर मोठा अपघात घडून मुलाला आपला जीव गमवावा लागला असता.
स्मशानाच्या गेटच्या बाहेर फुटपाथवर उतरवलेल्या प्रेताच्या भोवती काही विधी चालले होते. नारळ फोडला गेला होता, लिंबूही उतरवले होते आणि प्रेताजवळ वरणभाताचा घासही ठेवला होता. हे सगळे स्मशानाच्या आतही करता आले असते, पण नेहमी हे असे विधी स्मशानाच्या गेटच्या बाहेरच पाहत आलेलो आहे. शेवटी मी त्या जमावातल्या एकाला न राहवून विचारले,
‘’आपण हे सर्व विधी स्मशानात का करत नाही? बाहेर का करता?” एवढे बोलून मी त्यांना तो अपघाताचा प्रसंगही सांगितला. तेवढय़ात त्या जमावातला एकजण म्हणाला, “अहो साहेब, असे विधी स्मशानात करून चालत नाहीत. इथे आम्ही जो वरणभाताचा घास ठेवलाय ना, ते या गेलेल्या व्यक्तीचे शेवटचे जेवण आहे, ते स्मशानात देऊन कसं चालेल? त्याच्या आत्म्याला काय वाटेल?
‘’…आणि ते नारळ फोडणे आणि लिंबू उतरवलं ते?”
‘’अहो, ते शास्त्राप्रमाणे करावंच लागतं. वर्षानुवर्षे आपले वाडवडीलही असे करीत आलेले आहेत ते काय उगाच? परंपरेचा मान ठेवायला नको?”
तो प्रसंग काही वाद घालण्याचा नव्हता म्हणून मी तिथून पाय काढता घेतला. वाडवडिलांचा मान, परंपरा हे ऐकल्यावर मला पुलंनी एका ठिकाणी जे लिहून ठेवले ते आठवले. पु.ल. लिहितात, ’मोठय़ांचा मान ठेवायचा म्हणजे त्यांच्या अशास्त्राrय कालबाह्य विचारांचाही मान ठेवायचा असा अर्थ होत नाही.’ पुलंना आम्ही ‘लाडके दैवत’ म्हणून डोक्यावर घेतले, पण त्यांचे विचार मात्र डोक्यात जाऊ दिले नाहीत. त्यात पुन्हा एखादी गोष्ट आम्ही शास्त्राप्रमाणे करतो असे कुणी म्हटले की, माणसे निमूटपणे माना खाली घालतात. कारण शास्त्र म्हटले की, ते जुनेपुराणेच असणार, अगदी सतयुग, त्रेतायुग नाहीतर द्वापारयुगात लिहिलेले. मग ते खोटे कसे असणार? आमचा समाज जुन्याला सोने म्हणत कवटाळून बसणारा. पुराणकाळात लिहिलेल्या ग्रंथातील विचारांबद्दल आपल्याला सावध करताना सावरकर म्हणतात, ‘’ग्रंथ जेवढा जुना तेवढे त्यातील विचार कालबाह्य झाले असल्याचा मोठा धोका असतो.” (संदर्भ: ‘क्ष-किरणे’/विज्ञाननिष्ठ निबंध) व्यक्तिपूजा ही आमच्या पाचवीला पुजलेली, मग आम्ही बदलणार कसे? त्यातून जर कोणी आपल्या प्रथा, परंपरा, प्रार्थना, साधना, उपासना यांच्याबद्दल नाराजीचा सूर काढला तर लगेच त्याला ऐकवले जाते की, हे असे करायला आम्हाला संविधानाने स्वातंत्र्य दिलेले आहे, पण हे स्वातंत्र्य व्यक्तिगत पातळीवर दिले गेलेले आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्या श्रद्धेचा बाजार मांडून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी संविधानाने परवानगी दिलेली नाही. पोषाखाने आम्ही आधुनिक झालो, अप-टू-डेट झालो, पण संस्कृतीने मात्र अजिबात नाही. म्हणूनच सावरकर आपल्या ‘क्ष-किरणे’ या ग्रंथात म्हणतात, युरोपियन संस्कृती अप-टू-डेट तर आमची श्रुती-स्मृती पुरोणोक्त. ते नव्याचे भोत्ते तर आम्ही जुन्याचे. साधी बूटपॉलिशची डबी विकताना तिथला दुकानदार दिमाखाने म्हणतो की, ‘’साहेब, ही डबी घ्या. कारण ही अप-टू-डेट आहे.” तेव्हा आता वेळ आली आहे ती आपले विचार पारखून घेण्याची, चुकीचे असतील तर ते बदलण्याची, काळाप्रमाणे चालण्याची. कविवर्य माधव ज्युलियन यांच्या शब्दांत सांगायचं तर…
’कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला!’
[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी
चळवळीशी निगडित आहेत.)