अभिप्राय- सूत्रसंचालनाचे सोपे तंत्र

>> अस्मिता प्रदीप येंडे

विविध स्तरांवर विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न होतात, ते कार्यक्रम सूत्रबद्ध बोलण्यातून आकाराला येतात. कार्यक्रमातील वत्ते आणि रसिक प्रेक्षक यांच्यातील समांतर धागा म्हणजे निवेदक. निवेदन, सूत्रसंचालन याकडे आता करिअरचा एक भाग म्हणून पाहिले जाते. निवेदन क्षेत्रात कार्य करताना कोणकोणती कौशल्ये आत्मसात करायला हवीत, निवेदनाची प्राथमिक सूत्रे, माहिती, पूर्वतयारी याबद्दल कुठे शिकवण मिळत नाही. फक्त कागदावर लिहिलेले वाचायचे, त्यात एवढे काय असते, पण निवेदन वा सूत्रसंचालन हासुद्धा एक कलात्मक सादरीकरणाचा भाग आहे. अशाच निवेदन क्षेत्रात करिअर घडवू  इच्छिणाऱया तसेच शिक्षक, विद्यार्थी, डबिंग कलाकार, वृत्त निवेदक अशा सर्वांसाठी लेखक महेंद्र कोंडे यांचे ‘बोलता बोलता’ हा लेखसंग्रह निवेदन- सूत्रसंचालन करणाऱयांसाठी आदर्श आहे.

या लेखसंग्रहात एकूण 46 लेखांचा समावेश असून प्रथमपुरुषी निवेदनशैलीच्या आत्माविष्काराने पुस्तक वाचताना वाचकांसोबत एक कंफर्ट झोन आपोआप तयार होतो. लेखकाचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे, बोलण्यात विनम्र भाव आहे, ओजस्वीपणा आहे आणि तोच भाव त्यांच्या लेखणीत उतरला आहे. व्यासपीठाची भीती वाटणे, एवढ्या लोकांसमोर मी कसे बोलू? ही भीती सर्वात आधी घालवणे गरजेचे आहे. याविषयी ‘मंचावरच्या पहिल्या पायरीपूर्वी’ या लेखात उत्तम मार्गदर्शन केले आहे. उत्तम वक्ता व्हायचे असेल तर आधी उत्तम श्रोता होणे गरजेचे आहे. श्रवणभक्तीविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक लेखकाने मांडले आहेत. उत्तम निवेदक होण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावीत, कोणत्या चुका टाळाव्यात, आपल्या आवाजाची निगा कशी राखावी, शब्दोच्चार अधिक सुस्पष्ट कसे करावेत, बोलण्याची लय, प्रवाही वाणी, शुद्ध शब्दोच्चार तसेच शब्दातील चढउतार याचा अत्यंत बारकाईने अभ्यास कसा करावा, याबाबत अगदी उदाहरणासहित माहिती लेखकाने दिलेली आहे. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी वाचनावर अधिक भर देणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले आहे. निवेदनाची पूर्वतयारी करताना कोणत्या निकषांचा विचार करावा, हा महत्त्वपूर्ण भाग आहे. कार्यक्रमाचे स्वरूप, कार्यक्रमाची संहिता, कार्यक्रमाचे स्थळ- वेळ, पाहुणे, त्यांचा परिचय, त्यांचा पदक्रम जाणून घेतले पाहिजे. वेळेचे नियोजन याचीही जबाबदारी निवेदकावर असते. संपूर्ण कार्यक्रमाचा आधारस्तंभ निवेदक असतो, हे वाक्य पुस्तक वाचताना पटायला लागते.

माईकवर व पोडियमजवळ उभे राहून बोलताना आपली उभे राहण्याची शैली तसेच माईकचे वेगळे प्रकार आणि ते कसे हाताळावेत, निवेदकाची देहबोली कशी असावी, या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचासुद्धा अंतर्भाव या पुस्तकात केलेला आहे. अशा बऱयाच गोष्टींबद्दल लेखकाने ऊहापोह केलेला आहे. निवेदन करताना कुठे बोलावे, किती बोलावे आणि कुठे थांबावे, याचा शिष्टाचारही सांगितला आहे. अचानक उद्भवणाऱया समस्यांना कसे सामोरे जावे, त्या वेळीही परिस्थिती रंजकपणे कशी हाताळावी, याचे प्रशिक्षण देणारे हे पुस्तक मौलिक माहिती देणारे आहे.

निवेदन करता करता स्वतची एक वेगळी शैली निर्माण करायला हवी, हा मोलाचा सल्ला लेखकाने दिला आहे. कार्यक्रमाची यशस्विता आणि अयशस्विता निवेदकावर अवलंबून असते. त्यामुळे जेव्हा निवेदन प्रभावशाली होत नाही, तेव्हा  त्यामागील कारणे शोधून आपले निवेदन अधिक प्रभावशाली कसे होईल, याकडे लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे ज्यांना या क्षेत्रात आपले करिअर घडवायचे असेल त्यांच्यासाठी ‘बोलता बोलता’ एक आदर्श वस्तुपाठ आहे.

बोलता बोलता
लेखक ः महेन्द्र कोंडे
प्रकाशक ः व्यास पब्लिकेशन हाउस
मूल्य ः 325 रुपये