उमेद – कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी पंचसूत्री

>> आशिष बनसोडे

कर्णबधिर मुलांना वेळोवेळी प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते समाजाच्या मुख्य प्रवाहात मानाने व आदर्शवत आयुष्य जगू शकतात. अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थी केवळ वर्तमान उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच नव्हे, तर भविष्यातील ध्येय गाठण्यासाठी सज्ज होतात. विशेष मुलांची योग्य जडणघडण करून त्यांना यशस्वी व जबाबदार नागरिक बनवायची जबाबदारी केवळ शिक्षक आणि पालकांचीच नाही, तर समाजाने आपली भूमिका महत्त्वाची असल्याचे भान ठेवले पाहिजे.

‘कर्णबधिरत्व’ हे व्यंगत्व दिसते आणि वाटते तितके साधे नाही. ज्यांना जन्मापासून कर्णबधिरत्व असते त्यांच्या आयुष्याची वाटचाल तारेवरची कसरत करणारी असते. व्यंगत्व घेऊन जन्माला येणे हा गुन्हा नाही. हजारोंच्या तुलनेत एकजण कुठल्sढ ना कुठल्sढ व्यंग घेऊन जन्माला येतो. अशा व्यक्तींची वाटचाल ही प्रचंड खडतर असते, परंतु कर्णबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टय़ा उंच भरारी घेता यावी याकरिता त्यांच्याकरिता खास पंचसूत्री तयार करण्यात आली आहे.

कर्णबधिर मुलांना ऐकू येत नसल्याने नीट बोलता येत नाही. सध्याच्या तंत्रयुगात कर्णबधिर मुले श्रवणयंत्राचा वापर करतात. उर्वरित श्रवणशक्तीचा वापर करून तसेच मुखवाचनाने कर्णबधिर मुले संवाद साधतात. कर्णबधिर मुलामुलींकरिता विशेष शाळा, महाविद्यालये असतात. तेथे मुलांना विशेष शिक्षण दिले जाते. तेथील विशेष शिक्षक या मुलांना घडविण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतात. मुल्sढ समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन त्यांचे आयुष्य उज्ज्वल कसे होईल, याकरिता विशेष प्रयत्न केले जातात. या विशेष मुलांकरिता त्यांच्या गरजेनुसार ठोस नियोजनबद्ध कार्यक्रम राबविणे गरजेचे असते.

अशा प्रकारचा एक उपक्रम उत्कर्ष मंडळ विलेपार्ले संचालित स्व. उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालयातील विशेष शिक्षिका शीतल सावंत यांनी राबविला. विशेष शिक्षिका म्हणून शीतल सावंत या शाळेत गेली 26 वर्षे कार्यरत आहेत. या शाळेत येणारी कर्णबधिर मुले ही सर्वसाधारण गरीब कुटुंबातील असल्याने या मुलांच्या घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नाही. पालक सुशिक्षित नसल्याने हवी तशी जागरूकता नाही. कर्णबधिरत्वामुळे ही मुलं सर्वसामान्य मुलांच्या टय़ुशनला जाऊन अभ्यास करू शकत नाहीत. विशेष शिक्षकांच्या कमतरतेमुळे कर्णबधिर मुलांच्या शिकवण्या घेतल्या जातील असे विशेष शिक्षक उपलब्ध नसतात. अशा वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टय़ा सक्षम बनविण्याची जबाबदारी विशेष शिक्षिका शीतल सावंत यांनी घेतली. त्यांनी अभ्यासाचे तंत्र व कौशल्य यावर एक उपक्रम तयार केला. यात त्यांनी पाच मुद्दय़ांवर काम केलं.

– ध्येय आखणे – ध्येय आखताना कोणते मुद्दे लक्षात ठेवावेत?
– वेळेचे नियोजन कसे करावे?ö अभ्यासाचे वेळापत्रक कसे बनवावे?
– घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण कसे तयार करावे? कोणत्या स्ट्रटेजी वापराव्यात?
– ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी कोणते गुण अंगीकारावेत? (उदा. स्वयंशिस्त, निर्धार, जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी, दूरदर्शन, मोबाईलचा वापर यावर संयम ठेवणे आदी.)
– शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात?

हा उपक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी संशोधनात्मक दृष्टीने राबवला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नेहा गांधी यांच्यासोबत चर्चा करून वरील मुद्दय़ांवर शीतल सावंत यांनी त्यांची सहकारी समीक्षा बाक्कर यांच्यासोबत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत विविध कृतीपाठ, नाटय़ीकरण, चर्चासत्र, कौशल्य विकास करणे यातून मुलांना जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी करून घेतले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबाबत विचार करायला शिकवले. उंच शिखर गाठायचे स्वप्न दाखवले. कार्यशाळेआधी आणि नंतर मुलांकडून एक प्रश्नावली सोडवून घेतली. यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा तुलनात्मक अभ्यास करून संशोधन पेपर तयार केला गेला. हे संशोधन केवळ आपल्या शाळेपुरते मर्यादित न ठेवता हा उपक्रम देशपातळीवर घेऊन जायचे उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केले.

National Convention for the educators of deaf राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या अंतर्गत दरवर्षी हिंदुस्थानात कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी कार्यरत विशेष शिक्षकांसाठी राष्ट्रीय परिषद भरवली जाते. या वर्षी मध्य प्रदेशातील इंदूर येथे 26 ते 28 जून दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत शीतल सावंत यांनी त्यांचा ‘Impact of study technique programme on the knowledge of 10th grade students with hearing impaired to enhance academic performance’ हा संशोधन पेपर सादर केला. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमाची माहिती परिषदेत सहभागी झालेल्या देशातील इतर शिक्षकांनाही मिळाली. या संशोधन पेपरला ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह पेपर अवार्ड’ मिळाला. असे प्रशिक्षण मुलांसाठी सर्व शाळांमधून राबविले गेले पाहिजे असे मत NCED शिक्षक परिषदेच्या तज्ञांनी मांडले. या प्रशिक्षणामुळे मुले आधीच्या तुलनेत ध्येय निश्चित करणे, वेळेचे नियोजन, घरातील अभ्यासाचे वातावरणाचे व्यवस्थापन, यशासाठी आवश्यक गुण, स्वतची काळजी घेणे आणि मानसिक आरोग्य कसे उत्तम ठेवावे याविषयी जागरूक झाली. योग्य नियोजन करून नियमित अभ्यासाची सवय लावून उत्तम गुण मिळवण्याची जिद्द त्यांच्याकडे आली. घरी अभ्यासाला पोषक वातावरण नसल्याची तक्रार करण्याऐवजी आता त्यांनी त्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक मानसिक वृत्ती विकसित झाली आहे. याबरोबरच आशावादी आणि रचनात्मक विचार करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

कर्णबधिर मुलांना वेळोवेळी प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते समाजाच्या मुख्य प्रवाहात मानाने व आदर्शवत आयुष्य जगू शकतात. अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थी केवळ वर्तमान उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच नव्हे, तर भविष्यातील ध्येय गाठण्यासाठी सज्ज होतात. त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता त्यांची योग्य जडणघडण होण्याकरिता शिक्षक, पालक, नातेवाईक, मित्रपरिवार या सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे. विशेष मुलांची योग्य जडणघडण करून त्यांना यशस्वी व जबाबदार नागरिक बनवायची जबाबदारी केवळ शिक्षक आणि पालकांचीच नाही, तर समाजाने आपली भूमिका महत्त्वाची असल्याचे भान ठेवले पाहिजे.
[email protected]