प्रासंगिक – एका दिव्याचा शतायुषी ‘दीपोत्सव!’

>> अरुण जोशी

शतायुषी बल्ब किंवा विजेचा दिवा. तोही 1901 पासून सतत तेवत असलेला. असा दुसरा कुठे जगात आहे की नाही ठाऊक नाही, पण अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सॅन होजे या प्रसिद्ध शहरापासून कारने दोन तासांच्या अंतरावर हा 123 वर्षे तेवणारा ‘जादूचा’ वाटावा असा दिवा असल्याचं समजलं आणि त्याचा पत्ता शोधत आम्ही निघालो. आमच्या या ‘…ज्योतीर्गमय’ टीममध्ये माझ्यासह शैलेश-भाग्यश्री खाडिलकर आणि डॉ. लतिका भानुशाली होते.

या वर्षीचं अमेरिकेतलं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन सॅन होजे येथे झालं आणि ‘ग्रंथाली’तर्फे मराठी पुस्तकं घेऊन उपस्थितांशी संवाद साधायची जबाबदारी आमच्यावर होती. नंतर थोडं पर्यटन. त्यात कोणी पर्यटकाने कधी (किंवा सहसा) न पाहिलेला ‘दिवा’ पाहायला आम्ही लिव्हरमोर गावातल्या 4550 इस्ट ऍव्हेन्यू या पत्त्यावर असलेल्या ‘फायरस्टेशन’मध्ये (आपल्याकडच्या फायरब्रिगेडसारखं) पोहोचलो.

तर तिथे फक्त दोन अग्निशमन बंब! माणसांचा पत्ता नाही. मग थोडा शोध घेतला नि एका दरवाजावर टकटक केल्यावर फायरमन ब्रायन चॅप्लिन बाहेर आला. तो या फायरस्टेशनचा कॅप्टन. आम्ही हिंदुस्थानातून तिथला ‘सेन्टेनिअल बल्ब’ पाहायला आल्याचा आनंद त्याच्या चेहऱयावर पसरला.

आत गेल्यावर साधारण पंधरा फूट उंचीच्या छतावर फूटभर जाड वायरला लोंबकळणारा तो ‘दिव्य’ दिवा त्याने आम्हाला दाखवला. या दिव्याची फिलॅमेंट म्हणजे बल्बच्या आतली नाजूक तार इतर सर्व बल्बसारखी ‘टास्टन’ धातूची नसून जाडसर आणि कार्बनची आहे. आता अशी कार्बन फिलॅमेन्ट वापरात नसावी.

1890 मध्ये अमेरिकेतल्या शेल्बी कंपनीने कार्बन फिलॅमेन्टचे दिवे बनवले होते. अशा प्रकारच्या ‘बल्ब’चे जनक होते ऍडॉल्फे शॅलियट. त्यावेळी इलेक्ट्रिक बल्बसाठी थॉमस अल्वा एडिसन यांचं नाव गाजत होतं. अनेक प्रयोग करून त्यांना अखेर ‘टंगस्टन’ची तार गवसली आणि निर्वात काचगोलकात ती बसवून ‘बल्ब’ बनवले जाऊ लागले.

आमच्या लहानपणी असेच बल्ब मिळायचे ते ‘ग्लोब’ नावाच्या कंपनीचे. बल्बच्या तळाशी ग्लोब म्हणजे पृथ्वीचं रेखाचित्र असायचं. आताही ते मिळत असतील… पण तेव्हा ‘बल्ब’ला ‘ग्लोब’ (आणि अपभ्रंश गुलूप) हा पर्यायी शब्द झाला होता. आज ‘फोटोकॉपी’ ‘झेरॉक्स’ कंपनीच्या नावानेच ओळखली जाते तसाच हा प्रकार.

इथे ‘लिव्हरमोर’चा दिवा मात्र कार्बन फिलॅमेन्टचा होता. त्याचा मंदावत चाललेला प्रकाश आम्ही डोळे भरून पाहिला. त्याचे फोटो काढले. तिथे या बल्बविषयीच्या माहितीचे तक्ते लावले होते तेही चित्रित केले. उत्साही ब्रायन खूश होता. एरवी फायर स्टेशनला कोणी येणार ते कुठेतरी आग लागल्यावरच, पण एका दिव्याचा शतायुषी ‘दीपोत्सव’ शोधत येणारे आमच्यासारखे क्वचित असतील. पूर्वी हा दिवा खाली होता, पण आता सुरक्षेसाठी छतावर उंच ठिकाणी तेवत आहे.

तशी या बल्बला वेळोवेळी भरपूर प्रसिद्धी मिळालीय. त्यावर बरेच लेखही आलेत, टीव्ही चित्रीकरण झालंय. मूळचा 60 वॅटचा हा बल्ब आता मंदावून अवघा 4 वॅटचा झाल्याचं समजलं. तो एकदा ‘मालवल्याची’ बातमीही पसरली… पण त्यावेळी त्या भागातली वीजच गायब झाली होती. ही गोष्ट 2013 ची. एका पत्रकाराने त्यामागची सत्यता स्पष्ट केली. दिवा पुन्हा प्रकाशमान झाला आणि आम्हाला पाहायला मिळाली.
साधारणतः एखाद्या बल्बचं आयुष्य 700 ते 1000 तास इतकंच असतं. त्या तुलनेने कार्बन फिलॅमेन्टचा हा शतायुषी दिवा कमालीची जीवनेच्छा असलेला दिसतो तो पाहून छान वाटलं. नाहीतर अमेरिका म्हणजे नायगाराचा धबधबा, डिझनी लॅण्ड, स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, ग्रॅण्ड व्हॅन्यन दरी वगैरे पठडीतल्या पर्यटनाच्या जागा. त्यात या दिव्याला कुठेच स्थान नाही.

आता पर्यटक केप केनेडी रॉकेट लाँचिंग जागाही पाहायला फ्लॉरिडात आवर्जून जातात. कधीतरी (म्हणजे लवकरच) माणसाच्याच करामतीतून ‘प्रकाशित’ झालेला हा दिवाही जरूर बघा… शेवटी आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटलं ते म्हणजे एखाद्या टाचणीएवढय़ा नव्या गोष्टीचंही प्रचंड ‘मार्केटिंग’ करणाऱया आणि आपल्याकडचं सारं काही ‘ग्रेट’(च) असतं असं जगाला ओरडून सांगणाऱया अमेरिकेला या ‘सेन्टेनिथल लाइट’चं मार्केटिंग करून पर्यटक तिथे यावेत असं कसं नाही वाटलं!

आम्ही मात्र हा मानवनिर्मित तेजोगोल पाहून आनंदलो. सध्या आपल्याकडे दिवाळीची रोषणाई दिसू लागलीय. त्यानिमित्ताने ही शतायुषी ‘दीपोत्सवा’ची कहाणी.