
>> अनंत बोरसे
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे एक आगळेवेगळे महत्त्व आहे. त्यावरच विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरते, करीअर घडते. कुठल्याही परीक्षांचा मुख्य उद्देश असतो तो गुणवत्तेचा कस, परीक्षार्थीच्या आकलनाची क्षमता, विषयांचा सखोल अभ्यास आणि यावरच ठरते ती गुणवत्ता. मात्र गेल्या काही वर्षांपासून केवळ शैक्षणिक परीक्षा नव्हे, तर नोकरभरतीची परीक्षा असो की पदोन्नतीसाठीची परीक्षा असो, या सगळ्या परीक्षांना कॉपी आणि पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे आणि त्यामुळे खऱया गुणवत्तेचा कस लागत नाही की गुणवंतांना संधी मिळत नाही. दरवर्षी कॉपीमुक्त परीक्षांसाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जातात, शासन आदेश निघतात. तरीदेखील कॉपी मोठय़ा प्रमाणावर होते. काही परीक्षा केंद्रांत तर तेथील शाळा, शाळेचे शिक्षक, संस्था चालक यांच्या मदतीनेच कॉपी पुरवली जाते, तर अगदी पोलीस बंदोबस्त असतानादेखील कॉपी पुरवली जाते. कॉपी पुरवणे, पेपर फोडणे यात मोठी आर्थिक देवाणघेवाण होते तसेच आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा यासाठी अनेक शाळा, संस्थादेखील कॉपी पुरवण्यात सहभागी असतात हे अनेकदा अधोरेखित झाले आहे. काही परीक्षा केंद्रे तर त्यासाठी कुप्रसिद्ध आहेत.
दरवर्षी कॉपी प्रकरणात सापडल्यास कारवाईचा इशारा दिला जातो, परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला जातो. काही वेळा थातूरमातूर कारवाई होतेदेखील, तर अनेकदा पेपर तपासणाऱया शिक्षकाकडूनच मार्क वाढविण्याचे अनेक प्रकार घडतात. या वर्षी परीक्षा केंद्रावर ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार आहे, तर कॉपी करताना पकडला गेल्यास गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर भरारी पथकाचीदेखील करडी नजर असणार आहे. याचसंदर्भात मध्यंतरी शिक्षकांच्या अदलाबदलीचा विषय चर्चेत आला होता. मात्र त्याला काही शिक्षक संघटनांनी विरोध केला. कोणत्याही परीक्षा केंद्रात गैरप्रकार घडला तर तसे करणाऱयांवर थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. मात्र तरीदेखील गैरप्रकार होण्याचे काही केल्या थांबत नाहीत. शिक्षण क्षेत्र किती बरबटले आहे हे अनेकदा अधोरेखित झाले आहे. देशाचा किंवा राज्याचा कारभार हाकताना आयएएस, आयपीएस या पदांचे महत्त्व मोठे आहे. राज्य व्यवस्था याच कार्यपालिकेच्या मदतीने राज्यकारभार करते. या पदावर नियुक्ती होताना तितक्याच अग्निपरीक्षेच्या दिव्यातून, कसोटय़ा पार करून जावे लागते. त्यासाठी केंद्रीय स्तरावर यूपीएससी, तर राज्यात एमपीएससीमार्फत परीक्षा घेतल्या जातात. सर्वतोपरी काळजी, नियम, अटी यांचे पालन करून, सर्व प्रक्रियांचे काटेकोर पालन करूनच उमेदवारांची निवड केली जात असणार. मात्र गेल्या काही वर्षांपासून यूपीएससी असो की एमपीएससी असो की इतर परीक्षा, त्या घेणाऱया संस्थांच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील ‘पूजा’ प्रकरणावरून तर ते अधिक स्पष्ट झाले आहे. एक भ्रष्ट साखळी निर्माण झाली आहे आणि या साखळीने सगळ्याच यंत्रणा पोखरल्या गेल्या आहेत. ओळख, वशिला, पैसा, राजकीय वरदहस्त, सत्तेची साथ असेल तर सगळे काही विकत घेता येते. कोणताही, नियम, कायदा याला बगल देता येते. विद्यादानाचे पवित्र क्षेत्र असो की डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांसारखे पांढरपेशी व्यवसाय असोत की सरकारी क्षेत्रातील नोकर भरतीसाठी होणाऱया स्पर्धा परीक्षा, नोकर भरती, सगळीकडे प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. चिरीमिरी दिल्याशिवाय कुठलेच काम होत नाही. आता तर चिरीमिरीची मजल करोडो रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भ्रष्टाचार हे कालातीत सत्य आहे. जगभर भ्रष्टाचार बोकाळला आहे. ‘पूजा’ प्रकरणावरून परीक्षा व्यवस्थेची लक्तरेच वेशीवर टांगली गेली. स्वप्नील लोणकरसारख्या अनेक होतकरू तरुणांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. परीक्षा आणि गैरप्रकार, घोटाळे हे गेल्या काही वर्षांपासून समीकरणच बनले आहे आणि गैरप्रकाराविरुद्ध पराक्षार्थींनी आवाज उठवला, आंदोलने केली तर त्यांचा सहानुभूतीने विचार करण्याऐवजी आंदोलने दडपली जातात. त्यांना राष्ट्रद्रोही, अर्बन नक्षलवादी ठरवले जाते आणि खऱया गुन्हेगारांना पाठीशी घालत विद्यार्थ्यांवरच कारवाईचा बडगा उगारला जातो.
शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार, कॉपी, पेपरफुटीचे लागलेले ग्रहण, त्यामुळे शिक्षणाचा एकूणच बट्टय़ाबोळ झाला आहे. गुणवत्ता घसरली आहे, दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांनी डिग्री घेतल्यानंतर बेरोजगारीच्या संख्येत भर पडत आहे. परीक्षार्थींच्या खऱया गुणवत्तेचा कस लागायचा असेल तर कॉपी, पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे. कायदे, नियम कितीही केले तरी पाळण्याची सर्वांची मानसिकता असणे गरजेचे आहे.