मंथन ; बहुस्तरीय उपाययोजनांची गरज

>>अॅड. रमा सरोदे

वसईमध्ये एका तरुणाने दिवसाढवळ्या आपले प्रेमसंबंध असणाऱ्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. सदर मुलीचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे सदर तरुण लोखंडी पान्याने तिच्यावर वार करत असताना भोवतीचे सर्व जण बघ्याची भूमिका घेत होते, तर काही जण व्हिडीओ काढत होते. मन सुन्न करणाऱ्या या अमानुष हत्येचा कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने विचार करण्याची जशी गरज आहे, तशाच प्रकारे मानसशास्त्रीयदृष्टय़ाही याचे अवलोकन करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात वाढत चाललेल्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त होत असतानाच वसईमध्ये एका तरुणीची तिच्या प्रियकराने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे भररस्त्यात ही हत्या करण्यात आली आहे. माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, रोहित यादव या हल्लेखोराचे मृत झालेल्या आरती यादव या तरुणीशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र आरतीचे दुसऱया मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला होता. त्यावरून दोघांमध्ये खटकेही उडत होते. यातूनच हत्येच्या दिवशी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि रोहितने लोखंडी पान्याने तिच्यावर 10 ते 12 वार केले.

या भयानक घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानुसार ही घटना घडत असताना उपस्थितांपैकी कोणीही हस्तक्षेप करताना दिसलं नाही किंवा त्या तरुणाला थांबवण्याचं धाडसही कोणी केलं नाही. उलटपक्षी हृदयाचा थरकाप उडवणाऱया या घटनेचा व्हिडीओ लोक मोबाइलमध्ये शूट करत होते, त्यावर टिपणी करत होते. सगळे हताशपणानं उभं राहून समोर चाललेले मृत्यू तांडव पाहत होते. काही जण घटनास्थळावरून दूर जाताना दिसत होते. कारण हल्लेखोर निर्घृणपणे तरुणीवर वारंवार हल्ला करत होता. या हल्ल्यांनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेला मदत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता वाहन चालकही तिथून काढता पाय घेताना दिसले.

अत्यंत अमानुष, माणुसकीला काळिमा फासणाऱया या निर्घृण हत्येतून कायदा-सुव्यवस्थेसंदर्भातील काही प्रश्न जसे निर्माण होत आहेत, तसेच बोथट होत चाललेल्या सामाजिक जाणिवांबाबतची चिंताजनक स्थितीही समोर आली आहे. याखेरीज महिला सक्षमीकरणाचे कितीही ढोल पिटले गेले असले तरी पुरुषसत्ताक विचाराचा प्रभाव आजही ओसरलेला नाही हेही या घटनेने दाखवून दिले आहे. आज आपल्या अवतीभवती नकार पचवू न शकणाऱयांची संख्या वाढत असून वसईतील हत्या हे त्याचे भेसूर, भेदक रूप आहे. त्यामुळे या घटनेचा मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही विचार करणे आवश्यक आहे.

ही घटना घडत असताना अवतीभवती असणारी माणसे केवळ बघ्याची भूमिका घेत होती, त्याचे मानसशास्त्राrय विश्लेषण गरजेचे आहे. यामधील एक भाग म्हणजे बाकीचे निमूटपणाने पाहत असताना ‘मी कशाला मध्ये पडू!’ ही भूमिका वैयक्तिक पातळीवर घेतली जाते. दुसरा भाग म्हणजे यासंदर्भात असणारी भीती. बऱयाचदा हाणामारी, हत्येचे प्रयत्न, अपघात अशा घटनांमध्ये हस्तक्षेप करण्यास लोक नकार देतात. कारण त्यांना पोलिसांची भीती वाटत असते. गुन्हा रोखण्यासाठी मदत करणाऱयांना, गुन्हेगारी कृत्य घडत असताना जीव वाचवणाऱयांना कायद्यानुसार संरक्षण मिळणे आणि त्यासंदर्भात सुस्पष्ट मार्गदर्शक सूचना असणे आवश्यक आहे.

आज ‘पोलीस मित्र’सारख्या संकल्पनांबाबत कितीही बोलले जात असले तरी ते लोकांपर्यंत मित्र म्हणून पोहोचण्यास यशस्वी झालेले नाहीत. हे पोलीस यंत्रणेचे घोर अपयश आहे. आम्ही सरकारी सेवक आहोत, गुन्हेगारांना आम्ही पकडू याची हमी जनेतला देण्यामध्ये आणि अशा गुन्हेगारांविरोधात उभे ठाकणाऱयांच्या बाजूने आम्ही उभे राहू हा विश्वास लोकमानसात निर्माण करण्यामध्ये अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. वसईच्या घटनेतून ही बाब पुन्हा एकदा दिसून आली आहे. या पार्श्वभूमीवर गंभीर गुह्यांमध्ये, संवेदनशील खटल्यांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळावर असणाऱया साक्षीदारांना तुमची ओळख गोपनीय ठेवली जाईल, तुम्हाला कायद्याचे संरक्षण दिले जाईल याविषयीची हमी दिली गेली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे विटनेस प्रोटेक्शन प्रोग्राम म्हणजेच साक्षीदार संरक्षणाची व्यवस्थाही नाही. साक्षीदार संरक्षण योजनेंतर्गत प्रत्यक्षदर्शींची ओळख गुप्त ठेवणे, त्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे.

पोलीस प्रशासन-न्यायप्रणालीच्या पातळीवर या सर्व गोष्टींबाबत काय निर्णय घेतला जातो, हे यथावकाश समोर येईल; पण सामाजिक प्रबोधनाच्या पातळीवरही याबाबत समाजात कर्तव्य बजावण्याबाबत जाणीव, जागृती निर्माण करण्याची गरज आहे. गुन्हेगारीमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांची सजगता, सतर्कताही गरजेची आहे. पुण्यामध्ये मागे घडलेल्या घटनेमध्ये एका मुलाने धाडस दाखवत मुलीवर कोयत्याने वार करणाऱयाला पकडण्याची भूमिका घेतली. यामुळे सदर मुलीचे प्राण वाचले. अशा प्रकारचे धाडस वसईच्या प्रकरणामध्ये कुणी का दाखवले नाही? आणखी एक मुद्दा म्हणजे, समाजातील वाढत चाललेल्या गुह्यांची संख्या पाहता आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलीस आणि वैद्यकीय यंत्रणा हजर राहावी यासाठी एखादी हॉटलाइनसारखी व्यवस्थाही गरजेची झाली आहे.

याखेरीज या घटनेमधून पुन्हा एकदा समाजात खोलवर रुजलेल्या पुरुषसत्ताक प्रवृत्तीचे दर्शनही घडले आहे. या व्यवस्थेमध्ये स्त्रियांना नकार देण्याचा अधिकारच नाहे. ‘मी पुरुष आहे, मी काहीही करू शकतो’ या पुरुषी अहंकारातून स्त्रियांवर हात उचलण्याची, त्यांना मारहाण करण्याची हिंमत होते. यामध्ये बदल घडण्यासाठी आपल्याला मुळापासून काम करण्याची गरज आहे. स्त्राr आणि पुरुष दोघांनाही नकार देण्याचा अधिकार आहे ही भावना लहानपणापासून रुजवली गेली पाहिजे. त्याचबरोबर नकार स्वीकारण्याची- पचवण्याची तयारीही असली पाहिजे. गुन्हे घडल्यानंतर त्याबाबत चर्चा करून चालणार नाही. आज समाजात गुन्हेगारी प्रचंड वाढत चालली आहे. आपल्याला त्याच्याशी संबंधित सर्व कंगोरे तपासून त्यावर काम केले पाहिजे. वसईच्या घटनेतील आरोपी हा ऐन तिशीतील तरुण होता. या हत्येमुळे त्याचे संपूर्ण आयुष्य आता संकटात सापडले. मुळात एखाद्या नातेसंबंधामधून बाहेर पडण्याची मानसिकता का असू नये? त्याबाबत मारझोड करणे, खून करणे इतक्या टोकाचे पाऊल उचलण्याची गरजच काय? त्यातून काय साध्य होते? यांसारख्या प्रश्नांबाबत सर्वांनाच विचार करावा लागणार आहे. कारण आज आपण अवतीभवतीही अनेक नातेसंबंध असे पाहतो, ज्यामध्ये नकार पचवताना बराच संघर्ष घडताना दिसून येतो. तसेच एखाद्या व्यक्तीविषयी आज प्रेम वाटते तसेच प्रेम उद्या राहीलच असे सांगता येत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे, पण आपल्याला आवडणाऱया व्यक्तीला आपणही आवडायलाच हवे, हा अट्टाहास पुढे जाऊन टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंत घेऊन जातो. त्यामुळे वसईसारख्या घटनांच्या निमित्ताने मानसशास्त्राrयदृष्टय़ाही अनेक मुद्दय़ांबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
(लेखिका कायदे विश्लेषक आहेत.)