>> अॅड. प्रतीक राजूरकर, [email protected]
वाघ, अस्वल आणि बिबट यानंतर मानव-वन्य जीव संघर्षात भर पडली आहे ती लांडग्यांची. गेल्या दीड-दोन महिन्यांत उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यात सात लहान मुलं आणि एक महिला लांडग्यांच्या हल्ल्यांना बळी पडले आहेत. अतिशय लाजाळू असलेल्या लांडग्यांनी लाज सोडून इतकी क्रूरता का गाठली आहे? यावर सरकारी पातळीवर सखोल संशोधन होण्याची गरज आहे. अन्यथा तात्कालिक उपाय म्हणजे लबाड लांडग्यांचे ढोंग ठरेल.
उत्तर प्रदेशातील शरयू आणि घागहरा नद्यांच्या तटावर बहराईच जिल्हा वसलेला आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेला घनदाट असे चकिया, सुजाऊलीसारखे लहानमोठे वनक्षेत्र आहे. देशाची आंतरराष्ट्रीय सीमा या जिल्ह्यात उत्तरेकडे असून पलीकडे नेपाळला लागून आहे. पुराणकथेत ब्रह्मदेवाने या परिसराची निर्मिती केल्याच्या कथा आहेत. रामायण, महाभारत, 1857 चे स्वातंत्र्य युद्ध अथवा देशाचा स्वातंत्र्य लढय़ात बहराईच जिल्ह्याची महत्त्वाची भूमिका बघायला मिळते. ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या जिल्ह्यात या वर्षी मार्च महिन्यापासून लांडग्यांच्या हैदोसाला नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
लांडग्यांचे हल्ले अतिशय भीषण असून प्रामुख्याने लहान मुले त्यांच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. आईच्या कुशीतून ओढून नेलेल्या एका लहान बालकाचे अवयव एका शेतात आढळले. एका गावात वऱहांडय़ात पलंगावर झोपलेल्या लहानग्यासाठी आई घरात दूध आणायला गेली, तितक्या वेळात लांडग्याने आपला हेतू साध्य केला. शरीराने कमकुवत लहान मुले लांडग्यांचे लक्ष्य ठरताहेत. या वर्षी मार्च महिन्यापासून लांडग्यांचे हल्ले सुरू झाल्याचे स्थानिकांनी सांगितल्याची माहिती प्रकाशित आहे. जुलै महिन्यानंतर या पशुहल्ल्यांनी उग्ररूप धारण केले. जिल्ह्याच्या लगत मोठय़ा प्रमाणात वनक्षेत्र असूनही लांडग्यांना नागरी वस्तीत येण्याची गरज का पडते आहे यावर तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना गरजेच्या आहेत. हल्ले थांबवण्यासाठी ‘प्रोजेक्ट भेडिया’ उत्तर प्रदेश सरकारने सुरू केले आहे. माहसी तालुक्यात लांडग्यांच्या हल्ल्यांनी हैदोस घातल्यावर माध्यमात बातम्या प्रकाशित होऊ लागल्या. दुसरीकडे वन विभागाचे ‘ऑपरेशन भेडिया’ सुरू असतानाच 1 सप्टेंबर रोजी एक तीन वर्षीय बालिका लांडग्यांच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे आणि तीन महिला जखमी झाल्याच्या वेगवेगळ्या घटनांच्या बातम्या प्रकाशित झाल्या.
आतापर्यंत सात लहान मुलं आणि एक महिला लांडग्यांच्या हल्ल्यात बळी गेल्या. जवळपास 22-25 व्यक्ती हे लांडग्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यावर प्रशासनाला जाग आली आहे. जिल्ह्यात आता वनबलाच्या 25 ठिकाणी तुकडय़ा तैनात करण्यात आल्या असून जाळ्या, बेशुद्धीचे औषध, ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने वनबल सुसज्ज आहे. लहान मुलांना भक्ष्य करणाऱया लांडग्यांची ओळख पटल्याचासुद्धा वन विभागाने दावा केला आहे. वन विभागाने ओळखलेल्या सहा हल्लेखोर लांडग्यांपैकी चार लांडगे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्याचे प्रशासनाने जाहीर केले. अगदी पोलिसांनी एखाद्या गुल्ह्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अगदी तसेच हे स्पष्टीकरण असल्याचे जाणवते. मानव-वन्य जीव संघर्षाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. लहान मुलं, वयोवृद्ध महिला-पुरुषांच्या सुरक्षेचा विषय अतिशय संवेदनशील आहे. हे हल्ले का होत आहेत याचासुद्धा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. अनेक गावांत नसलेली रात्रीची वीज, उघडय़ावर लघुशंका, प्रातर्विधीला नागरिकांना आजही का जावे लागते, हे नागरी वस्तीतील नागरिकांच्या असुरक्षितेचे मुख्य कारण. वनक्षेत्रालगतच्या गावांच्या बाबतीत या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असायला हवी. आता शाळांना सुट्टी देणे, वन विभागाने गस्त वाढवणे म्हणजे साप निघून गेल्यावर भुई धोपटण्याचा प्रकार आहे. लांडग्यांना जेरबंद केल्यावरही हे प्रकार होणारच नाहीत याची कुठलीच हमी वन विभाग आणि सरकारकडे नाही. कारण सध्या जे उपाय सुरू आहेत ते कायमस्वरूपी नसून केवळ वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. शासनाची नुकसान भरपाई ही कधीही भरून न येणारी जिवितहानी भरून काढू शकणारी नाही. यासाठी गरज आहे ती मानव आणि वन्य जीवांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास हे प्रकार बंद होतील. अन्यथा आज लांडग्यांना अटकाव झाल्यावर उद्या इतर वन्य जीव त्यांची जागा घेतील.
अभ्यासकांनी लांडग्यांच्या हल्ल्याचे ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत. 1871 ते 1916 या इंग्रज राजवटीत एक लाखाहून अधिक लांडग्यांची शिकार केल्याचे संदर्भ सांगत त्या काळात लांडग्याच्या शिकारीवर बक्षीस म्हणून बारा आणे ते आठ रुपये दिल्याचे उल्लेख असल्याचे उदाहरण दिले आहे. उत्तर, मध्य हिंदुस्थानात लांडगे आणि बऱयाचदा लांडगा, कोल्ह्यातील फरक न कळल्याने अनेक कोल्हेसुद्धा शिकारीला बळी ठरले. 1876 साली आग्रा, औंध, एकूण 721 स्थानिक लांडग्यांच्या भक्ष्यस्थानी होते. भागलपूर, पटणा भागात ती संख्या 185 होती. मानवजीव हे वन्य जीवांचे नैसर्गिक भक्ष्य कधीच नव्हते. लांडग्यांची लहान शरीरयष्टी, चपळता ही लपून हल्ला करण्यात वरचढ ठरते. एक अभ्यासक यादववेंद्रदेव झाला यांच्या मते गेल्या तीन दशकांत लांडग्यांच्या मानवावर हल्ल्याच्या केवळ दोनच घटना घडल्या आहेत. 1980 साली बिहार आणि 1996-97 साली उत्तर प्रदेशात. मात्र सध्याची परिस्थिती ही प्रामुख्याने उत्तर प्रदेशात का उद्भवली आहे, याच्या सखोल संशोधनाची गरज आहे. लांडगे देशात सर्वत्र आढळून येतात, परंतु उत्तर प्रदेशात नरभक्षक लांडग्यांचे जीवघेणे हल्ले का वाढले आहेत, याबाबत अभ्यासक तज्ञांची मते महत्त्वाची ठरतील. अतिशय लाजाळू असलेल्या लांडग्यांनी लाज सोडून इतकी क्रूरता का गाठली आहे? हा निश्चितच संशोधनाचा विषय आहे. शासकीय स्तरावर याबाबत सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. अन्यथा तात्कालिक उपाय म्हणजे लबाड लांडग्यांचे ढोंग ठरेल.