रंगभूमी – कालजयी रश्मीरथी

>> अभिराम भडकमकर


काळाचे बंधन नसलेल्या कलाकृती प्रत्येक पिया कलावंतांना भुरळ घालतात आणि आव्हानात्मक ठरतात. राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांची ‘रश्मीरथी’ ही अशीच एक ‘कालजयी’ रचना. प्रसिद्ध झाल्या दिवसापासून हिने वाचकांना मोहित केलं. दिल्ली येथे झालेल्या ‘प्रवीण सांस्कृतिक मंच’ या संस्थेच्या नाटय़ महोत्सवात पाटण्यातील एक महत्त्वाचे दिग्दर्शक विजेंद्र टाक यांनी दिग्दर्शित केलेलं ‘रश्मीरथी’ पाहण्याचा योग आला.

अभिजात साहित्यकृतीचे आकर्षण नेहमीच कलावंतांना वाटत असते. काही काही साहित्यकृती अशा असतात ज्या ‘एक्सपायरी डेट’ घेऊन येत नाहीत. उलट जसा जसा काळ सरत जातो तशा नव्या नव्या संदर्भात त्या अधिकाधिक समकालीन होत जातात. समकालीन हा शब्दच कलाकृतीच्या बाबतीत निरर्थक आहे असे मी नेहमी म्हणतो ते या अर्थाने.

काळाचे बंधन नसलेल्या या कलाकृती प्रत्येक पिढीतल्या कलावंतांना भुरळ घालतात आणि आव्हानात्मक ठरतात. राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांची ‘रश्मीरथी’ ही अशीच एक ‘कालजयी’ रचना. प्रसिद्ध झाल्या दिवसापासून हिनं वाचकांना मोहित केलं. पण हे काव्य नाटकवाल्यांनाही आपल्याकडे खेचत राहिलं आणि म्हणूनच ‘रश्मीरथी’ सादर करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मग ते विविध शैलींतूनही सादर होतं.
नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या ‘प्रवीण सांस्कृतिक मंच’ या संस्थेच्या नाटय़ महोत्सवात ‘रश्मीरथी’ पाहण्याचा योग आला. पाटण्याहून दिल्लीला येऊन स्वतच्या बळावर नाटय़ संमेलन भरवणं हे सोपं नाही. या संमेलनातील ‘रश्मीरथी’ हे पाटण्यातील एक महत्त्वाचे दिग्दर्शक विजेंद्र टाक यांनी दिग्दर्शित केलं होतं. मुळात ‘रश्मीरथी’ हे हिंदी भाषिक प्रेक्षकांना लहानपणापासून माहीत असलेले आणि अनेकांना तर तोंडपाठ असलेले काव्य. त्यामुळे त्याचे सादरीकरण अवघड. कारण जेव्हा ते समूहाने नाटय़ स्वरूपात सादर होते तेव्हा ते संगीत, मूव्हमेंट आणि दृश्यात्मकतेत हरवण्याची शक्यता अधिक. अभिनयातून कविता सादर करत असताना त्यातील प्रतिमा, उपमा अधोरेखित कराव्यात तर ते केवळ पौराणिक कपडय़ातलं कविता वाचन ठरतं. अभिनयावर भर द्यावा तर त्यातले सोन्यासारखे शब्द दुय्यम ठरू शकतात आणि संगीतावर, हालचालींवर भर दिला तर गाण्या-बजावण्यात काव्य हरवण्याची हमखास खात्रीच.

पण हा तोल सांभाळत विजयेंद्र टाक यांच्या चमूने त्याचे अप्रतिम सादरीकरण केलं. हेमंत माहौर यांनी प्रभावीपणे कर्ण उभा केला. सूत्रधारांची योजना करून त्यांनी कर्ण, (लक्ष्मी मिश्रा) कुंती, (ब्रजेश शर्मा) अर्जुन आणि (कुमार विमलेंदू सिंह) श्रीकृष्ण, राजू मिश्रा (इंद्र) ही पात्रेही उभी केली. त्यातील काव्य हरवलं नाही आणि इतर घटक पूरक ठरले. ज्यात जयंत देशमुख यांचं अत्यंत सूचक असं नेपथ्य, रोहित चंद्रा यांच्या संगीताला सुरेल गायकांची दमदार साथ, दिग्दर्शकांनी बांधलेल्या अर्थपूर्ण संरचना यातून कर्ण आणि नियतीने त्याच्या पदरात बांधलेलं दुर्दैव सकसपणे उभं राहिलं. श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञानही जोरकसपणे उभं राहिलं आणि ‘रश्मीरथी’चं कालजयी असणं अधोरेखित झालं. खरं तर बिहारच्या बोलीभाषेत लोकगीत लोकनृत्य यावर आधारित नाटक सादर करणारं ‘प्रवीण कला मंच’ हे एक वेगळंच नाटक सादर करत करताना दिसलं. स्वतचीच चौकट मोडण्याचा हा अतिशय स्तुत्य प्रयत्न होता.

या कलाकृतीचे श्रेष्ठत्व हे की, अनेक जण कलावंतांसह ‘रश्मीरथी’तील काव्य पुटपुटत होते इतकं ते लोकांच्या मनी ठसलेलं आहे.

एकीकडे लेखकांनी समकालीन असले पाहिजे असं म्हणत त्याच्या कलात्मक शक्यतांचा संकोच करण्याचं ब्रीदच हाती घेतलेले समीक्षक आणि ओपिनियन मेकर असताना दुसरीकडे एक कलाकृती काळाला ओलांडून, काळाला न जुमानता कशी विविध प्रकारे सादर होऊ शकते याचे दर्शन यानिमित्ताने घडलं.

खरंच अभिजात कलाकृतीला काळ बांधून घालू शकत नाही हेच खरं!

[email protected]
(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)