मुद्दा – कोकणचे रस्ते : बाप्पा, सुबुद्धी दे!

>>  आत्माराम नाटेकर (ज्येष्ठ पत्रकार)

अनंत चतुर्दशीदिवशी श्री गणरायांचे वाजतगाजत विसर्जन झाले. ’गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ म्हणत भक्तगणांनी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. 11 दिवस भक्तांनी भक्तिभावाने आपल्या बाप्पाची यथासांग पूजा केली. कोकणात गणपती आणि भजन हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक घरी गणपतीची मूर्ती आणून तिची विधिवत पूजा केली जाते. पूर्वजांनी सुरू केलेल्या या रूढी-परंपरांचे आजही तितक्याच कसोशीने पालन केले जात आहे. दहा दिवस रात्री उशिरापर्यंत चालणारी भजने म्हणजे भजन महोत्सवच म्हणावा लागेल. 10 रात्री आम्ही 28 भजने केली, भजनी बुवा होते, परेश गावडे, प्रथमेश पवार, नीलेश परब आणि अनुभवी गुरुमाऊली संदीप परब. आपल्या वडिलांची (गणपत परब ऊर्फ तात्या) परंपरा चालवणारा संदीप जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक म्हणून कार्यरत आहे. गेली कित्येक वर्षे तो निःस्वार्थीपणे भजनरूपी सेवा अर्पण करतोय. आता उदयास आलेले नवोदित संगीतकार हे संदीप परब यांचे शिष्य.

दरवर्षीप्रमाणे आम्ही दोन गट बनवले होते. वाडीबाहेर भजने करणारी मंडळी तितक्याच जोमाने शेवटच्या दिवसापर्यंत भजने करीत होती. बुवा होता नव्या दमाचा महेश परब. त्याला कोरस देणारी मंडळी नेमकीच, पण पट्टीची होती. गणेश गोगटे याने एकहाती पखवाजाची बाजू सांभाळली. हे सारे तब्येतीने बेताचेच असल्याने छोटेखानी टेम्पोतून सहज फिरत होते. टेम्पो घेऊन गावाबाहेर जाणे म्हणजे कसरतच होती. यंदा गंमतच झाली. चाकरमान्यांनी भजनात उसळ -मिसळ पावावर आडवा हात मारला. एका रात्रीत तब्बल 18 पाव घशाखाली उतरवणाऱ्या मंदारचे काwतुक करू की कपाळाला हात लावू असा प्रश्न मला पडला.

कोकणातील खड्डेमय रस्ता हा विषय घेऊन एखाद्याने पीएच.डी. केल्यास नवल नाही. दीनवाणे आणि बापुडे रस्ते पाहून कोणालाही कीव यावी. गावालगतच्या रिक्षाचालकांनी गावात येण्यास नापसंती दर्शवली, यावरून रस्त्याचे रूप कळून येईल. चुपूनमापून एखादा गावात आलाच तर दीड-दोनशे हातावर ठेवल्याशिवाय पर्याय नाही. आचरा ते चिंदर तसे अंतर केवळ दोन-अडीच किलोमीटर. गावातील रस्त्यावरून त्या गावची श्रीमंती दिसून येते. आता निवडणुका जाहीर होतील आणि मग रस्त्याची डागडुजी सुरू होईल, पण ती तात्पुरती. चिंदर वड ते सडेवाडी या गावातील मध्यवर्ती रस्त्याचे भिजत घोंगडे गेली कित्येक वर्षे लाल फितीत अडपून पडले आहे. रस्ता काँक्रिटीकरण झाले तरच खऱ्या अर्थाने ‘चिंदर गाव माझे सुंदर’ हा सेल्फी पॉइंट अधिक उठून दिसेल. लोकसभेच्या निवडणुकीतील हजाराचे मोल विधानसभा निवडणुकीत आणखी हजाराने वाढेल. पुन्हा एकदा अनेकांना लक्ष्मीदर्शन होईल. अनेकांच्या पदरात काहीच पडणार नाही, पण तो आपला हक्क बजावणार. या मंडळींना आता मतदाराची नस सापडली आहे. केव्हा आणि कोणास काय द्यावे याचा आराखडा तयार आहे. गणपती बाप्पा या सर्वांना सुबुद्धी देवो.

यंदा कमी जास्त पाऊस होताच. पण खरी गोम होती ती दीनवाण्या रस्त्याची. गावातील रस्त्यावरून गणपतीबाप्पाला घरी घेऊन येताना बाप्पाला खूपच त्रास झाला. तो हे रस्ते पाहून निश्चितच खजील झाला असेल. अशी लाज त्या रस्ते कामात दिरंगाई करणाऱ्या पंत्राटदारांना वाटून हे रस्ते पुढल्या वर्षी तरी वाहतुकीसाठी योग्य होतील, हीच गणपतीबाप्पाच्या चरणी प्रार्थना.