>> आशुतोष बापट
कोकणच्या अगदी आत खोलवर वसलेले एक सुंदर शिवालय म्हणजे मीठगवाणे इथले श्रीअंजनेश्वर शिवालय. राजापूर परिसरात भटकताना अंजनेश्वराचे दर्शन घेणे ाढमप्राप्त आहे. इथली कमालीची शांतता अनुभवावी. इथला निसर्ग डोळे भरून बघून घ्यावा. आपली भटकंती समृद्ध व्हावी.
निसर्गरम्य कोकणात जितके अंतर्गत भागात हिंडायला लागू तेवढा निसर्गात दडलेला एकेक खजिना उघड होत जातो. धाऊलवल्ली, तुरवडे अशा निवांत सुंदर ठिकाणांसारखे अजून एक सुंदर शिवालय कोकणच्या अगदी आत खोलवर वसले आहे ते म्हणजे मीठगवाणे इथले श्रीअंजनेश्वर शिवालय. पूर्वी या ठिकाणी मिठागरे होती म्हणून याचे नाव झाले ‘मीठगवाणे!’ इथला निसर्ग बघून अक्षरश वेड लागायचं बाकी असतं. इतक्या सुंदर ठिकाणाशी एखादी छान दंतकथा जोडलेली असली तर त्या स्थानाचा गोडवा अजून वाढतो. इथे असंच आहे. फार पूर्वी या ठिकाणी अंजनाची किंवा अंजणीची झाडे होती. या अंजणीच्या वनात वसला आहे तो ‘अंजनेश्वर’. सुमारे सातशे-आठशे वर्षांपूर्वीची ही कथा. आज शंकराची पिंडी असलेल्या जागेभोवती ‘आंजणी’ नावाच्या वृक्षांचे रान होते. त्या रानात दररोज एक गाय येऊन पिंडी असलेल्या जागी दुधाची धार सोडत असे. हे स्थानिक लोकांच्या ध्यानात येऊन तेथे पाहता एक शंकराची पिंडी आढळली.
त्याच सुमारास जवळच असलेल्या साखर नावाच्या गावातील गोखले कुटुंबात चार सख्खे भाऊ नांदत होते. काही गुंडांच्या हल्ल्यात चारही भाऊ मारले गेले. तीन भावांच्या बायका सती गेल्या. चौथ्या भावाची बायको गर्भवती होती. तिला मीठगवाणे इथल्या गावकऱयांनी थारा दिला. उत्पन्नासाठी थोडी जमीन दिली व देवस्थानची व्यवस्था सांगितली. त्या स्त्राrला पुढे मुलगा झाला. त्याने वरील जागेवर एक लहान घुमटीवजा देऊळ बांधले. गावकरी त्या शंकराच्या पिंडीची पूजाअर्चा करू लागले आणि देवाला ‘श्रीदेव अंजनेश्वर’ म्हणू लागले.
या ठिकाणाशी अजून एक कथा निगडित आहे. मीठगवाणेजवळ समुद्राचा भाग आतमध्ये आला आहे. या ठिकाणी पूर्वीपासून गलबतातून व्यापार चाले. एका मलबारी व्यापाऱयाचे गलबत वादळात सापडले ते नेमके याच ठिकाणी. त्या गलबतावरील व्यापाऱयाने किनाऱयावरील अज्ञात देवाची करूणा भाकली. वादळातून माझे जहाज सुखरूप बाहेर पडू दे. मी इथल्या देवाचे सुंदर मंदिर बांधेन. वादळ शमले आणि मलबारी व्यापाऱयाचे जहाज सुखरूप बाहेर निघाले. मग त्या व्यापाऱयाने त्या लहान घुमटीचे देवालयात रूपांतर केले. या देवळाच्या बांधकामासाठी लागलेले लाकूड सामान व कारागीर खास मलबारहून आणले होते, असे सांगितले जाते.
उत्तरेला जैतापूरची खाडी आणि दक्षिणेला विजयदुर्गाची खाडी याच्यामध्ये मीठगवाणे गाव वसले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिराचा प्राकार विस्तीर्ण आहे. आपण इथे आल्यावर आपले स्वागत या देवळाच्या सुंदर अशा नगारखाना असलेल्या प्रवेशद्वाराने होते. हे देऊळ पश्चिमाभिमुख आहे. गाभारा, अंतराळ, सभागृह अशी रचना आहे. मंदिराचे बांधकाम जांभ्या दगडात केलेलं असून प्राकारात एक विहीर आहे. प्राकार दगडी भिंतीने बंदिस्त आहे. खाली उतरल्यावर आवारात पाच दीपमाळा दिसतात. या दीपमाळा सगळ्या मंदिर परिसराची शोभा वाढवतात.
मंदिरात प्रवेश केल्यावर इथली लक्षवेधक गोष्ट म्हणजे सभामंडपातील खांबांवर केलेले अप्रतिम कोरीवकाम. निरनिराळी काष्ठशिल्पे इथल्या खांबांवर कोरलेली आहेत. ज्यात कृष्ण, ब्रह्मदेव अशा शिल्पांची नजाकत अफलातून आहे, पण यापेक्षा इथल्या काष्ठशिल्पात महत्त्वाचं काय असेल तर ‘सदाशिवाचे’ शिल्प. देवाला पाच मुखे असून समोरच्या मुखाच्या डोक्यावर तिसरा डोळा दाखवला आहे. डोक्यावर गंगा धारण केलेली आहे. शिवाचे सदाशिव हे रूप सहसा कुठे दिसत नाही. मुंबईजवळच्या घारापुरी लेणीत सदाशिवाची भव्यदिव्य मूर्ती आहे, पण कोकणातल्या या आडगावात सदाशिवाची मूर्ती असणं ही कमालीची आश्चर्यकारक बाब आहे. अशी शिवमूर्ती पाशुपत संप्रदायाशी निगडीत असते, असा अभ्यास आहे. या संप्रदायीची उपासनस्थळे आणि त्याचे महत्त्व याबाबत आपण पुढच्या भागात जाणून घेऊया.
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)