>> आशुतोष बापट
प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांचे वास्तव्य बराच काळ प्राचीन काळातील दंडकारण्य म्हणजेच छत्तीसगडच्या दक्षिण भागात होते अशी इथल्या लोकांची ठाम समजूत आहे. त्यामुळेच येथील मंदिर रचना, स्थापत्यामध्ये रामायणाचे संदर्भ प्रामुख्याने आढळतात. जांजगिर चंपा जिल्ह्यातील शिवरीनारायण संगम, नर नारायण मंदिर, खारोद येथील लक्ष्मेश्वर मंदिर, मठमंदिरे प्राचीन संस्कृतीची साक्ष देतात.
छत्तीसगडचा दक्षिण भाग हा प्राचीन काळापासून दंडकारण्य म्हणून ओळखला जातो. प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांचे वास्तव्य बराच काळ याच भागात होते अशी इथल्या लोकांची ठाम समजूत आहे. श्रीराम ज्या मार्गाने चालत जाऊन पुढे दक्षिणेला किष्किंधा नगरीला गेले त्या मार्गाला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्तीसगड सरकारने ‘श्रीराम-वन-गमन-मार्ग’ अशा नावाने हा मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करायचे ठरवले आहे. या भागात हिंडताना आपल्याला अगदी हमरस्त्यावरसुद्धा असे लिहिलेल्या पाटय़ा बघायला मिळतात. रामायणातील प्रभू श्रीराम आणि शबरी यांची कथा सर्वांनाच माहिती असते. ती शबरीसुद्धा इथलीच असल्याचे इथे सांगतात. शबरीचे एक लहान मंदिरसुद्धा इथे आहे. आज जे आपण शिवरीनारायण ठिकाण बघणार आहोत त्याचे मूळ नाव ‘शबरी नारायण’ असल्याचे सांगितले जाते.
जांजगिर चंपा जिह्यात शिवरीनारायण हे एक विष्णूक्षेत्र आहे. तिथे महानदी आणि शिवनाथ या नद्यांचा संगम होतो व पुढे काही अंतर गेल्यावर त्यांना जोंक नावाची नदी येऊन मिळते. या जोंक नदीच्या संगमावर शबरीचे एक मंदिर आहे. शबरी याच ठिकाणी राहायची अशीही लोकांची दृढ समजूत. इतिहास आणि लोककथा यांचा संगम असलेले शिवरीनारायण हे विष्णू संप्रदायाचे महत्त्वाचे ठिकाण. साहजिकच इथे असलेली सगळी मंदिरे एक अपवाद वगळता विष्णूची आहेत. त्यातले प्राचीन आणि शिल्पसमृद्ध मंदिर म्हणजे ‘नरनारायण मंदिर.’ हे मंदिर जवळ जवळ पाचशे वर्षे जुने आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडपात डावीकडे गरुडारूढ विष्णू-लक्ष्मीचे नितांत सुंदर शिल्प आपले लक्ष वेधून घेते. शिल्पाच्या बाजूने विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. गाभाऱयात एकाशेजारी एक अशा दोन मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्या वस्त्रांनी झाकलेल्या असतात. त्यातली एक नराची आणि दुसरी नारायणाची आहे. नारायणाची मूर्ती इथे झालेल्या उत्खननात सापडली. इथले पुजारी या मूर्तींना राम आणि लक्ष्मणाची मूर्ती असे संबोधतात. तसेच गाभाऱयाची द्वारशाखा खूप सुंदर आहे. नरनारायण मंदिराच्या शेजारी ‘केशव नारायण मंदिर’ आहे. याच्या दरवाज्याच्या ललाटबिंबावर विश्वकर्म्याची मूर्ती कोरली आहे. देवांचा स्थपती असलेला हा महत्त्वाचा देव. इथल्या द्वारशाखेवर विष्णूच्या विविध विभवांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या हातातल्या आयुधांचा क्रम बदललेला लक्षात येतो. विष्णूच्या मुख्य मूर्तीच्या पायाशी एक लहान स्त्राr प्रतिमा आहे. ती अर्थातच लक्ष्मी असते. मात्र स्थानिक लोक तिला शबरी असे म्हणतात.
खारोद ः शिवरीनारायणपासून फक्त 3 किमीवर खारोद आहे. या गावाचे संदर्भ थेट रामायणाशी जोडलेले आहेत. रामायणात रावणाचे दोन राक्षस होते त्यांची नावे ‘खर’ आणि ‘दूषण.’ त्या खर आणि दूषणांनी या ठिकाणी रामाशी युद्ध केले म्हणून या गावाचे नाव खारोद असे पडले. ते नेमके युद्ध कुठे झाले त्याची खूण म्हणून एक झाडसुद्धा दाखवतात. शिवरीनारायण हे विष्णूक्षेत्र आहे, तर खारोद हे शिवक्षेत्र. शिवाशी संबंधित इथे विविध मंदिरे आहेत. एके ठिकाणी शिवाला ‘दुल्हादेव’ असे संबोधून त्याचे मंदिर बांधले आहे. या ठिकाणी तरुण मुलींनी येऊन शिवाची उपासना केली की, त्यांना उत्तम वर प्राप्त होतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.
इथले सर्वात प्राचीन मंदिर आहे लक्ष्मेश्वराचे. इ.स.च्या 7 व्या शतकात हे मंदिर बांधले. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे इ.स.च्या 12 व्या शतकातला कलचुरींचा एक शिलालेख या मंदिरावर आहे. या शिलालेखात कलचुरींची वंशावळ दिलेली आहे. गाभाऱयात असलेल्या शिवलिंगाला एक लाख पंचवीस हजार छिद्र असल्याचे सांगितले जाते. याचा संबंध रामायणाशी जोडलेला आहे. रामायणात लक्ष्मणाला शाप मिळाल्यामुळे त्याला कुष्ठरोग झाला. त्याने एक लक्ष पंचवीस हजार शिवलिंगे तयार करून ती शिवाला अर्पण केल्यावर त्याची या शापातून मुक्तता झाली. हाच धागा पकडून इथे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला तेवढय़ा संख्येचे भाताचे दाणे अर्पण केले जातात. त्यामुळे भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी इथल्या लोकांची श्रद्धा.
इथे शबरीच्या नावाचे एक मंदिर आहे. या मंदिराचे शिखरसुद्धा अस्तित्वात आहे. मंदिराच्या गाभाऱयाच्या दारावर गंगा, यमुना नसून शालभंजिका कोरलेल्या आहेत. खरं तर शालभंजिका या मंदिराच्या बाह्यांगावर सजावटीसाठी कोरलेल्या असतात. मात्र या ठिकाणी त्यांना द्वारशाखेवर स्थान दिलेले दिसते.
खारोद इथे 126 तलाव असल्याच्या नोंदी आहेत. सगळे छत्तीसगड राज्यच मुळी तळ्यांचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. खारोद हे त्यातलेच एक ठिकाण. खारोदला तिवारीपारा नावाचा एक भाग आहे तिथे बोरांचा बगीचा आहे. आजही तिथली बोरे खूप गोड असतात. रामायण-शबरी-तिची बोरे आणि खारोद यांचा हा परस्पर संबंध, अशा काही गोष्टी बघितल्या की प्रकर्षाने जाणवतो. खरं तर सगळा छत्तीसगड प्रदेश या अशा विविध सुंदर कथांनी भरलेला आहे. इथली मंदिरे, इथली ठिकाणे आणि त्यांचा प्रभू श्रीरामचंद्रांशी असलेला संबंध बघितला की, आपल्या प्रवासाला साहजिकच एक धार्मिक किनार प्राप्त झाल्याचे वाटते. आपण अक्षरश मंत्रमुग्ध होऊन जातो. हजारो वर्षे मागे जातो. इथली भोळी माणसे, त्यांची श्रीरामावर असलेली अपार श्रद्धा आणि त्यांनी आजही विविध कथांमधून जपलेली आपली संस्कृती बघितली की अतीव समाधान वाटते. हा प्रदेश अशा अनेक रमणीय कथांनी आणि ठिकाणांनी भरलेला आहे. याचे मनमुराद दर्शन घेणे आणि त्या कथेत आपणही रमून जाणे यामुळे आपली भटकंती अजून समृद्ध होते.
[email protected]
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)