>> आशीष निनगुरकर
26 जानेवारी 1949 पासून `भारतीय संविधान’ पूर्णपणे देशभरात लागू झाले. त्यामुळे देशभरात प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला `प्रजासत्ताक दिन’ मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. या दिनानिमित्त आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि एकूणच वास्तव गोष्टींवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर देश चालविण्यासाठी संविधानाची गरज होती. या संविधानामध्ये देशातील व्यवस्था कशी असेल हे ठरवायचे होते. संविधानाची गरज पाहता `संविधान सभे’ची स्थापना झाली. या संविधान सभेचे सदस्य देशातील नावाजलेले नेते, वकील, कायदेतज्ञ आणि स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतलेले महत्त्वाचे सेनानी होते. या सर्वांनी मिळून भारतासाठी संविधान तयार केले. हे संविधान आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत केले. त्यानंतर 26 जानेवारी 1949 पासून हे संविधान पूर्णपणे देशभरात लागू झाले. त्यामुळे देशभरात प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतात. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्णदिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्पाम आयोजित केले जातात.
स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन जवळ येऊ लागला की, जागोजागी आपल्या देशाचे झेंडे दिसू लागतात. बरोबर तीन वर्षांपूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस अगोदर पूर्वसंध्येला शहरातील रस्त्यावर मी अनेक लहान मुलांना झेंडे विकताना पाहिले. तेव्हा मला या मुलांचे कुतूहल वाटू लागले. अधिक माहिती घेतली तेव्हा कळले की, ही मुले महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली आहेत आणि त्यांच्याकडून कुठलेही काम करून घेण्याची यंत्रणा आहे. तो मुलगा जास्त काही सांगत नव्हता. घाबरत होता, पण त्याचे डोळे मात्र खरं बोलू बघत होते. त्यालाही हे सगळं नको होतं. खरं तर ज्या वयात पाटी आणि पेन्सिल हातात असायला हवी, त्या वयात या मुलांच्या नशिबी हे दुखणं आलं होतं. हे सगळं डोळ्यांनी बघताना खरंच आपण स्वतंत्र आहोत का? असे मनोमन वाटले. जेव्हा या मुलांना अन्न, वस्त्र आणि निवारा मिळेल आणि त्याबरोबरच हक्काचे शिक्षण मिळेल. त्यांची गरिबी दूर होईल तेव्हा खऱया अर्थाने आपण स्वतंत्र असू असे वाटते. स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन असो, तसा प्रत्येक दिवसच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण अर्थातच या दिवसाचे विचार समजून घ्यायला हवेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकं होऊन गेलीत आणि स्वातंत्र्यवीरांच्या वेळची परिस्थिती खूप बरी होती असं म्हणण्याची वेळ आता आलीय. देशातल्या कुठल्याही आघाडीवर नजर टाका आणि बघा, कोठे थोडं तरी समाधान मिळतंय का ते? समस्यांची यादी बरीच मोठी आहे, पण स्वतला स्वतंत्र देशाचे स्वतंत्र आणि जबाबदार नागरिक म्हणवून घेणारे आपण जागे कधी होणार आहोत? हा खरा प्रश्न आहे.
आपल्या देशातील मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठय़ा प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. याचीच आठवण ठेवत बाल कामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणे गरजेचे आहे. चौदा वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे, पण हा कायदा अस्तित्वात येऊनसुद्धा कितीतरी वर्षे लोटली आहेत. आजही आपल्याला लहान मुले रस्ते, हॉटेल, बस स्थानके, सिग्नल, मंदिरे, दुकाने, रेल्वे स्टेशन, टपऱया अशा अनेक ठिकाणी त्यांच्याच कामात व्यस्त दिसतात. त्यांच्या भयभीत, अत्याचारित, अपमानित पावलांच्या वाटेवर त्यांच्या पंखात जिद्द, सामर्थ्य, आत्मविश्वास, शिक्षण, गरुडझेपेची उभारी देण्याचे आणि त्यांच्या निरागस डोळ्यांत भवितव्यातील स्वातंत्र्याची स्वप्नं पेरण्याचे काम करावे लागणार आहे. जी मुले शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे आवश्यक आहे. शिक्षण घेतले तरच आजचा विद्यार्थी सजग होऊ शकेल आणि तोच भारताला महासत्ता बनवू शकेल. खेळण्या-बागडण्याच्या वयात मजुरी करण्यासाठी प्रवृत्त होणे ही एक मोठीच सामाजिक विटंबना आहे.
बालमजुरीचा हा अभिशाप शहरांसह आता ग्रामीण भागातही पसरून बालकांचे बालपणच हिरावून घेत आहे. अनेक ठिकाणी हजारोंच्या संख्येत बाल मजूर असून संबंधित विभागाकडे केवळ काहीच म्हणजे बोटांवर मोजण्याइतकीच बालमजुरांची नोंद असणे ही एक शोकांतिका ठरत आहे. बाल मजूर हा त्याच्या कुटुंबाच्या उत्पन्नात एक लहानसा स्रोत असतो तरीसुद्धा गरीब कुटुंब आपल्या बालकांचे भविष्य त्यामुळे अंधारात झोकतात.
खेळण्या-बागडण्याचे व शिक्षणाचे दिवस जबाबदारीत परिवर्तित होतात. कुटुंबाचे दायित्व खांद्यावर येते व तो सामाजिक बंधनात बांधला जातो. तेव्हा `बालपण हे सुखाचे दिवस’ या वाक्याच्या नेहमी होणाऱया उपयोगाची सत्यता दिसून पडते. खरोखरच बालपण हे सुखाचे असते, पण कुणासाठी? गोरगरीबांची मुले तर बालमजुरीतच आपले कष्टकारक जीवन जगत असतात. या बालकांमध्ये मोठी हिंमत व धाडस असते, पण त्यांना शिक्षणाची नितांत गरज असते. त्यासाठी पैसा हवा असतो. मात्र उदरनिर्वाहासाठीच पैसा नाही, तर शिक्षणासाठी तरी कुठून आणणार? ही समस्या गरीब कुटुंबासमोर व बालकांच्या पालकांसमोर `आ’ वासून उभी असते. आता गरज आहे बाल कामगारांच्या जीवनात नवीन प्रकाशवाट आणण्याची. त्यासाठी शासकीय, अशासकीय संघटना व समाजाने पुढे येऊन कार्य करावे लागणार आहे. ग्रामीण भागात मुलींच्या बालमजुरीला बालविवाहाचा एक पैलू असतो. शहरातही अनेकदा गरीब कुटुंबातील मुलीची शाळा सुटली की, ती बालमजुरीत आपोआपच ओढली जाते. वस्तीमध्ये मुलींच्या असुरक्षिततेच्या भीतीने आणि `जर मजुरीच करायची आहे तर सासरी जाऊन कर’ अशा भूमिकेतून अशा मुलींचा बालविवाह होतो. शिक्षण फारसे नसल्याने मजूर कुटुंबातीलच स्थळ मिळते. म्हणजे तिचा प्रवास एका गरीब कुटुंबातून दुसऱया गरीब कुटुंबाकडे होतो. इथे तिला मजुरी करण्याबरोबरच नवऱयाची लैंगिक गरजही भागवावी लागते. म्हणजे त्यात लैंगिक शोषणाचीही भर पडते.
अनेक वेळा अशा प्रकारची बालमजुरी समाजाला मान्यही असते. अनेक पालकांना आपल्या पाल्याच्या चिमुकल्या हातांनी मजुरी करून घेणे हा वारसा हक्कच वाटतो. मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी पालकच मुलांना बऱयाचदा स्वत:सोबत मजुरीला घेऊन जातात. पालकांची गरिबी, बेकारी, अशिक्षितपणा, शहरीकरण, खेडय़ांमध्ये शाळांची कमतरता, बाल हक्काच्या कायद्याची अंमलबजावणी न होणे अशा अनेक कारणांमुळे बाल मजुरी सुरू राहते, पण बाल मजुरी बंद न होण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे मुलांच्या हक्काबद्दल जागरूकता नसणे, मुलांच्या भविष्याबद्दल कळकळ नसणे हेच आहे! देशात बाल मजुरी सुरू राहणे हे देशाच्या प्रगतीला हानीकारक आहे, हे आपल्या कधी लक्षात येणार?
मध्यंतरी एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातसुद्धा भारतात बाल मजुरीचा प्रश्न भीषण स्वरूप धारण करून कितीतरी चिमुकल्यांचे आयुष्य दिशाहीन व उद्ध्वस्त करून टाकत असल्याचे पुढे आले होते, परंतु समाजात या दिशाहीनांना पदरात घेण्याचे धाडस अनेक सामाजिक संस्था व माणसे आपापल्यापरीने करत आहेत. जगातल्या अनेक देशांत व भारतातदेखील स्वातंत्र्य खऱया अर्थानं कसं जोपासावं? हा प्रश्न येत्या काही वर्षांत महत्त्वाचा ठरेल. त्यासाठी सगळ्या प्रकारच्या अतिरेकाला विरोध करावा लागेल व `प्रमाणामध्ये सर्व काही असावे` हा विचार मनाशी बाळगून देशांतर्गत संबंध व परराष्ट्रसंबंध निर्माण करावे लागतील. याशिवाय सामाजिक व आर्थिक प्रवासाचे मार्ग बांधावे लागतील. `स्वातंत्र्य’ म्हणजे मुक्ती, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम हे मनात खोलवर रुजवावं लागेल. आपले नेते व नागरिक असं अर्थपूर्ण स्वातंत्र्य देशात सर्वत्र प्रस्थापित करतील व आपल्या देशात बाल मजूर आढळणार नाही अशी आशा करू या.