भटकंती – सफर बार्सिलोनाची

>> निमिष पाटगावकर, npatgaonkar@yahoo.com

युरोपात पर्यटन करताना पहिला शिक्का बसतो तो इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली या देशांचा आणि एकदा का हे टॉपचे देश बघून झाले की, मोर्चा वळतो तो स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को या देशांकडे. यातल्या स्पेनचे दर्शनजिंदगी मिले ना दोबारामध्ये आपल्याला झाले आहेच, पण ही स्पेनची झलक आहे अन् त्यातही बार्सिलोना शहर अधिक लोभस आहे

प्रत्येक देशाचे वेगळेपण हे तिथल्या विविधतेवर ठरत असते. युरोपात तर आपण भारतात राज्यांच्या सीमा बदलतो तशा देशांच्या सीमा ओलांडत असतो. पण इतके एकमेकांना खेटून हे युरोपीय देश गर्दी करून असले तरी सीमा बदलल्यावर त्या-त्या देशाचे वैशिष्टय़ दिसायला लागते. अगदी भाषेपासून ते संस्कृतीपर्यंत देशादेशांतील वेगळेपण जाणवायला लागते. स्पेनचे आपल्याला असेच दर्शन होते.  स्पेनचे दर्शन ‘जिंदगी मिले ना दोबारा’मध्ये आपल्यापैकी बहुतेकांना झाले आहेच. पण ही स्पेनची झलक आहे. मी जेव्हा स्पेनला जातो तेव्हा दरवेळी मला स्पेनचे वेगळे पैलू दिसतात. स्पेनमधील बार्सिलोना, माद्रिद , व्हॅलेंशिया आणि सेव्हिल ही प्रमुख शहरे धरली तरी यात प्रत्येक शहराचे वेगळेपण आहे. कारण स्पेनचा भूभाग इतर युरोपियन देशांच्या मानाने खूप मोठा आहे.

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात मी बार्सिलोनाच्या विमानतळावर उतरलो तेव्हा थंडीचा मोसम संपत होता.  मुंबईच्या उकाडय़ातून तिथे गेल्यावर चांगलीच थंडी जाणवत होती. माझी टॅक्सी विमानतळावरून बाहेर पडली आणि शहरातील हायवे ओलांडून जेव्हा डोंगरांच्या कुशीत शिरली तेव्हा आजूबाजूचे चित्र पालटले. उंच डोंगर आणि बोगदे पार करत माझी टॅक्सी हॉटेलपर्यंत पोहोचली तेव्हा मी भूमध्य समुद्राच्या काठावर उभा होतो. थोडक्यात, शहराला वळसा घालून डोंगरांच्या पलीकडे समुद्राच्या काठावर माझे हॉटेल मेलिया सिजेस होते. माझ्या हॉटेलच्या खोलीत पोहोचलो तर बाल्कनीतून भूमध्य समुद्राच्या लाटा समोरच्या किनाऱ्यावर लुप्त होत होत्या आणि समुद्राच्या काठावर अनेक छोटी छोटी रेस्टॉरंट्स स्वागत करायला तयार होती.

बार्सिलोना शहर कळायला सुरुवातीला थोडा वेळ लागतो. कारण स्पॅनिश भाषा कानाला कितीही सुंदर वाटत असली तरी आपल्याला हवी असलेली माहिती मिळवायला उपयोगाची नाही. इंग्लिश स्पेलिंग आणि स्पॅनिश उच्चार यांचा काही संबंध असेलच असे नाही. कुठलेही शहर कळायला पायी फिरण्यासारखा उत्तम पर्याय नाही. तेव्हा टॅक्सीचा नाद सोडून मी शहरात जायला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय शोधला. माझ्या हॉटेलपासून एक किलोमीटर चालल्यावर एक आपल्या गावातल्या स्टेशनसारखे एक रेल्वे स्टेशन होते. तिथून अर्ध्या तासात मला बार्सिलोना सिटी सेंटर म्हणजे मध्यवर्ती भागात जाता येणार होते.

बार्सिलोना बघायचे असेल तर सॅगराडा फॅमिली चर्चला भेट दिल्याशिवाय बार्सिलोनाची भेट पूर्ण होणार नाही. एका अपूर्ण चर्चची ही कहाणी आहे. 1882 साली या चर्चच्या बांधकामाला सुरुवात झाली. फ्रान्सिस्को फिलारनंतर पुढे गाऊडी या स्थापत्य विशारदाने कार्यभार स्वीकारला. गाऊडी 1926 साली निधन पावला. तोपर्यंत चर्चचे एक चतुर्थांशही काम झाले नव्हते. पुढे हे काम स्पेनच्या यादवी युद्धात अडकले. आजही  हे बांधकाम चालू आहे. इतकी वर्षे बांधकाम चालू असलेली वास्तू म्हणून त्याची नोंद जागतिक वारसा हक्काच्या स्थानात झाली. गाऊडीच्या मृत्यूच्या शताब्दी वर्षात म्हणजे 2026 साली हे पूर्ण करण्याचा मानस आहे. या चर्चला भेट देताना जाणवते ते म्हणजे जिद्द आणि चिकाटीचे प्रतीक.

युरोपच्या कुठल्याही शहराची एक ओळख म्हणजे विस्तीर्ण मध्यवर्ती जागा. तिथे कारंजी, पुतळे असतात आणि कबुतरखाना असतो. लंडनच्या ट्रपाल्गार स्क्वेअरची आठवण करून देणारा असा हा बार्सिलोनाचा कॅटालुनिया भाग. शहराचा हा मध्यवर्ती भाग असल्याने प्रचंड वर्दळीचा भाग, पण तो भाग आता लोकांना बसायला, कबुतरांना आश्रयाला ठेवला आहे हे कौतुक. तुम्हाला जर का थोडा वेळ असेल तर बार्सिलोनापासून दोन तासांवर असलेले मॉँटसेराट बघायलाच हवे. इथल्या कॉग व्हील रेल्वेने डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर जे दृश्य दिसते ते शब्दांत वर्णन करण्याच्या पलीकडचे आहे.

स्पेनच्या विस्ताराने बार्सिलोना वेगळे, माद्रिद वेगळे आणि समुद्रकाठावरचे सेविला वेगळे आणि ‘जिंदगी मिले ना दोबारा’त दाखवलेले स्पेन अजून वेगळे आहे. जशी मुंबईची ओळख म्हणजे भारताची ओळख नाही, पण मुंबई विविधता दाखवते तसेच बार्सिलोनाचे आहे. स्पेनची विविधता थोडक्यात बघायची असेल तर बार्सिलोनासारखे सुंदर शहर नाही.