आभाळमाया – अंतराळात राहताना…

>> वैश्विक, [email protected]

नऊ महिने आणि चौदा दिवसांची अंतराळयात्रा संपवून अखेर अंतराळ स्थानकावर ‘अडकलेले’ सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन संशोधक यात्री आणखी दोघांसह पृथ्वीवर सुखरूप परतले. 5 जून 2024 ते 19 मार्च 2025 असा त्यांचा अनिश्चिततेचा काळ संपला. त्याची धाकधूक पृथ्वीवरच्या त्यांच्या सहकाऱ्यांना आणि चाहत्यांना जास्त वाटत होती. कारण 5 जूनच्या उड्डाणातच गडबड होऊन ज्या बोईंग स्टारलायनरमधून सुनीता आणि बॅरी (बुच) गेले होते त्याच्या थ्रस्टरमध्ये बिघाड होऊन हिलियम वायूची गळती सुरू झाली. त्यामुळे स्टारलायनरचं स्पेस स्टेशनशी ‘डॉकिंग’ (जोडणी) तरी व्यवस्थित होतं की नाही, याविषयी धास्ती निर्माण झाली. खरं तर आरंभीचा हा काळच भयप्रद होता. परंतु डॉकिंग होऊन अंतराळ स्थानक ‘आयएसएस’वर पोचल्यावर दोघंही सुरक्षित वातावरणात पोचले.

जे स्टारलायनर जातानाच बिघडलं होतं त्यातूनच आठ दिवसांनी या आठवडाभरासाठी गेलेल्या अंतराळयात्रींना परत आणणं सुरक्षिततेचं नव्हतं. सहाजिकच ‘स्टारलायनर’ रिकामंच परतलं. कदाचित त्यातून सनी आणि बुच सुखरूप आले असतेही, पण नसती आपत्ती ओढवून घेण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे या दोघांना निदान काही काळ तरी अंतराळात राहावं लागेल हे उघड होतं.

अंतराळ स्थानकात पोचलेल्या सुनीता मात्र मजेत होत्या. अनेकदा अंतराळ प्रवास आणि निवासाचाही अनुभव असल्याने त्यांना आयएसएस आपलं वाटत होतं. म्हणूनच तिथे पोचताच ‘घरी आल्यासारखं वाटतंय’ अशी त्यांची प्रतिक्रिया होती. बॅरीचा मात्र हा पहिलाच तरंगता अनुभव होता. त्यानंतर ही ‘अडकलेली’ मंडळी पृथ्वीवर कधी परतणार याच्या तारखा येऊ लागल्या. काही तर वायफळ चर्चाही झाल्या. परंतु ‘नासा’ने सावधपणे योग्य वेळी ‘स्पेसेक्स’च्या सहाय्याने क्रू-9 वरच्या ‘ड्रगन कॅप्सुल’मधून किंवा ‘अवकाशकुपी’तून या दोघांसह चौघे अंतराळयात्री 19 मार्च 2025 रोजी आपल्या वेळेनुसार पहाटे साडेतीनच्या सुमारास पृथ्वीवरील समुद्रात (फ्लोरिडा राज्यातील टलाहासीलगत) ‘स्प्लॅशडाऊन’ करत अवतरले. त्यावेळी कुपीच्या बाहेरचा भाग 1600 अंश तापमानाने प्रज्वलित झाला. पृथ्वीवरील वातावरणाच्या घर्षणाचा हा परिणाम होता.

या ‘अग्निदिव्या’तून कुपी यथावकाश समुद्रात तरंगायला लागली. आतले अंतराळयात्री व्यवस्थित असल्याचं पडद्यावर दिसत होतं. मग साऱ्या जगाने त्यांचं स्वागत, कौतुक केलं.

यावर गेल्या लेखातही (घाईघाईत) थोडंसं लिहिलंय, कारण वृत्तपत्रीय भाषेत ‘छापता छापता’ घडलेलं हे सुटका-नाट्य़. यावर काही प्रश्न आले ते अंतराळात इतके दिवस या मंडळींनी केलं काय? तिथे जास्तीत जास्त किती जण राहू शकतात? ‘अनाहुत’ (अडकलेल्या) पाहुण्यांना पुरेलं एवढं खाद्य तिथे असतं काय? हे अंतराळयात्री कोणतं संशोधन करतात आणि मुख्य म्हणजे त्यांच्या तन-मनावर या वास्तव्याचा परिणाम काय होतो? त्यातही वास्तव्य काळ अनपेक्षितपणे ‘अनिश्चित’ झाला असेल तर मनःस्थिती कशी असते?

क्रमाक्रमाने पाहूया. अंतराळ स्थानकात जास्तीत जास्त 13 जणांची राहण्याची सोय आहे. कमीत कमी तीन ते सात अंतराळयात्री तिथे सतत प्रयोगशील असतात. त्यात दोघांची भर पडल्याने तिथल्या व्यवस्थेत काही फरक पडत नाही. उलट वैज्ञानिक प्रयोग अधिक प्रमाणात आणि गतीने होतात. अंतराळ स्थानकावर एवढ्य़ा माणसांना बराच काळ पुरेल एवढा अन्नसाठा असतो. त्यामुळे कोणी वर्षभर तिथे अडकलं तरी जेवणखाण, राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अंतराळयात्रीचं खाद्य शुष्क (सुक्या) स्वरूपात पॅकबंद असतं ते आयत्या वेळी ‘शिजवून’ घ्यावं लागतं. यात भरपूर व्हायटॅमिन्स (जीवनसत्त्व) आणि सर्व शरीरपोषणमूल्य असणारे रुचकर पदार्थ असतात. रोज सुमारे 1 पूर्णांक 724 म्हणजे जवळजवळ पावणेदोन किलो अन्न त्यांच्या वाट्य़ाला येते.

अंतराळातील शून्यवत् (मायक्रोग्रॅव्हिटी) गुरुत्वाकर्षणात राहावे लागल्याने या यात्रीच्या अस्थि आणि स्नायुंवर परिणाम होतो. हाडं ठिसूळ होण्याची शक्यता असते. प्रत्येक महिन्याला बोन-मसल शक्ती 1 टक्क्याने घटू शकते. याशिवाय बराच काळ तिथे घालवताना मानसिक तणावही येऊ शकतो.

हे सर्व लक्षात घेऊनच त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यामुळे त्यांचा वेळ वैज्ञानिक प्रयोगांमध्ये चांगला जातो. ते एक व्यवधान आणि चॅलेंजही असते. यावेळी सुनीता आणि बुच यांनी अंतराळात वायु आणि द्रव पदार्थांच वहन कसं होतं, तसेच विशेष प्रकारचं शेवाळ (ऍल्जी किंवा ऍल्गी) उगवून त्याद्वारे फोटोसिन्थेसिस किंवा हरितद्रव्यनिर्मितीमधून कार्बनडायॉक्साइड घेऊन हे शेवाळ ऑक्सिजनचं उत्सर्जन कसं करतं आणि त्याचा तिथल्या अंतराळयात्रींना फायदा कसा होऊ शकतो असे सुमारे 150 प्रयोग केले गेले. सुनीता यांनी नव्या अंतराळयात्रींना सायकलिंग आणि रोइंग (वल्हे वल्हवण्याची क्रिया) शिकवून स्नायुशक्ती कशी अबाधित ठेवावी ते शिकवलेलं. याशिवाय महत्त्वाचा होता तो स्पेसवॉक.

पृथ्वीवर परतलेल्या सुनीता म्हणतात, ‘हा एक अद्भुत अनुभव होता. त्यातून आत्मविश्वास वाढला. रोज नव्या आव्हानांना सामोरं जावं लागत होतं. पृथ्वीपासून दूर गेल्यावर तिचं महत्त्व अधिक समजलं याची जाणीव झाली.’

…अशी पृथ्वीबाबतची जाणीव पृथ्वीवर कायम राहणाऱ्यांना कधी होणार? आपण अंतराळयात्रींकडून काय शिकणार? प्रत्येकाने ठरवायचं!