आभाळमाया – सोन्याहून अति मोलाचे

>> वैश्विक, [email protected]

विविध  प्रकारचे दगडगोटे गोळा करण्याचा छंद असलेला एक छांदिष्ट. त्याचे नाव डेव्हिड होल, देश ऑस्ट्रेलिया. मे 2015 मध्ये तो मेरीबोर्ग येथे मेटल डिटेक्टर घेऊन सोन्याच्या दगडांचा शोध घेत होता…आणि अचानक त्याच्या हाती घबाड लागलं. (असं त्याला वाटलं.) एक सतरा किलो वजनाचा काहीसा लालसर, चमकदार दगड पाहताच त्याला अत्यानंद झाला. एवढा मोठा सोन्याचा तुकडा. काय त्याचे मोल आणि तो आपल्याला किती करेल मालामाल… याची स्वप्नं डेव्हिडला पडली नसली तरच नवल!

मात्र हा दगड सोन्याचा तुकडाच आहे का? याची तपासणी करणे गरजेचं होतं. त्यासाठी तो प्रयोगशाळीत नेऊन त्याचं खरं रूप समजून घेण्यासाठी डेव्हिड उतावळा झाला. मेलबर्न येथील प्रयोगशाळेत तो नेण्यात आला. तिथे त्याची कसून तपासणी झाली आणि 2018 मध्ये असा निष्कर्ष निघाला की, त्या दगडात सोनं नाही, परंतु तो मंगळ आणि गुरूच्या मध्ये असलेल्या अशनींच्या पट्टय़ात झालेला खडकाचा तुकडा असून सुमारे 100 ते 1000 वर्षांपूर्वी तो ऑस्ट्रेलियावर आदळला असावा.

यानिमित्ताने अॅस्टेरॉईड बेल्टची माहिती घेणं महत्त्वाचं ठरेल. ‘बोड’ नावाच्या शास्त्रज्ञाने दोन ग्रहांमधल्या अंतराचं एक गणित मांडलं. ते इथे देता येत नाही, पण त्यातून ग्रहमालेतील सर्व ग्रहांच्या त्यांच्या त्यांच्या जागी असण्याचं कोडं बऱ्यापैकी सुटलं. त्याला ‘टिटियस बोड लॉ’ असं नाव आहे. या टिटियस आणि बोड या संशोधकांच्या असं लक्षात आलं की, मंगळ आणि गुरू यांमध्येही एक ग्रह असायला हवा होता, परंतु तसा तो नाही. मग तिथे काय सापडलं तर बहुधा तुकडे झालेल्या एका ग्रहाचे हजारो अवशेष. त्यांचा एक अशनी पट्टा तयार होऊन तो त्या जागी फिरत राहिला. कदाचित मंगळापलीकडे एखादा भरीव ग्रह असता तर आपली परग्रहावरच्या संभाव्य मानवी वस्तीची संकल्पना आणखी दूरवर पोचली असती.

सौरमालेत इतरत्रही इतस्ततः फिरणारे महापाषाण सापडतात. त्यामुळे या पट्टय़ाला मुख्य अशनी पट्टा (मेन अॅस्टेरॉईड बेल्ट) असं म्हटलं जातं. हा असंख्य छोटय़ा मोठय़ा दगडगोटय़ांचा आणि पाषाणांचा पट्टा सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. असाच एक पट्टा प्लुटोपलीकडेसुद्धा आहे. त्याला किपर बेल्ट म्हणतात. मंगळ-गुरूमधल्या मुख्य अशनी पट्टय़ातलं साठ टक्के वस्तुमान सेरेस, वेस्टा, पॅलस आणि हायजिया या चार मोठय़ा अशनींमध्ये सामावलेलं आहे. बाकीचे असंख्य तुकडे, धूलिकण काही वेळा मंगळ-पृथ्वी किंवा गुरू यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्याकडे खेचले जात असतात. यापैकी सेरेस नावाचा अशनी ‘खुजा ग्रह’ एवढय़ा आकाराचा आहे. त्याचा व्यास 950 किलोमीटर असून बाकीच्या तीन महापाषाणांचा व्यास 600 किलोमीटरच्या आत आहे. अर्थातच तेही प्रचंड महत्त्वाचेच मानावे लागतील. इतर दगड-धूळ यांचा थर मात्र अतिशय विरळ असल्याने त्यातून जाणाऱ्या यानांना त्याचा आजवर त्रास झालेला नाही. अर्थात या तरंगत्या पाषाणांच्या परस्परांत टकरी होतात आणि एक ‘अॅस्टेरॉईड कुटुंब’ तयार होतं.

या पट्टय़ातील बहुतेक मोठे अशनी सी-टाईप म्हणजे कार्बोनेशियस, एस-टाईप म्हणजे सिलिकेटचे आणि एम-टाईप म्हणजे मेटल-रिच किंवा धातूयुक्त आहेत. हा अशनी पट्टा सौर तेजोमेघाच्या काळात ‘प्लेनेटिसिमस’ स्वरूपात तयार झाला. मात्र तो मंगळ-गुरू यांच्या मध्ये असल्याने आणि गुरूच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने त्यातील द्रव्य कमी होत जाऊन निर्मितीच्या वेळी त्याचे जेवढे द्रव्य होते त्यापैकी 99 टक्के आपली ग्रहमाला स्थिर होईपर्यंतच नष्ट झाले. हे सारे सौरमालेच्या पहिल्या 10 कोटी वर्षांत घडले.

1596 मध्ये जोहॅन्स केप्लर यांनी म्हटलं होतं की, ‘‘मी मंगळ आणि गुरूमध्ये एक ग्रह असल्याचे मानतो.’’ याचा अर्थ तो कधीतरी सापडेल असा होता. त्यांनी हे टायकोब्राहे यांच्या माहितीवरून ठरवलं होतं. त्यानंतर 1766 मध्ये जोहॅन टिटियस यांनी मंगळ-गुरूमधल्या ग्रह संकल्पनेला बोड यांच्या सहमतीने ‘टिटियस बोड लॉ’ मांडला. या सिद्धांतानुसार मंगळ-गुरूमध्ये एक ग्रह असणं आवश्यक होतं, ती उणीव पुढे अशनी पट्टय़ाने भरून काढली. मात्र टिटियस – बोड सिद्धांत गणिती पद्धतीत तंतोतंत  मानला जात नाही.

1801 मध्ये सिसिलीतल्या पॅलेर्मो विद्यापीठातील पियाझी यांना या पट्टय़ाच्या जागी एक सूक्ष्म गोष्ट फिरताना दिसली. त्यांनी त्याला ‘सेरेस’ या रोमन देवतेचं नाव दिलं. आधी त्यांना तो धूमकेतू वाटला, पण नंतर धूमकेतूची वैशिष्टय़ं (कोमा वगैरे) नसल्याने त्यांनी त्याला ग्रह मानले. त्यानंतर 15 महिन्यांनी ऑल्बर्स यांना ‘पॅलस’चा शोध लागला. 1802 मध्ये मात्र त्याला अॅस्टेरॉईड किंवा ताऱ्यासारखा असं म्हटलं गेलं. आताही या पट्टय़ातील पाषाणांना ‘अॅस्टेरॉईड’च म्हणत असले तरी ग्रीक संकल्पनेतील ताऱ्यासारखे ते नसून महापाषाण किंवा अशनी आहेत हे सिद्ध झालंय.

18 इंच व्यासाचा आरसा असलेल्या ‘डॉब्सोनिअन’ प्रकारच्या खासगी दुर्बिणीतून खगोल मंडळाच्या काही सभासदांनी ‘सेरेस’चं दर्शन घेतलं आहे. या हिवाळय़ात त्यांच्यासह हे जमतं का पाहायचं. आता मूळ मुद्दा असा की, याच पट्टय़ातील एक ‘कॉन्ड्रोईड’ प्रकारचा 17 किलो वजनाचा धातुजन्य पाषाण डेव्हिड होल यांना सापडला. मात्र त्यांच्या अपेक्षेनुसार तो सोन्याचा नव्हता. अशनी पट्टय़ाचा एकेकाळचा निवासी हे त्याचं मोल मात्र सोन्याहून प्रचंड आहे. सध्या तो ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे जपून ठेवलाय.