आभाळमाया – युरोपा क्लिपर

>> वैश्विक,   [email protected]

अवकाशाचा  धांडोळा घेणारी याने प्रक्षेपित होण्याची साठी कधीच उलटली. 2027 मध्ये ‘स्पुटनिक’ अवकाशात झेपावून 70 वर्षे होतील. त्यानंतरच्या काळात स्पेस सायन्स (अवकाश विज्ञान)मधे झालेली प्रगती खरोखरच वेगवान आहे. बालगीतातला किंवा प्रीतीचं प्रतीक झालेला चंद्र पादाक्रांत होऊनच किती काळ उलटला.

अवकाशविषयीचं माणसाचं कुतूहल जेव्हा केव्हा जागं झालं तेव्हापासून त्याला रात्री चमचमणाऱ्या हजारो ताऱ्यांनी स्तिमित केलं. सहज दिसणाऱ्या सूर्य-चंद्राला आणि काही ग्रहांना तर सर्वच संस्कृतीमध्ये वंदनीय स्थान प्राप्त झालं. या नुसत्या डोळय़ांनी दिसणाऱ्या ग्रह ताऱ्यांची कधी ‘प्रत्यक्ष’ भेट होईल याची कल्पनाही अगदी 1950 पर्यंत नव्हती. डोळा आणि गॅलिलिओपासून सुरू झालेला दुर्बिणींचा वापर यावरच काय ते आकाशाचे ‘वेध’ घेता येत होतं.

परंतु वैज्ञानिक विचाराला अनुकूल परिस्थिती लाभली की विलक्षण गती कशी प्राप्त होते याचा आविष्कार विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाने आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पावशतकाने पाहिला आहे. आमच्यासारखे वय वाढत चाललेले ‘स्पुटनिक-1’च्या भरारीपासूनचे कोटय़वधी मूक साक्षीदार याविषयी थोडंफार जाणून आहेत. रशियाचं हे यान अवकाशात गेल्याचं वृत्त आलं आणि आमच्या म्युनिसिपल शाळेतला उत्साही विज्ञान शिक्षकांनी त्याविषयी कशी माहिती सांगितली हे शेजारचा एक हुशार विद्यार्थी रंगवून सांगत असे.

नंतरच्या काळात गागारिन अंतराळात सफर करून आला तेव्हा हाच अनुभव त्याच शिक्षकांकडून आम्हीही घेतला तेव्हा आमचे गुरुजी (आम्ही सर नव्हे गुरुजीच म्हणायचो) म्हणाले होते. ‘बघा एक दिवस माणूस चंद्रावरच काय, पण गुरू-शनीच्या पलीकडेही जाईल.’ त्यांचा हा आशावाद वैज्ञानिक भाकितासारखा खरा ठरला. आज ‘युरोपा-क्लिपर’ खरंच गुरूच्या एका उपग्रहावर ‘वसतीयोग्य’ काही आहे का, याचा शोध घेतंय.

माणूस कदाचित वस्ती करू शकेल असा आपल्याला सर्वात जवळचा आणि वसतीयोग्य  ग्रह म्हणजे मंगळ. त्यावर ‘ट्रीप’ नेण्यापासून ते तिथे राहण्यापर्यंतचे प्रयोग सुरू आहेत. पृथ्वीवरच कृत्रिम ‘मंगळ’ तयार करून त्यात पाच संभाव्य अंतराळ यात्री वर्षभर कसे राहिले याची माहिती आपण पूर्वीच घेतली आहे.

तेव्हा, मंगळ मोहीम यशस्वी होणारच याची खात्री पटल्यावर एलन मस्कसारखे महत्त्वाकांक्षी उद्योजक त्याकडे ‘कमर्शियल व्हेंचर’च्या दृष्टीनेही पाहू लागले आहेत. ते साध्य होईल तेव्हा खरं, पण मंगळापलीकडचा गुरूसुद्धा आपल्याला खुणावतोय.

गुरू हा मंगळानंतरचा ग्रह असला तरी तो पृथ्वीपासून ‘रोश लिमिट’नुसार जास्त दूर आहे. याचं कारण ‘रोश लिमिट’ सिद्धांताप्रमाणे या दोन ग्रहांमध्ये जी एका ग्रहाची कक्षा आहे तिथे कुठला तरी अज्ञात ग्रह फुटून त्याचे तुकडे विखुरलेले आहेत. त्याला ‘अॅस्टेरॉइट बेल्ट’ किंवा अशनींचा पट्टा म्हणतात. त्यातील ‘सिरीज’ हा प्रचंड अशनी 18 इंच व्यासाच्या दुर्बिणीतून आमच्या एका मित्राने कितीतरी वेळा पाहिला आहे.

मात्र हे अशनी वसाहतीयोग्य नाहीत. त्याऐवजी गुरूचे जे 95 ज्ञात ‘चंद्र’ (उपग्रह) आहेत त्यापैकी गॅनिमिड, युरोपा, पॅलिस्टो आणि आयो हे उपग्रह खूपच मोठे आहेत. अनेक अंतराळयानांनी गुरूभोवती फेरी मारताना (फ्लाय बाय करताना) त्यांचं जवळून निरीक्षण केलंय. त्याचा सगळा डेटा एकत्रित केल्यावर ‘युरोपा’ या गुरूच्या उपग्रहावर प्रचंड जलसाठा असल्याचं लक्षात आलंय आणि ‘नॅसा’चं युरोपा क्लिपर हे अंतराळ यान त्याची सखोल माहिती घेण्यासाठी गेलं आहे.

हे यानही युरोपावर उतरणार नाही, पण त्याभोवती अनेक फेऱ्या घेईल. त्याला मल्टिपल फ्लाय बाय म्हणतात. 14 ऑक्टोबर 2024 म्हणजे बरोबर एक महिन्यापूर्वी त्याने उड्डाण केलंय. 1 मार्च 2025 रोजी ते मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचा लाभ घेऊन अधिक गतिमान होईल आणि 3 डिसेंबर 2026 रोजी पृथ्वीभोवती गिरकी घेताना त्याला पुन्हा गतीज ऊर्जा मिळेल. त्यानंतर 2030 च्या एप्रिल महिन्यात ते गुरूचा उपग्रह असलेल्या ‘युरोपा’च्या सान्निध्यात पोचेल.

आता हा ‘युरोपा’ कसा आहे? तर एकूणच सूर्यमालेतल्या नैसर्गिक उपग्रहांमध्ये त्याचा सहावा नंबर लागतो. ‘ज्युनो’ यानाने त्याचा 2023 मध्ये जवळून फोटो घेतलाय. तो आपल्या चंद्रापेक्षा थोडासाच लहान असून त्याचा व्यास 3100 किलोमीटर आहे. (चंद्राचा व्यास सुमारे 3474 किलोमीटर) युरोपाचा पृष्ठभाग सपाट असून त्याखाली मोठा समुद्र असल्याचं वैज्ञानिकांचं संशोधन आहे. हे भूमिगत पाणी ‘हबल’ दुर्बिणीने शोधून काढलं. ‘युरोपा’ला गुरूभोवती फिरायला आपले साडेतीन दिवस लागतात. तो गोलाकार कक्षेत फिरतो (लंबगोलाकार नव्हे.).

गुरूच्या या उपग्रहावर अतिसूक्ष्म जीवांची ‘वस्ती’ आहे का ते मात्र अजून तरी समजलेलं नाही. मात्र पृथ्वीवर आहेत तसा पाण्यातील हायड्रोजन ऑक्सिजन तिथे असून त्याचा गाभा सिलिकेट खडक तसंच लोह आणि निकेल धातूंनी बनलेला आहे. 1970 पासून त्याभोवती परिक्रमा करून अनेक यानांनी बराच ‘डेटा’ जमवलाय. त्याचं ‘खरं रूप’ 2030 मध्ये बाहेर पडेल तेव्हा तिथे वस्ती कशी करायची याचा विचार करता येईल. सध्या ‘युरोपा क्लिपर’ला सदिच्छा देऊया.