>> मेघना साने
बालरंगभूमी परिषद, ठाणे द्वारे नुकतेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना कंदिल भेट देण्यापेक्षा त्यांना कंदिल बनवायला शिकवायचे अशी रूपरेखा आखत नृत्य, नाटक शिकवत त्यांच्यासोबत दिवाळी फराळ अशा आनंदात साजरी झालेली ही दिवाळी आनंदाचे कवाड उघडणारी ठरली.
दिवाळीतील एक दिवस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबर साजरा करण्याची कल्पना बालरंगभूमी परिषद, ठाणे शाखेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी मांडली आणि बल्लाळ सरांची कल्पना सर्वांनीच उचलून धरली. बालरंगभूमी परिषदेतर्फे नुकतेच आम्ही दिव्यांग कला महोत्सवाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडले होते. बालकांसाठी आणखी नवा उपक्रम काय करता येईल या चर्चेसाठी नवरात्रीत एकत्र आलो होतो. त्यात मंजुषा बल्लाळ यांनी थोडी भर टाकून सरांचीच कल्पना पुढे नेली. “फराळ तर आपण संस्थेतर्फे वाटू शकू, रोटरी क्लबदेखील मदतीला येईल. बालरंगभूमी परिषद आणि ‘ठाणे वैभव’सुद्धा तयार आहेत, पण आपण त्यांना कंदील भेट देण्यापेक्षा ग्रामीण भागातील मुलांना कंदील करायला शिकवू या. यात त्यांना आनंद मिळेल. कंदिलासाठी लागणारी सर्व सामग्री आपण घेऊन जाऊ.’’
ग्रामीण भागातील मुलांना भेटण्यासाठी आम्ही भिवंडी तालुक्यातील कवाड गावातील कवाड जिल्हा परिषद शाळेची निवड केली. या शाळेत अडीचशे मुले होती. ग्रीटिंग्स बनवणे, पणत्या रंगवणे, चित्रे काढणे यासाठी लागणारे सगळे सामान आम्ही घेऊन गेलो. सोबत वैशाली जैन आणि सारिका जैन हे दोन कला शिक्षकही होते. सकाळी आठ वाजता कवाड शाळेत पोहोचलो. शाळेला निरोप गेलाच होता. त्यामुळे मुलींची आमच्यासमोर नृत्य, नाटक वगैरे सादर करण्यासाठी तालीम चालली होती. 8-9 वर्षांच्या मुली साडय़ा नेसून आणि अंबाडे घालून मिरवत होत्या.
वैशाली आणि सारिका यांनी मुलांकडून रंगीबेरंगी आकाश कंदील बनवून घेतले. विविध रंगांनी पणत्या रंगवल्या. चित्रकलेचे विविध नमुने गिरवून घेतले. वस्तू तयार झाल्यावर या वस्तूंचे एक छानसे प्रदर्शन मांडले. दोन तासांत मुलांनी एवढय़ा वस्तू तयार केलेल्या बघून आमचे डोळे पाणावले.
मला एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली. आम्हा पाहुण्यांना वर्गात बसायला खुर्च्या मिळाव्यात म्हणून मुलांनी तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर खुर्च्या वाहून आणल्या. ही मुले केवळ 7-8 वर्षांची असतील. अशा मुलांना आम्ही एरवी बोट धरून शाळेत सोडतो, पण ही मुले भलतीच ताकदीची होती. खुर्च्या डोक्यावर उपडय़ा ठेवून ती जिन्याने वर आली होती. खालच्या मजल्यावरील 1-2 खोल्या झाडायच्या बाकी होत्या. तेथे मला मुलांकडून कथाकथन, गाणी वगैरे म्हणून घ्यायची होती. शिक्षकांनी इशारा केल्यावर मुलांनी लगेच बेंच वगैरे हलवून साफसफाई केली. केर व्यवस्थित भरून बाहेर नेऊन ठेवला. पाच मिनिटांतच माझा वर्ग सुरू झाला. ग्रामीण मुलांचे मराठी इंग्रजी शाळेतील मुलांपेक्षा चांगले होते असे दिसून आले. मी सांगितलेल्या कवितेच्या ओळी त्यांनी लगेचच उचलल्या आणि म्हणून दाखवल्या. काही विद्यार्थ्यांनी कथाकथनही केले. प्रा. मंदार टिल्लू आणि पुंडलिक पाटील या शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी मुलांशी गप्पा केल्या. त्यांना गाणी म्हणून दाखवली. प्रदर्शनाची मांडणी झाली. तोच बालरंगभूमीच्या अध्यक्ष नीलमताई शिर्के यांचा निरोप आला की, त्याही या शाळेच्या दिवाळीत सहभागी होण्यासाठी कवाडला येत आहेत आणि शाळेतील सर्व मुलांसाठी जेवणही आणणार आहेत.
कवाड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका नंदा फुलपगारे, संध्या आंब्रे यांनी शाळेच्या गच्चीत कार्यक्रमाची तयारी केली होती. शाळेच्या गच्चीची शेड मुलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी सजवली. पाहुण्या म्हणून येणाऱया नीलमताईंसाठी मुलांनी एक मोठा आकाश कंदील केला होता. तो पाहून त्या खूशच झाल्या. बल्लाळ सर, मंजुषा मॅडम, प्रा. टिल्लू, पुंडलिक पाटील, कवाडमधील मान्यवर नागरिक आम्ही सारेच गच्चीत जमलो. मुलांनी संगीताच्या तालावर आपले कार्यक्रम सादर केले. मा. कुमुदिनीताईंनी शिक्षकांसाठी नाटकाची पुस्तके आणली होती. “तुम्ही ही नाटके बसवू शकता. नाटक छान तयार झाले तर आपण ते मोठय़ा थिएटरला नेऊ,’’ असे नीलमताईंनी विद्यार्थ्यांना सांगितले. ‘ठाणे वैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी मुलांशी हितगुज केले.
पहिल्या मीटिंगमध्ये जेव्हा आम्हाला कवाड शाळेची माहिती सांगण्यात आली होती तेव्हा त्या शाळेतील काही मुले अनाथ आहेत असे कळले होते. सरांनी या मुलांच्या नावांची यादीही आम्हाला दिली होती. या 10-12 मुलांना आपण काही मदत करू शकतो का असे विचारले होते. मी आणि सुचेता रेगे आम्ही मुलांना सरप्राईज द्यायचे ठरवले. बाजारात जाऊन या मुलांसाठी आम्ही दप्तरे, कंपास आणि इतर शालोपयोगी वस्तू तसेच दिवाळीचे सुगंधी उटणे, साबण अशी खरेदी करून ठेवली होती. कार्यक्रमानंतर एका खोलीत बोलावून त्या अनाथ मुलांना या वस्तू दिल्या. त्यांच्या डोळ्यांत लागलेले आनंदाचे दीप पाहून आमची दिवाळी साजरी झाली.
कार्यक्रमानंतर सर्व मुलांनी नीलमताईंनी आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. नीलमताई म्हणाल्या, “आपणही मुलांबरोबर आज हेच जेवण जेवू या का? आज आपण त्याच्याबरोबर दिवाळी साजरी करत आहोत. त्यांच्याही लक्षात राहील.’’ आम्ही बालरंगभूमी परिषदेचे सर्व कार्यकर्ते तिथेच शाळेत जेवलो आणि आपापल्या गाड्यांनी परतीच्या प्रवासाला निघालो.
आज आमच्यासाठी एक आनंदाचे कवाडच उघडले होते!